शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:53 AM2021-11-16T05:53:25+5:302021-11-16T05:53:54+5:30

बाबासाहेब पुरंदरे यांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही...

The fires burning with Shiva meditation calmed down after death of babasaheb purandare | शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

Next
ठळक मुद्देबाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या

प्रा. मिलिंद जोशी

बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली आणि  शिवशाहिरीचे एक तेजस्वी पर्व लोपले. आयुष्यभर शिवध्यासाने धगधगणारे एक अग्निकुंड शांत झाले. त्यामुळे इतिहासही क्षणभर थबकला असेल. ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. गोष्टी सांगण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. ही कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडून. बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या आठव्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ, तिथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा व्हायचा तो थाटामाटात. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंह जयंतीच्या दिवशी एका कीर्तनकाराचे नृसिंह अवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनकाराला त्यावेळी दोन रुपये बिदागी मिळायची. त्या दोन रुपयांतूनच त्याने पेटी आणि तबला वाजविणाऱ्या कलाकारांची बिदागी द्यायची, असा सगळा मामला असायचा. त्यावर्षी नृसिंह जन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ता नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामांच्या जिवाची घालमेल सुरु होती. कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इभ्रतीला साजेसा उत्सव त्यांनी आजवर केला होता. हाफ चड्डी आणि शर्ट घातलेले पोरसवदा बाबासाहेब हे सारे पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुला नृसिंह जन्माची गोष्ट माहीत आहे ना? , ती तू सांग.’

बाबासाहेब गडबडलेच, कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही असे त्यांना वाटत होते.  त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची, असा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता. धीर देत मामा म्हणाले, ‘तुला जशी गोष्ट सांगता येते तशी तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा आग्रह नाही.’ इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला. प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंह जन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रकटलेल्या नृसिंहाने प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला, हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला की, लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यानरुपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

बाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या, ‘तुम्ही नाही म्हणालात तर, लोक काय म्हणतील?’ त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणे अवघड झाले. त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडते, याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्र कथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला. इतिहासाकडून नेमकं काय शिकायचं याची संथा शिवशाहिरांनी दिली. अव्याभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चरण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा होती. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा होता. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही.
बाबासाहेबांनी शंभरीत पदार्पण केले, पण त्यांची   शतकपूर्ती होऊ शकली नाही याची खंत महाराष्ट्राला नक्कीच राहील. बाबासाहेब ज्या तपाच्या वाटेने गेले ती वाट चोखाळणे हीच  त्यांना खरी आदरांजली ठरेल.

(लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत)
joshi.milind23@gmail.com

Web Title: The fires burning with Shiva meditation calmed down after death of babasaheb purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.