फिनिश नितीश अन् फिर से नितीश, बिहारमध्ये कोणती मोहीम यशस्वी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:04 AM2020-03-03T05:04:48+5:302020-03-03T05:05:15+5:30

बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अजून कालावधी असला तरी तेथील लढाई तुंबळ असणार, याचे संकेत प्राप्त होत आहेत.

Finish Nitish and Phirse Nitish, Which campaign will be successful in Bihar? | फिनिश नितीश अन् फिर से नितीश, बिहारमध्ये कोणती मोहीम यशस्वी ठरणार?

फिनिश नितीश अन् फिर से नितीश, बिहारमध्ये कोणती मोहीम यशस्वी ठरणार?

Next

नितीशकुमार यांना राजकीय यश प्राप्त करून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे सध्या त्यांच्यापासून दुरावले आहेत. अनेकांना सल्ले देणाऱ्या किशोर यांची उणीव जदयूला भासू शकते. बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अजून कालावधी असला तरी तेथील लढाई तुंबळ असणार, याचे संकेत प्राप्त होत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राजदने सुरू केलेल्या ‘२०२० : फिनिश नितीश’ मोहिमेला चोख उत्तर देण्याकरिता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘२०२० : फिर से नितीश’ ही प्रतिमोहीम सुरू केली आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या नितीशकुमार यांनी जाहीर सभेत जदयू रालोआसोबत जाईल, अशी ग्वाही देतानाच २०० जागा जिंकू, असा दावा केला. बिहारमधील ब्राह्मण, ठाकूर व भूमिहार यासारख्या उच्च जातींची मतपेटी भाजपसोबत आहे; तर मुस्लीम, दलित व अनेक गोरगरीब इतर मागासवर्गीय जातींची मोट बांधून नितीशकुमार यांनी गेली १५ वर्षे सत्ता ताब्यात ठेवली आहे. जदयूने सीएए कायद्याला संसदेत पाठिंबा दिला आहे. एनआरसीची अंमलबजावणी ही बिहारमध्ये होणार नाही व सीएए व एनपीआरला विरोध करण्याची गरज नाही, असा अगदी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जसा पवित्रा घेत आहेत, तसाच नितीशकुमार यांनीही घेतला आहे. घोटाळ्यांच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेले लालूप्रसाद यादव हे वैद्यकीय कारणास्तव दिल्लीत मुक्काम हलवण्याची व इस्पितळातून निवडणुकीची सूत्रे हलवण्याची दाट शक्यता दिसत आहे. लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव हेच सध्या पक्षाची धुरा वाहत असले, तरी लालू यांचे सक्रिय होणे याचा अर्थ पुन्हा विधानसभा निवडणुकीत लढत नितीशकुमार विरुद्ध लालूप्रसाद अशीच होण्याची शक्यता आहे. यादव व मुस्लीम ही व्होटबँक राजदच्या मागे उभी करण्यात लालू व तेजस्वी यांना किती यश मिळते, यावर जशी बरीच समीकरणे अवलंबून आहेत, तशीच ती अनेक छोट्या इतर मागासवर्गीय जाती किंवा त्यांच्या पक्षाचे नेते यांची मोट कोण कशी बांधतो, यावर अवलंबून असतील. कन्हैयाकुमार हा फॅक्टरही बिहारच्या निवडणुकीत प्रभावी राहणार आहे.


त्यांच्या सभेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कन्हैयाकुमार यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यावरून दिल्लीत आप व काँग्रेसमध्ये सुरू असलेली खडाखडी हेच सांगते की, कन्हैयाकुमार यांना मिळणारा प्रतिसाद काँग्रेसच्या शिडात हवा भरणारा ठरेल, अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजप युतीला शह देण्याकरिता राजद व काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास त्यांचे जागावाटप कसे होते, यावर बºयाच बाबी अवलंबून असतील. वरील परिस्थिती विचारात घेता या वेळी लढाई नितीशकुमार यांच्याकरिता सोपी नाही. बिहारमधील गरिबी, पायाभूत सुविधांचा अभाव वगैरे मुद्दे या निवडणुकीत कायम असले, तरी शेवटी जातीपातीच्या आधारावरच मतदान होणार आहे, हे उघड आहे. नितीशकुमार हे आतापर्यंत भाजपला वेसण घालणारे नेते असल्याची भावना असल्याने त्यांना पाठिंबा देणारा मुस्लीम समाज या वेळी त्यांच्या बाजूने कितपत उभा राहील, याबद्दल मतमतांतरे आहेत. दिल्लीतील दंगलीबाबत रालोआचे घटक पक्ष असलेल्या रामविलास पासवान यांनी जाहीर नाराजी प्रकट करण्याचे कारण हेही बिहारची निवडणूक व तेथील सुमारे १५ टक्के मुस्लीम मते हेच आहे. लालू व तेजस्वी यांची राजद ही कुटुंबाची खासगी मालमत्ता आहे. लालूंच्या कुटुंबकबिल्याचे पक्षावर वर्चस्व असून कुटुंबाच्या हितापलीकडे लालूंनी काही पाहिलेले नाही, याची नाराजी जनतेत निश्चित आहे.

यादव मतदारांना एकेकाळी लालूंमध्ये दिसणारा संघर्षशील नेता आता दिसत नाही. मात्र, यादव मतदारांपुढे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मुस्लीम व यादव मतांची मोट बांधण्यात त्यांना यश आले व काँग्रेसने जागावाटपात फारसे ताणून न धरता तडजोड केली, तर राजद-काँग्रेस आघाडी रालोआशी तुल्यबळ झुंज देऊ शकते. नरेंद्र मोदी यांची जादू विधानसभा निवडणुकीत फारशी चालत नाही, हे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतच्या अनेक निवडणुकांत दिसले आहे. बिहारअगोदर मोदी-शहा यांची लढाई पश्चिम बंगालच्या भूमीत ममतादीदींशी होईल. तेथे जहाल हिंदुत्वाचे कार्ड भाजप खेळणार, हे स्पष्ट दिसत आहे. बंगालच्या निवडणुकीचा बिहारवर परिणाम अपेक्षित आहे. मात्र, बिहारमध्ये फटका बसला तर ‘विकासा’च्या चिपळ्या हाती घेण्याखेरीज पर्याय नाही.

Web Title: Finish Nitish and Phirse Nitish, Which campaign will be successful in Bihar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.