लढ्याला तोंड लागले?

By admin | Published: September 30, 2016 04:30 AM2016-09-30T04:30:19+5:302016-09-30T04:30:19+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष लढ्याला बहुधा तोंड लागले आहे. पाकव्याप्त काश्मिरात घुसखोरांच्या छावण्या उभारून व त्यात हल्लेखोरांना लष्करी प्रशिक्षण

The fight? | लढ्याला तोंड लागले?

लढ्याला तोंड लागले?

Next

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष लढ्याला बहुधा तोंड लागले आहे. पाकव्याप्त काश्मिरात घुसखोरांच्या छावण्या उभारून व त्यात हल्लेखोरांना लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांना भारतात पाठविण्याच्या त्या देशाच्या युद्धखोरीला भारताने प्रथमच अतिशय ठोस उत्तर दिले आहे. बुधवारच्या मध्यरात्री भारतीय लष्कराच्या निवडक तुकड्यांनी काश्मीरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी घुसखोरांच्या किमान सहा छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यात अनेक घुसखोर ठार झाले असून भारतीय लष्करातील सारे जवान आपल्या सीमेत सुखरुप परत आले आहेत. पठाणकोट आणि उरी या भारतीय तळांवर पाकिस्तानी हल्लेखोरांनी आक्रमण करून भारतीय जवानांची जी हत्या केली तिचा पुरेपूर बदला लष्कराच्या या कारवाईने घेतला आहे. ही कारवाई पाकव्याप्त काश्मीरात झाली असल्याने व तो प्रदेश कायदेशीररीत्या भारताचा असल्याने तिला पाकिस्तानवरील आक्रमण म्हणता येणार नाही. आमच्याच भूमीत राहून आमच्याविरुद्ध युद्धखोरीची आखणी करणाऱ्या घुसखोरांना आम्ही धाराशायी केले हीच या कारवाईबाबतची भारताची भूमिका आहे. काश्मीरचा सबंध प्रदेश ही भारताची भूमी आहे हा आपला दावा जुना व जगाने मान्य केला आहे. या भूमीचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानने अवैधरीत्या व्यापला आहे. याच भागात घुसखोरांच्या छावण्या उभारून त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे चालविले आहे. काश्मीरच्या भारतीय भागात गेल्या काही दशकात झालेले घुसखोरांचे सशस्त्र हल्ले याच छावण्यांमधून झाले आहेत. या छावण्या भारताने नेस्तनाबूत कराव्या ही मागणी भारतीय जनतेने अनेक वर्षांपासून चालविली आहे. मात्र युद्धाचा आरंभ आम्ही करणार नाही या भूमिकेमुळे भारताने आजवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वा पाकिस्तानसोबतची आंतरराष्ट्रीय सीमारेषा कधी ओलांडली नाही. भारताच्या या भूमिकेचा दुबळेपणा असा गैर अर्थ पाकिस्तानने आजवर लावला आणि आपल्या भारतविरोधी घुसखोरी कारवाया जारी ठेवल्या. या हल्ल्यांना भारताने प्रथम शांततामय मार्गाने तोंड देण्याचे ठरवून पाकिस्तानची राजकीय व आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने सार्क परिषदेवर बहिष्कार जाहीर केला. या बहिष्काराला या परिषदेच्या तीन सदस्य देशांनी जाहीर पाठिंबाही दिला. मात्र शांततेच्या मार्गाने दिलेल्या उत्तराला व राजकीय कोंडीला पाकिस्तानकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही. उलट पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची व त्याला नेस्तनाबूत करण्याची आपल्या सरकारच्या वतीने धमकी दिली. पाकिस्तानचा संरक्षणमंत्री अणुयुद्धाची धमकी देतो आणि त्याच्या त्या उक्तीकडे त्या देशाचे पंतप्रधान व लष्करप्रमुख आक्षेपार्ह दृष्टीने बघत नाहीत ही बाब त्या देशाचा आक्रमणाचा इरादा स्पष्ट करणारी ठरली आहे. त्या देशाने आजवर सीमाप्रदेशात केलेली आक्रमणे आणि काश्मीरात चालविलेली घुसखोरी थांबवायची तर एक ना एक दिवस भारताला आक्रमक पाऊल उचलण्याची आवश्यकता होती. ती गरज आताच्या लष्करी कारवाईने पूर्ण केली आहे. मात्र ही कारवाई आरंभीची व सांकेतिक आहे. पाकिस्तानचे सरकार व लष्कर तिला कसे तोंड देते हे येत्या काही काळात उघड होणार आहे. पाकिस्तान हा काश्मीरवर आपला हक्क सांगणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश हा पाकिस्तानचा एक दिवस भाग बनेल अशी भाषा त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मुजफ्फराबाद या पाकव्याप्त काश्मीरच्या राजधानीच्या ठिकाणी बोलूनही दाखविली आहे. खरे तर पाकिस्तानच्या या युद्धखोरी भूमिकेचा इतिहास फार जुना व थेट १९४७ पर्यंत मागे नेता येण्याजोगा आहे. त्याच्या आक्रमक भूमिकेचे सहस्रावधी पुरावे भारताजवळ आहेत आणि त्याने ते पाकिस्तानसह साऱ्या जगाला दाखविलेही आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरू असलेल्या सभेत या मुद्यावर पाकिस्तानला एकाकी पडावे लागले ही बाबही जगाने पाहिली आहे. सार्क परिषद, संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, रशिया व चीन या महासत्ता आणि आपल्या शेजारची सारी राष्ट्रे आपल्यासोबत आहेत याची काळजी घेत व त्याविषयीची खात्री करून घेऊन भारताने आताची लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईने भारतीय जनतेत आनंद व अभिमानाची लाट पसरली आहे. मात्र त्याचवेळी या कारवाईत जखमी झालेला युद्धखोर पाकिस्तान तिला कसा प्रतिसाद देतो हा साऱ्यांच्या काळजीचा व सावध होण्याचा विषय आहे. आक्रमक वृत्ती आणि युद्धखोरी हे गुण ज्या देशाच्या प्रकृतीचा भाग बनले आहेत तो देश अशा हल्ल्यांकडे दुर्लक्ष करील याची शक्यता अर्थातच फार कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारत सरकारला व त्याच्या लष्कराला या शक्यतेची संपूर्ण जाणीव आहे. साऱ्या सीमेवर भारताचे लष्कर तैनात आहे आणि पाकिस्तानच्या दक्षिण सीमेवर भारताचे नाविक दल साऱ्या तयारीनिशी सज्ज आहे. या बाबी भारताच्या आताच्या कारवाईमागे एक दीर्घकालीन योजना व तिचे सावध नियोजन आहे हे सांगणाऱ्या आहेत. या कारवाईचा पाकिस्तानने योग्य धडा घेणे, आपली युद्धखोरी थांबविणे व युद्ध करुन कोणतेही प्रश्न सुटत नाहीत हे जाणून घेणे आता गरजेचे आहे.

Web Title: The fight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.