हे नरबळी घेणा-या रेल्वे अधिका-यांवर खटला भरा!

By विजय दर्डा | Published: October 2, 2017 01:35 AM2017-10-02T01:35:20+5:302017-10-02T01:36:50+5:30

उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन रेल्वे अपघात झाल्यानंतर आता मुंबईत एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागला

Fill the lawsuit against these officers in the custody! | हे नरबळी घेणा-या रेल्वे अधिका-यांवर खटला भरा!

हे नरबळी घेणा-या रेल्वे अधिका-यांवर खटला भरा!

googlenewsNext

उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन रेल्वे अपघात झाल्यानंतर आता मुंबईत एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, हा केवळ अपघात आहे की रेल्वे प्रशासनाच्या बेपर्वाईने घेतलेले हे बळी आहेत?
एलफिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलासंबंधी गेल्या वर्षभरात अनेक संसद सदस्यांनी पत्र लिहून रेल्वे प्रशासनास सावध केले होते. हा पूल खूप जुना आणि अरुंद आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता तेथे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते, याकडे समाजमाध्यमांतूनही रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते. केवळ एक टिष्ट्वट केल्यास प्रवाशाला रेल्वेगाडीत त्याच्या बसल्या जागी दूध पुरविण्याच्या बढाया मारणाºया रेल्वेच्या अधिकाºयांनी या दबा धरून बसलेल्या धोक्याकडे का दुर्लक्ष केले? या पुलाच्या रुंदीकरणासाठी निविदा काढण्यात आल्याचे रेल्वे आता सांगत आहे. मग रेल्वे मंत्रालय एवढ्या लोकांचे बळी जायची वाट पाहत बसले होते, असे म्हणायचे का? की नव्या पुलासाठी नरबळी देणे गरजेचे होते? निष्काळजीपणाने झालेल्या या मानवी हत्यांसाठी कुणाविरुद्ध आणि कोणती कारवाई करणार, हा खरा मुद्दा आहे. रेल्वेच्या जबाबदार बड्या अधिकाºयांविरुद्ध हत्येचा खटला दाखल होईल? दिल्लीच्या एका शाळेत प्राथमिक वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा खून झाला तेव्हा त्यासाठी जबाबदार धरून शाळेच्या मुंबईतील संचालकांवर गुन्हे नोंदविले गेले. एखाद्या कारखान्यात अपघात झाल्यास मालकास जबाबदार धरले जाते. मालक आणि संचालकांना तुरुंगात टाकले जाते.
देशभरात आठ हजार रेल्वे स्टेशन आहेत व तेथून दररोज सुमारे दोन कोटी ३० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. रेल्वे अधिकाºयांना त्यांच्या बेपर्वाईचा जाब विचारला जाणार नसेल तर प्रवास करणाºया या दोन कोटी ३० लाखांपैकी प्रत्येक प्रवाशाचा जीव कायम धोक्यात आहे, असेच म्हणावे लागेल. नव्हे त्यांचे जीव खरोखरच धोक्यात आहेत! गेल्या तीन वर्षांत सुमारे पावणे चारशे रेल्वे अपघात झाले व त्यापैकी १८५ अपघात रेल्वे अधिकारी व कर्मचाºयांच्या बेफिकिरीमुळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसला अपघात झाला तेव्हा काही बड्या रेल्वे अधिकाºयांच्या केवळ बदल्या केल्या गेल्या. अशा अधिकाºयांना सरळ तुरुंगातच टाकायला हवे. असे अपघात परदेशात झाले असते तर त्यास जबाबदार असणारे नक्की तुरुंगात गेलेले दिसले असते. आता आपण जपानच्या मदतीने जी ‘बुलेट ट्रेन’ भारतात आणत आहोत त्या गाड्या जपानमध्ये गेली ५० वर्षे धावत आहेत व त्यांना अपवाद म्हणूनसुद्धा एकही अपघात झालेला नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, सतर्कता व सुरक्षा याकडे आपली रेल्वे अजिबात गांभीर्याने लक्ष देत नाही. देशातील सुमारे ३,००० रेल्वे पूल एवढे कमकुवत झाले आहेत की ते तात्काळ नव्याने बांधण्याची गरज आहे. एकूण एक लाख २१ हजार रेल्वे पुलांपैकी ७५ टक्के पुलांचे आयुष्य संपले आहे. यापैकी बव्हंशी पूल ६० वर्षांहूनही अधिक जुने आहेत तर काही पुलांनी वयाची शंभरीही पार केली आहे! सर्व जुने पूल पाच वर्षांत नव्याने बांधण्यासाठी एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करावा, अशी शिफारस हंसराज खन्ना समितीने सन १९९८ मध्ये केली होती. समितीचा हा अहवाल १९ वर्षे धूळ खात पडून आहे. सन २०१५-१६ मध्ये रेल्वेमध्ये पुढील पाच वर्षांत ८.५६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गलेलठ्ठ योजना तयार केली गेली.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांचा ‘सुरक्षा कोष’ स्थापन करण्याचीही घोषणा झाली. परंतु जाहीर झालेल्या योजना प्रत्यक्षात आणायला रेल्वेकडे पैसा नाही हे वास्तव आहे. एलफिन्स्टन रोडच्या पुलावर ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबांवर किती दुर्धर प्रसंग ओढवला असेल याची जरा कल्पना करा. कल्याणला राहणारी श्रद्धा वार्पे तिच्या अपंग वडिलांचा एकमेव आधार होती. पण आता तीच नसल्यावर वडिलांनी कुणाच्या आधाराने जगावे? मयुरेश हा युवक लोकलची असह्य गर्दी टाळण्यासाठी मोटारसायकलने कामावर जायचा. पण त्या दिवशी अचानक पाऊस आला म्हणून तो रेल्वेने गेला आणि एलफिन्स्टन रोडच्या पुलावरील मृत्यूच्या सापळ्यात तो अडकला. मयुरेश हा त्याच्या पाच जणाच्या कुटुंबात एकटाच कमावणारा होता. या २३ मृतांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळण्यास रेल्वे प्रशासनच पूर्णपणे जबाबदार आहे. आपण जे काम करतो त्यावर लोकांचे जीवन-मरण अवलंबून आहे व त्यात बेपर्वाई केली तर तुरुंगाची हवा खावी लागते याची खात्री पटली की निदान रेल्वे कर्मचाºयांच्या चुकांमुळे होणाºया दुर्घटना तरी नक्कीच बंद होतील.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
याच आठवड्यात भारतात १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल चषक स्पर्धेचा शुभारंभ व्हायचा आहे. जगभरातील २४ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. यजमान भारतीय संघाचे नेतृत्व मणिपूरचा अमरजित करणार आहे व संपूर्ण देशाच्या त्याच्याकडून खूप आशा आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील युवकांमध्ये फुटबॉलचे प्रेम वाढीस लागल्याचे दिसते. हा नक्कीच शुभसंकेत आहे. भारतीय संघाने तिरंगा फडकत ठेवावा आणि विश्वविजयी व्हावे, या अपेक्षेसह संघाला माझ्या शुभेच्छा.

Web Title: Fill the lawsuit against these officers in the custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.