लढा एका जिल्ह्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:37 AM2018-03-14T01:37:25+5:302018-03-14T01:37:25+5:30
गेल्या ५८ वर्षांपासून अंबाजोगाईचा जिल्हा निर्मितीचा लढा चालू असून अजूनही या प्रश्नाकडे सरकार गंभीरपणे पाहात नाही.
- सुधीर महाजन
गेल्या ५८ वर्षांपासून अंबाजोगाईचा जिल्हा निर्मितीचा लढा चालू असून अजूनही या प्रश्नाकडे सरकार गंभीरपणे पाहात नाही. मुकुंदराजाच्या अंबाजोगाईमध्ये गेल्या २३ दिवसांपासून चक्री उपोषण चालू आहे. बीडचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करावा ही सर्वपक्षीय मागणी आहे. ५८ वर्षांपूर्वी १९६० साली प्रथम ही मागणी करण्यात आली. त्यावेळचे नगराध्यक्ष नाना जोशी यांनी हा ठराव त्यावेळी नगरपालिकेत मंजूर करून घेतला होता. याचसोबत दुसराही ठराव झाला होता. तो शहराच्या नामांतराचा. निजाम राजवटीत या शहराचे नामांतर मोमिनाबाद असे करण्यात आले होते, ते बदलून अंबाजोगाई झाले. ५८ वर्षांत बºयाच शहरांना जिल्हा होण्याचे भाग्य मिळाले; पण अंबाजोगाई दुर्लक्षित राहिले. राजकीय सामर्थ्य असतानाही जिल्ह्याचा दर्जा मिळू शकत नाही ही रहिवाशांची खंत आहे. या मागणीसाठी प्रयत्नात कसूर नाही नेटाने मागणी पुढे रेटली जाते; पण आवाज मुंबईपर्यंत पोहोचत नाही.
तसे हे शहर प्राचिन. थेट चालुक्य-यादवांच्या काळापासून इतिहास शहरभर सांडलेला आहे. खोलेश्वर, बाराखांबी संकेश्वराचे मंदिर, आद्यकवी मुकुंदराजाची समाधी. शिवाय जोगाई ऊर्फ योगेश्वरी देवीचे मंदिर, या शहराचे पूर्वीचे नाव केवळ अंबे होते पुढे जोगाई देवीमुळे ते अंबाजोगाई झाले. यादवांचा सेनापती खोलेश्वर हा अंबाजोगाईचा म्हणून अप्रतिम शिल्पकला लेवून येथे मंदिरे उभी राहिली. असा हा संपन्न सांस्कृतिक वारसा असणाºया शहराची शैक्षणिक प्रगती वाखाणण्यासारखी. नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत, या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड वैचारिक आणि सांस्कृतिक घुसळण चालणारे हे शहर राजकारणातही मागे नाही. तर अशा अंबाजोगाईत जिल्ह्याची मागणी रेटून धरलेली आहे. खरेतर निजामाच्या काळात मोमिनाबाद हा जिल्हा होताच म्हणून पुढेही जिल्हा कायम रहावा अशी मागणी.
या प्रस्तावित जिल्ह्यात अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, धारूर, केज, वडवणी हे सहा तालुके असावावेत अशी योजना आहे. मराठवाडा विभागाचे विभाजन करून लातूर किंवा नांदेड यापैकी एक विभागीय स्थान झाल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही. प्रशासकीय पातळीवर दिलीप बंड आणि उमाकांत दांगट या दोन तत्कालीन विभागीय आयुक्तांनी अहवालही दिलेले आहेत. आज या शहरात अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अशी कार्यालये असल्याने प्राथमिक पायाभूत सेवा माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या कारकिर्दीत उभ्या राहिल्या. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ या मागणीसाठी गेले होते; पण पुढे राजकीय वातावरण पाहता मुंडेंना जिल्हा करण्यात स्वारस्य नव्हते असे येथे बोलेले जाते. मुंडे-महाजन जोडीने राज्याचे नेतृत्व केले, देशाच्या राजकारणात भूमिका बजावली; पण अंबाजोगाईत त्यांना स्वीकारलेले नव्हते हे वास्तव होते. अंबाजोगाई, परळी आणि माजलगाव या प्रमुख शहरातील सत्ता त्यांच्याकडे नव्हती म्हणून हा प्रश्न त्यांनी तडीस नेला नाही अशी येथील लोकांची भावना आहे. आता या जिल्ह्याच्या प्रश्नात राजकारण शिरले. परळीत एक सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झाली. माजलगावमध्ये सुद्धा मतांतरे दिसतात. तर हा प्रश्न प्रशासकीय सोयीऐवजी राजकीय बनत आहे. परवा आ. अमरसिंह पंडित यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. यादवांच्या सेनापतीचे गाव निजाम राजवटीतला जिल्ह्याचे ठिकाण अशी वैभवशाली परंपरा आणि जिल्ह्याची ऐट मिरवण्याची क्षमता असणाºया अंबाजोगाई करांचा आवाज अजूनही मुंबईमध्ये पोहोचत नाही.