अखेर न्याय मिळाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:02 AM2018-05-03T05:02:37+5:302018-05-03T05:02:37+5:30
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह नऊ जणांना विशेष मकोका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ तब्बल सात वर्षां
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह नऊ जणांना विशेष मकोका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ तब्बल सात वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला़ डे यांची हत्या भररस्त्यात गोळ्या घालून करण्यात आली होती़ या हत्येने पत्रकार व गुन्हेगारी विश्व यांच्यातील हितसंबंध चांगलेच चर्चेत आले होते़ पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावनाही निर्माण झाली होती़ मुंबईतून अंडरवर्ल्ड हद्दपार झाले, असा समज गेल्या दशकात झाला होता़ ११ जून २०११ रोजी डे यांची हत्या झाली आणि गुन्हेगारी जगत अजूनही सक्रिय आहे याची प्रचिती पोलिसांसह सर्वांनाच आली़ या हत्याकांडात एक महिला पत्रकार सहभागी असल्याच्या संशयानंतर सर्वांनाच धक्का बसला़ पुढे मात्र हा तपास कासवगतीने चालला. छोटा राजनला अटक झाली अन् या तपासाला पुन्हा वेग आला़ या खटल्यासाठी छोटा राजनला मुंबईत न आणल्याने मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर व येथील कारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले़ त्यातूनही पोलिसांनी व सरकारी पक्षाने सर्व शक्ती पणाला लावून या हत्येचे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले़ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या खटल्यासाठी राजनला हजर केले जात होते़ प्रत्यक्षात राजन समोर नसताना त्याच्याविरोधातील पुरावे सादर करताना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी सरकारी पक्षाने घेतली़ सुनावणीदरम्यान राजनने केलेले दावे, त्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने उत्तम पद्धतीने खोडून काढला़ त्याचेच फळ म्हणून आज राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली़ मुंबई हा अंडरवर्ल्डचा अड्डा होता़ गुन्हेगारी जगतात दाऊदसोबत राजनचेही नाव अंडरवर्ल्डमध्ये अग्रस्थानी होते़ राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावर नेमके कोणते खटले चालणार? कोणत्या प्रकरणात त्याला अधिकाधिक शिक्षा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते़ डे यांच्या खटल्यात राजनला झालेली शिक्षा गुन्हेगारी जगताला धक्का देणारी आहे़ छोटा राजनने केलेल्या अनेक गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात त्याला अखेर शिक्षा झाली़ पत्रकाराची हत्या करून समाजमनाला घाबरवण्यात यश आले तरी न्याय व्यवस्था शिक्षा ठोठावण्यात सक्षम आहे; हेही या खटल्याद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाले़ यापुढे अशा प्रकारे समाजातील एका नामवंत व्यक्तिमत्त्वाची हत्या केल्यास उशिरा का होईना शिक्षा होते, असा संदेशदेखील राजनच्या शिक्षेमुळे गुन्हेगारी विश्वात गेला़ तब्बल सात वर्षांनी हा निकाल लागल्याने न्याय विलंबाची चर्चा पुन्हा पटलावर येते़ तरीही जे़ डे प्रकरणी उशिरा का होईना न्याय मिळाला हीच भावना सर्वत्र आहे़ छोटा राजनसारख्या डॉनला शिक्षा झाल्याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळकट होतोच, त्याचबरोबर इतर खटल्यांचा वेग वाढायला हवा अशी भावनाही निर्माण होते़