'नीट'च्या गुणवत्तेला बदनाम करणाऱ्या सूत्रधारांना शोधा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:18 AM2024-06-25T07:18:30+5:302024-06-25T07:19:49+5:30

लातूर-नांदेडमध्ये 'नीट'च्या तयारीसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

Find the facilitators who discredit the quality of 'NEET'! | 'नीट'च्या गुणवत्तेला बदनाम करणाऱ्या सूत्रधारांना शोधा !

'नीट'च्या गुणवत्तेला बदनाम करणाऱ्या सूत्रधारांना शोधा !

धर्मराज हल्लाळे, वृत्तसंपादक

मागील काही वर्षात 'नीट'द्वारे एम्स आणि जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला आहे. या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या लातूर, नांदेडकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अगदी मुंबई-पुण्याचेही विद्यार्थी येतात, याच गर्दीचा फायदा उठवित दोन-चार जणांनी आपले उखळ पांढरे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशभरात नीटच्या निकालाचा गोंधळ सुरू झाल्यावर गोध्रा, पाटणा, दिल्लीच्या रॅकेटचे एक-एक पैलू तपास यंत्रणेद्वारे उलगडत असताना लातूरमध्येही चौघांवर गुन्हा दाखल झाला. तपास प्राथमिक स्तरावर असून, सध्यातरी आरोपींच्या खात्यावरील देवाण-घेवाणीवर पोलिसांचा संशय आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे असण्याचा संदर्भ पुढे कसा जोडला जाईल, हे बघावे लागेल.

याच गुन्ह्यातील दिल्लीतला आरोपी इतर राज्यांमध्ये घडत असलेल्या घटनांशी संबंधित असेल तर प्रकरण गंभीर वळण घेईल. मात्र, दिल्लीत बसून कोणीतरी नीट तयारीचे केंद्र झालेल्या लातूर-नांदेडमध्ये सावज टिपण्यासाठी स्थानिकांचा मध्यस्थ म्हणून वापर करत असेल तर त्याची व्याप्ती किती आहे? ज्यांचे प्रवेशपत्र आरोपींच्या मोबाइलमध्ये दिसत आहे, त्यांनी व्यवहार केला आहे अथवा नाही? केला असेल तर तो किती व कसा केला आहे. या दिशेने तपास यंत्रणेला जावे लागेल. एक मात्र नक्की, लातूर-नांदेडमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा परप्रांतीय रॅकेटने फायदा लाटण्याच्या हालचाली केल्याचा संशय गुन्हा दाखल झाल्याने गडद झाला आहे. त्यात किती तथ्य आणि किती चर्चाचर्वण हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. तोवर प्रामाणिकपणे अभ्यास करून ज्यांनी परीक्षा दिली त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.

त्यांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि समाजाची आहे.
गेल्या काही दिवसांतील 'नीट'चे काहीही नीट होताना दिसत नाही, हे पाहून अभ्यासू विद्यार्थी हादरले आहेत. अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशनासाठी विद्यार्थी-पालकांच्या रांगा आहेत. ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांच्यावर तर वचक बसलाच पाहिजे, परंतु, जे निरापराध आहेत त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, प्रामुख्याने ज्यांची चूक नाही, जे कोणत्याही गैरमार्गाने केव्हाही गेलेले नाहीत त्या सर्व विद्यार्थी-पालकांना आश्वस्त केले पाहिजे.

अपयशाने खचलेल्या अथवा दोनदा परीक्षा देऊनही अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना गंडविणारे महाभाग उदयास आले आहेत. कठोरपणे यंत्रणा राबविण्याची ख्याती असलेली 'एनटीए २०२४च्या परीक्षेत अपयशी ठरली. ज्या राज्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण घडले, ज्यांना गुणांची खिरापत वाटली गेली त्यांना शिक्षा मिळेलच. मात्र, जे मुख्य सूत्रधार आहेत, त्यांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मारेकरी ठरवून कायमचे कोठडीत पाठविले पाहिजे. नव्या 'पेपर लीक' कायद्याने एक कोटीचा दंड आणि दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. ज्या तन्हेने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे, ते पाहून दहा वर्षांची शिक्षाही कमीच वाटते आहे.

विद्यार्थी, वाढती चिंता पालकांची मिळविलेल्या ग्रेस गुण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जाणे किंवा मूळ गुण स्वीकारणे, हा पर्याय होता. एकूण १५६३ पैकी ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर इतरांनी मूळ गुण स्वीकारले. आता त्यांचा दि. ३० जूनला निकाल येईल आणि पुन्हा गुणवत्ता यादीचा क्रम बदलेल. सध्या झारखंड, बिहार, गुजरात येथे दाखल गुन्हे व तेथील प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही येणाऱ्या निकालातून वगळली जाईल. मात्र, अजूनही सुरू असलेला तपास, महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतर आणखी काही विद्यार्थी प्रतिबंधित होतील. त्यामुळे सध्याचा तपास आणखी गतीने पूर्ण करून निकालाची अंतिम यादी समोर आली पाहिजे, फेरपरीक्षेचा मुद्दा असेलच तर त्याची घोषणा तत्पर करून विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. या सर्व मुद्द्यांवर खुलासा होत नाही आणि रोजच नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढत आहे. dharmraj.hallale@lokmat.com

Web Title: Find the facilitators who discredit the quality of 'NEET'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.