गुन्हेगार सुधरु शकतो का? कृत्रिम बुद्धिमत्तेतील ‘दो आँखे बारह हाथ’...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:08 PM2022-07-30T15:08:55+5:302022-07-30T15:10:28+5:30
न्यायदानामध्ये ‘सातत्य’ आणि ‘सारासार विवेक’ या दोन्हींचा योग्य मेळ राखला जावा म्हणून प्रगत देशांत कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे.
विश्राम ढोले
व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा चित्रपट. तो रिलीज झाला १९५७ साली. ‘दो आँखे’ची कथा औंध संस्थानातील ‘खुले कारागृह’ या एका वेगळ्या प्रयोगावर बेतलेली होती. संधी, काम व खुले अवकाश दिले तर गुन्हेगार सुधारू शकतात, हे या प्रयोगाचे आणि चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र. या विचाराने प्रभावित होऊन चित्रपटाचा नायक जेल वॉर्डन आदिनाथ सहा अट्टल गुन्हेगारांना खुल्या कारागृहात नेतो. त्यांच्यावर विश्वास टाकतो, काम देतो. अर्थात बदल सहजपणे घडून येत नाही. हे कैदी मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात, प्रसंगी हिंसाही करतात. गुन्हेगारांवर टाकलेला विश्वास अनाठायी तर नाही ना, असेही आदिनाथला काहीवेळा वाटून जाते. पण आदिनाथचा विश्वास, शिकवण व त्याग यामुळे शेवटी ते अंतर्बाह्य सुधारतात.
‘गुन्हेगार माणसं सुधारू शकतात काय’ हा चित्रपटातील मध्यवर्ती प्रश्न आधुनिक न्याय व दंड व्यवस्थेसाठीही कळीचा मुद्दा आहे. चित्रपटाप्रमाणेच ही व्यवस्थाही ‘गुन्हेगार सुधारू शकतात’ हे तत्व सर्वसाधारपणे मान्य करते. म्हणूनच शिक्षा देताना, शिक्षेत कपात करताना, आरोपींना जामीन किंवा कैद्यांना पॅरोल देताना या तत्वाचा वेगवेगळ्या रुपात विचार केला जातो. कधी तो ‘शिक्षेनंतर गुन्हेगार सुधारण्याची शक्यता किती आहे?’ या रुपात येतो तर कधी ‘जामीन किंवा पॅरोल दिला तर गुन्हेगार पुन्हा एखादा गुन्हा करण्याची संभाव्यता किती?’ या रुपात प्रकटतो.
त्याचे उत्तर शोधणे सोपे नसते. शेवटी हा शक्यतांचा, संभाव्यतांचा खेळ असतो. त्यावर बरा-वाईट परिणाम करणारे घटक अनेक असतात. त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे असली तरी शेवटी तो निर्णय न्यायाधीशांच्या किंवा कारागृह प्रशासनाच्या सारासार विवेकावर अवलंबून असतो.
इथे खूप सापेक्षता येते. काहीवेळी तर अगदी पूर्वग्रहदेखील. न्यायाधीशांची वैयक्तिक पार्श्वभूमी, त्यांचे आकलन, विचारप्रणाली इतकेच कशाला त्यांचे मूड वा शारीरिक अवस्था अशाही घटकांचा निर्णयप्रक्रियेवर कळत नकळत परिणाम होत असतो. संशोधनांमधूनही तसे दिसून आले आहे. त्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ब्रिटनमध्ये १९९० च्या दशकात ८९ न्यायाधीशांवर एक प्रयोग करण्यात आला. ४१ काल्पनिक प्रकरणांतील आरोपींना जामीन द्याल का? असे त्यांना विचारण्यात आले. पण या ४१ पैकी एकाही प्रकरणात न्यायाधीशांचे एकमत होऊ शकले नाही. या ४१ मधील सात प्रकरणे तर सारखीच होती. फक्त आरोपींची नावे बदलली होती. पण बहुतेक न्यायाधीशांना तेही कळले नाही आणि एकाच प्रकारच्या या गुन्ह्यातील जामिनावर त्यांनी भिन्न भिन्न निकाल दिले. न्यायाधीश बदलल्याने निर्णय बदलला एवढ्यापुरतेच ते मर्यादित नव्हते, तर एकाच न्यायाधीशाने एकसारख्या प्रकरणांत वेगवेगळे निर्णय दिले होते. ‘न्यायातील सातत्य’ या मूल्यांशी झालेली ही प्रतारणा होती.
अधिकाधिक काटेकोर नियम करून तसेच न्यायाधीशांचा स्वेच्छाधिकार कमी करून हे सातत्य वाढविता येते. पण त्यातही गोची आहे. कारण त्यामुळे स्वार्थ व लालसेपोटी एखाद्याने थंड डोक्याने केलेला खून आणि अन्यायाची परिसीमा झाल्याने एखाद्याकडून भावनेच्या भरात झालेला खून यांना एकाच पारड्यात मोजावे लागते. तेही अन्यायकारक आहे. त्यामुळे न्यायदानामध्ये ‘सातत्य’ आणि ‘सारासार विवेक’ या दोन्हींचा योग्य मेळ घालावा लागतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता इथे कामी येऊ शकते. विद्येची विपुलता व वैविध्य यामुळे सारासार वास्तव ठरविण्यासाठी आधार मिळतो आणि गणिती सूत्रांमुळे सातत्य. म्हणून गेल्या दोनेक दशकांमध्ये अमेरिका, ब्रिटनसारख्या काही देशांमध्ये न्यायदान प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे. त्यासाठी आज बऱ्याच व्यावसायिक यंत्रणाही उभ्या राहिल्या आहेत. या सगळ्यांचा आधार म्हणजे शक्याशक्यतेचा अंदाज मांडणाऱ्या सांख्यिकी चाचण्या. एखादा गुन्हेगार किंवा आरोपी पुन्हा गुन्हा करण्याची संभाव्यता किती, हा या चाचण्यांपुढचा मुख्य प्रश्न. कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ अर्नेस्ट बर्गेस यांनी जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी या चाचण्यांचा पाया घातला. आरोपीची पार्श्वभूमी, गुन्ह्याचा संदर्भ व कृती, शिक्षेची तरतूद वगैरे अनेक घटकांचा विचार करून त्यांनी मूल्यमापनाचे काही नियम बनविले.
या मूल्यमापन पद्धतीला अमेरिकेतील तीन हजार कैद्यांसंबंधीच्या माहितीचा आधार होता. त्याआधारे त्यांनी पॅरोलवर सुटल्यावर एखादा कैदी गुन्हा करण्याची संभाव्यता संख्येमध्ये वर्तविली. त्यांनी ज्यांच्याबाबत ही शक्यता फारच कमी वर्तविली होती, त्यापैकी ९८ टक्के गुन्हेगारांनी खरंच पुन्हा गुन्हा केला नाही आणि त्यांनी ज्यांना धोकादायक गुन्हेगार ठरविले, त्यांच्यापैकी जवळजवळ ६५ टक्क्यांनी खरंच पुन्हा गुन्हा केला. बर्गेस यांच्या कामामुळे ‘गुन्हेगार सुधारण्याची शक्यती किती’ या जुन्याच प्रश्नाला काहीएक सांख्यिकी आधार मिळाला. अर्थात न्यायदान व दंड प्रक्रियेमध्ये आज वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता बर्गेस यांच्या चाचण्यांपेक्षा खूप जास्त प्रगत आहे. त्यासाठी वापरली जाणारी विद्या प्रचंड आहे आणि गणिती प्रतिमानेही गुंतागुंतीची. अमेरिकेत त्याचा वापरही विस्तारत आहे. पण त्यामुळे सगळे आलबेल झाले आहे का? अमेरिकेतल्या पॉल झिलीला विचाराल तर तो प्रचंड कडवटपणे नाही म्हणेल. कोण हा पॉल झिली, काय घडले त्याच्याबाबत, त्यातून न्यायदान प्रक्रियेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत कसे प्रचंड वादळ उठले, बारा हातांवर लक्ष ठेवून असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डोळ्यांमध्ये कोणता दोष होता? - याची गोष्ट पुढच्या लेखात.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत)
vishramdhole@gmail.com