बासरीवरचे बोट माझे नाही, ते ‘त्या’ हरीचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 07:53 AM2023-03-18T07:53:51+5:302023-03-18T07:54:54+5:30
ख्यातकीर्त बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्त विशेष लेख...
राष्ट्रीय स्तरावरील उभरत्या संगीत प्रतिभेचा शोध घेणाऱ्या सूरज्योत्स्ना या ख्यातकीर्त व्यासपीठाद्वारे दरवर्षी तरुण गायक-वादकांचा सन्मान केला जातो. स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत वृत्तसमूहाने स्थापित केलेल्या ‘सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चे दहावे पर्व येत्या मंगळवारी २१ मार्च रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यात ख्यातकीर्त बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्त विशेष लेख...
- पं. हरिप्रसाद चौरासिया
कुस्तीच्या मर्दानी आखाड्यात उघड्याबंब शरीरावर माती उडवीत ठोकलेला दमदार शड्डू आणि कृष्ण कन्हैयाच्या एखाद्या छोट्याशा मंदिराच्या काळोख्या गाभाऱ्यात बासरीवर उमटणारा बैरागी भैरवचा दग्ध, विरक्त स्वर या दोहोत काय नाते आहे, असे तुम्हाला विचारले तर हसाल मला तुम्ही. माझ्यासाठी मात्र ते नाते हे एक वास्तव आहे. पौरुषाने रसरसलेला कुस्तीचा पुरुषी आखाडा आणि बासरीचा मधुर थरथरता स्वर. दोन्ही अनुभवले मी एकाच जन्मात. या भिन्न टोकावरल्या वास्तवाच्या मधोमध उभे आहे माझे आयुष्य. परिस्थितीच्या रेट्याने लहानपणी आखाड्यातील मातीत ढकलले गेलेले, वडिलांच्या धाकापोटी सरकारी फायलीच्या गठ्ठ्यात घुसमटलेले, संधी मिळताच बासरीच्या ओढीने अनेक गावे पायाखाली तुडवणारे आणि जगभरातील रसिकांच्या टाळ्या घेत असताना नकळत डोळे पुसणारे...
कडक शिस्तीच्या वडिलांच्या धाकात कोमेजलेला स्वरांचा दुष्काळ माझ्या जिवाची तलखी करीत असताना आमच्या शेजारी राहणाऱ्या राजाराम या उत्तम गवयी असलेल्या गृहस्थाने माझ्या हातात बासरी नावाचे वाद्य ठेवले आणि माझे अख्खे आयुष्यच बदलून गेले! या स्वरांचे बोट धरून आयुष्याच्या जत्रेत केलेली भटकंती आता आठवते तेव्हा अनेकदा मन भरून येते. केवढी रंगीबेरंगी होती ती जत्रा आणि त्यातील माणसे. अलबेली, मनस्वी!
रेडिओवरील माझी बासरी ऐकून स्टुडीओमध्ये माझा शोध घेत आलेले मदन मोहन, नंतर एस. डी. बर्मन, नौशाद, लक्ष्मीकांत-प्यारेलाल... किती नावे घेऊ... साठीच्या त्या दशकात मुंबईच्या सिनेसृष्टीने भरभरून दिलेले काम, अमाप पैसा... तरीही मनाशी बोचत असलेला कसला तरी डंख आणि एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओत रेकॉर्डिंगसाठी माझी सतत चालू असलेली लगबग बघून शिवजी, शिवकुमार शर्मा यांनी नेमक्या वेळी विचारलेला तो नेमका प्रश्न : ‘‘इतनी भागदौडमे तुम खुदके रियाझ और अपने ग्रोथके बारेमे कब सोचते हो..?’’ - त्या प्रश्नाने अस्वस्थ होऊन डोळ्यात आलेले पाणी अजून विसरलो नाही मी! माझे गाव, कुटुंब सगळे काही मागे टाकून पछाडल्यासारखा हातात बासरी घेऊन निघालो मी ते कोणती मंझील डोळ्यापुढे ठेवून? पैशासाठी? की अलाण्या फल्याण्या संगीतकारांचा साथीदार होण्यासाठी? एका गाण्यात यमनच्या दोन सुरावटी, दुसऱ्यात भैरवचे दोन आलाप असे तुकडेच जागोजागी फेकायचे होते तर त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची गरज नव्हती...
वेदनेच्या नाडीवर अचूक बोट पडल्यावर माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या गुरू अन्नपूर्णा देवी! त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारावे यासाठी तीन वर्षे दिलेला झगडा आणि अखेर सुरू झालेले माझे शिक्षण... अन्नपूर्णा देवींची अटच होती, पाटी कोरी करण्याची..! मागील सगळे संस्कार पुसण्याची. पं. भोलानाथजींकडे शिकलेला यमन परत नव्याने सुरू झाला. रागाची घट्ट बांधणी कशी करायची, ते या एका यमनने मला शिकवले. कुठे चुकारपणा नाही, कमअस्सल स्वरांशी सलगी नाही आणि मुख्य म्हणजे मुक्काम गाठण्याची घाई-लगबग अजिबात नाही. स्वरांची मांडणी अगदी चोख; पण त्याची वीण मात्र सुंदर, कलाकुसरीची. संगीताकडे बघण्याचा घरंदाज, प्रगल्भ दृष्टिकोन मला या माझ्या आईने दिला. मेलडी, हार्मनी चित्रपट संगीताने शिकवली; पण अन्नपूर्णाजींनी माझ्या संगीताला पोषण दिले, बैठक दिली. मैफलीचा कलाकार म्हणून माझी ओळख मला स्वतःला आणि संगीत क्षेत्राला करून दिली. पुढे माझ्या या बासरीने संगीताच्या शास्त्रापासून जराही फारकत न घेता किती तरी प्रयोग केले. शिवजीच्या संतूरबरोबर तिची जोडी जमली. तिने किशोरीताईंसारख्या अव्वल कलावतीसोबत जुगलबंदी रंगवली. जागतिक संगीताचे विविध जोमदार प्रवाह भारतीय सीमांना धडका देत येथील कलाकारांना खुणावू लागले तेव्हा तेही माझ्या बासरीने अंगावर घेतले. जगभरातील वेगवेगळ्या मातीत, संस्कृतीत आपापल्या मस्तीत संगीताचे प्रयोग करणाऱ्या कलाकारांना या बासरीची भुरळ पडली!
कोणत्याही संगीताला जेव्हा जगाचे मोकळे आकाश दिसते, त्या आभाळातील मोकळे वारे श्वासात भरून घेण्याची संधी मिळते तेव्हा त्यातून उमटणारे सूर हे सगळ्या जगाचे, त्यातील माणसांचे सूर असतात. असे मोकळे वारे श्वासात भरभरून घेण्याची संधी माझ्या बासरीला मिळाली, हे तिचे भाग्य. आणि तिचे हेही भाग्य की, तिचे नाते कृष्णाशी जडले, त्याच्या श्वासाशी जडले. त्याने छेडलेले सूर वातावरणात विरून गेले. कसे असतील ते? नितांत निर्मल आणि खोल हृदयातून येणारे सच्चे, असा विचार करून जेव्हा मी, हरी बासरीवर ओठ टेकवतो तेव्हा त्यातून जाणारा श्वास, त्यावर फिरणारी बोटे या हरीची नसतात, त्याची असतात. कारण हा प्रत्येक श्वास ही त्याची मला मिळत असलेली भेट आहे. त्या फूटभर पोकळ लाकडी वाद्यातून ही फुंकर जाऊ लागते तेव्हा उमटणारे स्वर मोरपिसासारखे तरंगत निळ्या आकाशाकडे जात राहतात...
पूर्वप्रसिद्धी : लोकमत दीपोत्सव २०१५ मुलाखत आणि शब्दांकन : वंदना अत्रे (मूळ प्रदीर्घ लेखाचा संकलित आणि संपादित अंश)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"