शिवजयंती राष्ट्रोत्सव होण्याच्या दिशेने पहिले पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:57 AM2018-02-20T03:57:02+5:302018-02-20T03:57:11+5:30

शिवजयंती राष्टÑोत्सव बनविण्याचे शिवधनुष्य कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा प्रथमच राजधानी नवी दिल्लीत शिवजयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली

The first step towards becoming a Shiv Jayanti Nation! | शिवजयंती राष्ट्रोत्सव होण्याच्या दिशेने पहिले पाऊल!

शिवजयंती राष्ट्रोत्सव होण्याच्या दिशेने पहिले पाऊल!

Next

शिवजयंती राष्टÑोत्सव बनविण्याचे शिवधनुष्य कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा प्रथमच राजधानी नवी दिल्लीत शिवजयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या विचारांचा जागर यानिमित्ताने घालण्यात आला.

तमाम महाराष्ट्राचे दैवत आणि स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी नवी दिल्लीत प्रथमच भव्य प्रमाणात साजरी झालीे. ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’च्या गजराने आसमंत दुमदुमला. या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानसह देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहिले. राज्यसभा सदस्य कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्या पुढाकाराने झालेला हा शिवजयंती सोहळा म्हणजे शिवजयंतीला राष्ट्रोत्सव बनविण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नाचाच हा एक भाग होता.
शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला खासदार संभाजीराजे यांनी लोकोत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भाजपाकडून त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर घेण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि विकास करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार देशभरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा,यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. यंदाची शिवजयंती दिल्लीत भव्य प्रमाणात साजरी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले होते. त्यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर नियोजन केले होते. या सोहळ्यासाठी कोल्हापुरातील शिवभक्त विशेष रेल्वेने नवी दिल्लीला गेले आहेत. महाराष्टÑ सदनातील शिवजन्मकाळ आणि शाहिरी कार्यक्रमाने या सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर राजपथावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे ढोल पथक, ६० कलाकारांचे ध्वज पथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० जणांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोल पथक सहभागी झाले होते. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या सर्व पथकांतील कलाकार आणि खेळाडूंनी सादर केलेला कलाविष्कार आणि कसरतींनी दिल्लीकरांना महाराष्टÑातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविले.
सायंकाळी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर झाला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत लिखित या महानाट्याचे प्रयोग जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेले आहेत. हाच प्रयोग आज, मंगळवारी पुन्हा एकदा सादर केला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, रक्तदान शिबिर यासारख्या कार्यक्रमांना दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चॉँद लागले.
शिवजयंती महाराष्ट्रासह काही राज्यांत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शिवरायांच्या विचारांचा जागर यानिमित्ताने केला जातो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील एक राजे असे चित्र देशभर आहे. खरे तर त्यांचे विचार आणि कर्तृत्व भारतानेच नव्हे, तर जगानेही आचरणात आणावे असे आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आता ते राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोहोचले आहे. हळूहळू ते देशभर पोहोचावेत आणि शिवजयंती राष्ट्रोत्सव म्हणून केंद्र सरकारने जाहीर करावा.
- चंद्रकांत कित्तुरे

chandrakant.kitture@lokmat.comX 

Web Title: The first step towards becoming a Shiv Jayanti Nation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.