वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी फटाके हवेत!
By किरण अग्रवाल | Published: November 19, 2023 01:07 PM2023-11-19T13:07:27+5:302023-11-19T13:07:59+5:30
Wild Animals : अंकुरलेल्या हरभरा पिकात अनेक ठिकाणी माकडांनी उच्छाद मांडल्याच्या तक्रारी येत आहेत.
- किरण अग्रवाल
लोडशेडिंगच्या समस्येमुळे शेतकरी अगोदरच बेजार आहेत, आता त्याचसोबत वन्य प्राण्यांकडून शेत पिकांच्या होत असलेल्या नासधूसमुळे ते वैतागले आहेत. लागोपाठच्या संकटांची ही मालिका कधी खंडित होईल हा प्रश्नच आहे.
दिवाळी आटोपत आली व फटाक्यांचे बारही विरले असले तरी, शेत पिकांची नासधूस करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आता फटाके हवेत असे म्हणण्याची वेळ आली आहे, कारण अंकुरलेल्या रब्बी पिकांमध्ये वन्य प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी शिरून शेत पिकांचे नुकसान करीत असल्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ पाहते आहे.
आली आली म्हणता म्हणता दिवाळी येऊन गेलीही. खरीप हंगामात झालेले नुकसान झेलून रब्बीवर आशा ठेवत बळिराजाने दिवाळीचा सण गोड केला. कर्ज काढून का होईना खरेदी केली व दिवाळी साजरी केली. राज्यातल्या सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांच्या यादीत अकोल्याचे नाव येऊनही फटाके जोरात फुटलेत. व्यक्तिगत आनंदापुढे समाजाची व प्रदूषणाची चिंता कोण करणार ? पण असो, दिवाळी जोरात होत असताना संवेदनशील नागरिक व सामाजिक संस्थांनी वंचित, निराधारांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक भान जपल्याचाही प्रत्ययही आला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता यावी.
भाऊबीज आटोपून लेकीबाळी सासरी परतल्याने व दिवाळी सरत आल्याने शेतकरी आता पुन्हा शेताकडे वळले आहेत. यंदा खरीप हंगामात अनेकांना फटका बसला. दुबार पेरणी करूनही मनाजोगे पीक हाती आले नाही. जे हाती आले त्याला बाजारात भाव मिळाला नाही, त्यामुळे रब्बीवर आशा ठेवून शेतकरी कामाला लागला आहे. रब्बीमध्ये गहू, हरभरा लागवड वाढलेली दिसत आहे. या अंकुरलेल्या हरभरा पिकात अनेक ठिकाणी माकडांनी उच्छाद मांडल्याच्या तक्रारी येत आहेत.
अभयारण्य व जंगल परिसर असलेला बुलढाणा जिल्ह्यातील काही परिसर, तसेच वाशिम व अकोला जिल्ह्यातीलही काही भागात वन्य प्राण्यांकडून शेत पिकांच्या होणाऱ्या नासधूसची समस्या नेहमीची आहे. शेतात पीक डोके वर काढत नाही तेव्हापासून ते शेतपीक घरात येईपर्यंत रोही, हरीण, रानडुकरे व माकडांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत. बरे, या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जी पारंपरिक साधने वापरली जातात त्याला आता हे प्राणी सराईत झाल्याने जुमानेनासे झाले आहेत. यातून शेतकऱ्यांवर होणारे हल्लेही वाढले आहेत. दुर्दैव असे की, शेतकऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांच्या नुकसानभरपाईची माहितीच अनेकांना नसल्याने संबंधित शेतकरी त्यापासूनही वंचित राहतात.
दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तशी आज बळिराजाची गत झाली आहे. रब्बीला पाणी देण्याची वेळ आहे, पण विजेच्या लोडशेडिंगमुळे अडचण होत आहे. विजेच्या समस्येमुळे जागोजागी आंदोलने करायची वेळ आली असून, वीज वितरण कार्यालयावर धरणे दिली जात आहेत व अधिकाऱ्यांना घेराव घातले जात आहेत. रात्रीच्या वेळी काहीशा प्रमाणात वीज उपलब्ध होत असल्याने रात्र-रात्र शेतात काढावी लागत असून, त्यात वन्य प्राण्याकडून होणारे हल्ले पाहता जीव मुठीत घेऊन पाणी भरावे लागत आहे. म्हणूनच या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी दिवाळी सरली तरी पुन्हा फटाके वाजविण्याची वेळ आली आहे.
सारांशात, वन्य प्राण्यांकडून होणारी शेत पिकांची नासधूस पाहता दिवाळी सरत आली असली तरी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फटाके लावण्याची गरज आहे. रब्बीच्या आशेवर पाणी फिरू द्यायचे नसेल तर ते आवश्यक बनले असून, जिल्हा प्रशासनानेही यात लक्ष देणे अपेक्षित आहे.