मराठवाड्यातील गांधीवादी नेत्याचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:45 AM2018-01-10T02:45:38+5:302018-01-10T02:47:16+5:30
हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.
- धर्मराज हल्लाळे
हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.
शालेय जीवनापासूनच गांधी विचारांचा प्रभाव असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद बाळाराम अग्रवाल यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्याचवेळी शस्त्र बाजूला ठेवत आयुष्यभर अहिंसेचा विचार जपला. त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार १३ जानेवारी रोजी पुण्यात गंगाप्रसादजींना प्रदान होणार आहे. स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्यासाठी धडपडणारे ते सेनानी होत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद स्टेटमधील जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यावेळी चोंढी स्टेशनवर कुरुंद्याच्या अत्याचारी फौजदाराला पकडून लोकांनी बेदम झोडपण्यास सुरुवात केली होती. गंगाप्रसादजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि संतापलेल्या लोकांच्या तावडीतून त्या फौजदाराची सुटका केली. प्रखर संघर्षानंतर विजयोत्सवात बेभान न होता तोल सांभाळणारी वृत्ती गंगाप्रसादजींनी दाखविली. सुडाची आग आता अयोग्य आहे, झाले गेले विसरून सर्वांनी एक झाले पाहिजे. हैदराबाद मुक्ती लढा हा कुणा एका जाती वा धर्माविरुद्ध नव्हता, तो अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, अशी धारणा असणा-यांपैकी गंगाप्रसादजी आहेत. संवेदनशील घटनांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर रस्त्यावर येऊन हिंसा करणाºयांना तिथेच थांबविण्याची नैतिक ताकद असणारे नेते आज दिसत नाहीत. १९६९ मध्ये महात्मा गांधीजींची जन्मशताब्दी साजरी होत असताना महाराष्ट्रात काही भागात दंगली उसळल्या होत्या. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी वसमत येथे धार्मिक ऐक्यासाठी गंगाप्रसादजींनी १४५ दिवसांचे एक प्रदीर्घ साखळी उपोषण केले. लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांच्या पत्नी प्रभावतीदेवी यांनी वसमत येथे जाऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतचा लढा, आजेगावचा रणसंग्राम इतिहासात नमूद आहे. हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्यासह अनेक जखमी सैनिकांना प्राणांची बाजी लावून वाचविण्यासाठी गंगाप्रसादजी धावले होते. रायफल घेऊन लढणारे हे सैनानी पुढे आयुष्यभर गांधी विचारांचे पाईक बनले. भूदान चळवळीत योगदान दिले. दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान राबविले. आणीबाणीत १८ महिने तुरुंगवास भोगला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे काम पुढे नेत खादीचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यासाठी निर्धूर चूल, सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले. अनेक शेतकºयांना सेंद्रीय शेतीकडे वळविले. मराठवाडाभूषण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी.लिट पदवी संपादन करणारे गंगाप्रसादजी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आजपर्यंत दौरे करीत राहिले. जानेवारी महिन्यात त्यांनी ९६व्या वर्षांत पदार्पण केले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्यात आदर्शवत सर्वोच्च स्थान असणारे गंगाप्रसादजी हे केवळ अग्रवाल कुटुंबीयांची जबाबदारी असू शकत नाहीत. १७ सप्टेंबरला होणाºया सरकारी औपचारिकतेपलीकडे जाऊन त्यांची सेवा करण्याची संधी सरकार अन् समाजाने स्वीकारली पाहिजे. कुटुंब देखभाल करीत असले तरी मोठ्या माणसांचे मोठेपण त्यांच्या हयातीत नव्हे, पश्चात गौरवान्वित करणारा मराठी मातीचा दुर्गुण नाहीसा करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे.