अखेर दोर (अखेरचे) कापले गेले?

By Admin | Published: August 23, 2015 09:59 PM2015-08-23T21:59:40+5:302015-08-23T21:59:40+5:30

‘चर्चा केवळ द्विपक्षीयच असेल, त्यामुळे हुरियतच्या लोकांशी चर्चा करण्याचे कारण नाही व काश्मीरसह साऱ्या विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी असली तरी आता

Finally, the cord (the last) was cut off? | अखेर दोर (अखेरचे) कापले गेले?

अखेर दोर (अखेरचे) कापले गेले?

googlenewsNext

‘चर्चा केवळ द्विपक्षीयच असेल, त्यामुळे हुरियतच्या लोकांशी चर्चा करण्याचे कारण नाही व काश्मीरसह साऱ्या विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी असली तरी आता चर्चा उफा येथे ठरल्याप्रमाणे केवळ दहशतवादावरच होईल’ ही भारताची भूमिका आणि ‘हुरियतच्या नेत्यांशी चर्चा होणारच व त्यानंतरच्या चर्चेत काश्मीरच्या विषयाचा अंतर्भाव असणारच’ ही पाकिस्तानची भूमिका व उभय देश आपल्या भूमिकांवर ठाम म्हटल्यानंतर त्यातून जे होणे अपरिहार्य होते, तेच अखेर घडले आहे. एक मात्र खरे की, गेल्या वर्षी उभय देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दरम्यान होणाऱ्या चर्चेच्या आधी पाकिस्तानने हुरियतच्या म्हणजेच काश्मिरातील फुटीरतावाद्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा डाव खेळल्याबरोबर भारताने परराष्ट्र सचिवांच्या चर्चेतून आपले अंग काढून घेतले तसे यावेळी झाले नाही. तसे झाले असते तर जगासमोर भारताचीच चर्चेला तयारी नाही असा कांगावा करायला पाकिस्तान मोकळे झाले असते. भारताने यावेळी अगदी अखेरपर्यंत संयम बाळगला आणि चर्चा कोण टाळू इच्छित आहे, याचे जगाला दर्शन घडविले. मागच्या महिन्यात रशियातील उफा येथे उभय देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली असता, केवळ दहशतवाद या एकाच विषयावर दोन्ही पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या दरम्यान चर्चा होईल, असे ठरले होते आणि जारी करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकातही तसा उल्लेख केला गेला होता. त्यानुसार सरताज अझीझ आणि अजित डोवाल यांच्यात राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या चर्चेचा संभाव्य कार्यक्रम परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहातच पाककडे पाठवून दिला होता. पण त्यावर तिकडून कोणतीही हालचाल झाली नाही. अखेर १४ आॅगस्टला तिकडून उत्तर आले. दरम्यान, दिल्लीतील पाकिस्तानच्या राजदूताने अधिकृत चर्चेच्या आदल्या दिवशी हुरियतच्या लोकांना मेजवानीसाठी आणि अझीझ यांच्याशी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले. भारत-पाक दरम्यानच्या चर्चेत तिसऱ्या कोणत्याही पक्षाचा संबंध नाही, ही भारताची भूमिका ठाऊक असूनही पाकने तेच केले हा त्यांचा पहिला खोडसाळपणा. त्यावर हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करू नका, अशी अधिकृत विनंती भारतातर्फे केली जाऊनही, पाकने ती नाकारली. चर्चा केवळ उफा येथे ठरल्याप्रमाणे दहशतवाद या एकाच विषयावर होईल असे भारताने वारंवार स्पष्ट करूनही चर्चा सर्वांगीण व सर्वव्यापी होईल व त्यात काश्मीरचाही प्रश्न असेल असे पाकिस्तानने जाहीर केले हा दुसरा खोडसाळपणा. तो करताना त्यांनी उफा येथील संयुक्त पत्रकाचीही मोडतोड केली. पाकिस्तानची चर्चेला तयारी नसताना प्रत्यक्षात ती भारताने मोडीत काढावी याच दिशेने साऱ्या पाकी खेळी खेळल्या जात होत्या. प्रत्यक्ष या चर्चेशी संबंध नसलेला पाकचा आणखी एक खोडसाळपणा म्हणजे राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे यजमानपद स्वीकारूनही जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना परिषदेचे निमंत्रण देणे जाणीवपूर्वक टाळणे. परिणामी ही परिषदच न्यूयॉर्कमध्ये हलविली गेली. दहशतवादातील पाकी सहभाग सिद्ध करणारी सारी कागदपत्रे भारताने तयार ठेवली होती व तीच आजच्या चर्चेदरम्यान अझीझ यांच्या सुपूर्द केली जाणार होती. ते टाळण्यासाठीच पाकिस्तानचा खटाटोप सुरू होता. विशेष म्हणजे, या काळात पाकिस्तानातील अनेकजण बोलके झाले असताना पंतप्रधान नवाझ शरीफ गप्प होते. कारण तेथील लष्कराने त्यांना गप्प केले होते. आजच्या बैठकीच्या जवळजवळ आठवडाभर आधीपासून शरीफ यांची तेथील लष्करप्रमुख व आयएसआयच्या प्रमुखांशी खलबते सुरू होती. पाकिस्तानात जाऊन परतणारे आणि बोलघेवडेपणा करणारे भारतीय कितीही गोडवे गावोत पण निवडणुकीच्या माध्यमातून निवडला गेलेला पाकिस्तानचा प्रत्येक पंतप्रधान हा लष्कर आणि आयएसआयच्या हातातले बाहुले असतो, हेच पुन्हा एकदा दिसून आले. ज्या राष्ट्राच्या सरकारप्रमुखालाच जिथे काही किंमत नाही त्या राष्ट्रातील जनसामान्यांना भले कितीही भारताविषयी ममत्व वाटत असले तरी त्याला काडीचीही किंमत नाही. पाकिस्तानात असे होत असताना, भारतात काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेन्द्र मोदींवर तुटून पडत होता आणि पुन्हा दाखला देत होता भाजपाचेच एक माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचा. पाकशी चर्चा करण्यासाठी मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे काय, अशीदेखील विचारणा केली जात होती. याचा अर्थ चर्चा मोडीत काढा, असाच त्यांचा अप्रत्यक्ष सांगावा होता. ती मोडीत निघणारच होती. पण अर्थ आणि परराष्ट्र धोरण यात राजकारण आणू नये, असा विचार डोकी जाग्यावर असताना ज्यांना स्वीकारार्ह असतो, ते लोक प्रसंगी कसे विपरीत वागतात हेही यानिमित्ताने दिसून आले. चर्चा अधिकारी पातळीवरील असो की राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवरची असो, पाकिस्तान काश्मीरचा एकमेव मुद्दा लावून धरून इतर मुद्द्यांना बगल देणार व काश्मिरातील फुटीरांना खतपाणी घालीत राहणार हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर भारत केवळ उभयपक्षी चर्चेलाच तयार होणार आणि दहशतवाद व चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही, या भूमिकेवर ठाम राहणार. अशा अंतर्विरोधातून अखेर आजच्या चर्चेचे दोर कापले गेले. पण ते अखेरचेच कापले जाणे उभयपक्षी हिताचे नाही.

Web Title: Finally, the cord (the last) was cut off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.