संघाचे फुटीर राजकारण व नेहरूंचा वारसा

By admin | Published: October 13, 2014 03:34 AM2014-10-13T03:34:48+5:302014-10-13T03:34:48+5:30

सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्य सहसा कुणी गांभीर्याने घेत नाही; पण नेहरूंच्या अनुयायी इतिहासकारांची पुस्तके जाळायला सांगणारे त्यांचे वक्तव्य इतर वक्तव्यांपेक्षा थोडे वेगळे आहे.

Fleet politics of the Sangh and legacy of Nehru | संघाचे फुटीर राजकारण व नेहरूंचा वारसा

संघाचे फुटीर राजकारण व नेहरूंचा वारसा

Next

-दिग्विजयसिंह (राज्यसभा सदस्य आणि अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस )

सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्य सहसा कुणी गांभीर्याने घेत नाही; पण नेहरूंच्या अनुयायी इतिहासकारांची पुस्तके जाळायला सांगणारे त्यांचे वक्तव्य इतर वक्तव्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. भारताच्या इतिहासात नेहरूंच्या योगदानाला कमी लेखण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कटकारस्थानाचा हा एक हिस्सा
आहे. संघवाले फार पूर्वीपासून इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करीत आहेत. ती वेळ आता आली आहे, असे
त्यांना वाटते. देशात स्पष्ट बहुमताचे सरकार बनविण्याची संधी त्यांना मिळाली आहे, त्यामुळे त्यांना तसे वाटत
असावे. जनमताचा स्पष्ट कौल मिळाल्यामुळे आपण
काहीही करू शकतो, इतिहासही बदलू शकतो, असे त्यांना वाटते.
महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. गांधींनी त्यांना आपला उत्तराधिकारी नेमले होते. देशाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले होते. सुब्रमण्यम स्वामी कोण आहेत? स्वामी ही राजकारणातील अशी एक व्यक्ती आहे, की जिला कधी संघ जवळ करतो, कधी नाकारतो आणि पुन्हा पदरात घेतो. स्वामी नेहमी चिथावणीखोर भाषणे देत असतात. सर्वसाधारणपणे त्याकडे कुणी लक्ष देत नाही. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक घोषणा केली, की नेहरूंच्या जयंतीपासून इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत देशात स्वच्छता अभियान चालविले जाईल. या दोन महान पंतप्रधानांचे अस्तित्व मोदींनी प्रथमच जाहीरपणे मान्य केले असावे. संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांची ही अडचण आहे, की त्यांच्या नेत्यांमध्ये असा कुणीही नाही की ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला होता, त्यामुळे
महात्मा गांधी, नेताजी बोस, सरदार पटेल या काँग्रेसच्या महान नेत्यांचा वारसा लाटण्याची त्यांची धडपड सुरू असते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारात भाजपाने गांधीवादी समाजवादाचा सिध्दांत मांडला होता. त्यातून महात्मा गांधींशी नाते जोडण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. या बहाण्याने स्वातंत्र्यलढ्याशी संघाचे संबंध साधण्याचा त्यांचा डाव होता. तो फुकट गेला, कारण या प्रयोगाचा त्यांना काही राजकीय फायदा मिळाला नाही, त्यामुळे ते पुन्हा कट्टर सांप्रदायिकता आणि धार्मिक उन्मादावर आधारित आपल्या राजकारणाकडे वळले. राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा फुटीर अजेंडा आणण्याचे राजकारण नव्याने सुरू झाले.
पुढे सरदार पटेल यांना आपलेसे करण्याची मोहीम सुरू झाली. पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात प्रचंड मतभेद होते, असा जोरदार प्रचार केला गेला; पण इतिहासाचा कुणीही जाणकार सांगेल, की असे काहीही नव्हते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्याची गोष्ट करायचे. या पुतळ्यासाठी जनतेने
लोखंड दान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. रामाचे
मंदिर बांधण्यासाठीही संघाने देशभरातून विटा मागविल्या होत्या. मोदी आज पंतप्रधान आहेत; पण आता ते लोहपुरुष सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे नाव घेत नाहीत. अलीकडे
ते स्वत:ला धर्मवेड्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा
प्रयत्न करीत आहेत. तोडफोडीच्या राजकारणासाठीच
त्यांचे प्रशिक्षण झाले आहे, तो भाग वेगळा. स्वत:ला
मुत्सद्दी राजकारणी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात मोदी भारतीय मुसलमानांच्या बाजूनेही वक्तव्य करीत आहेत. लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात त्यांनी देशात जातीय सलोखा राखण्याचेही आवाहन करून टाकले.
पण प्रश्न हा आहे, की बिबट्या आपल्या अंगावरील पट्ट्यांचा रंग बदलू शकत नाही, तसा माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही. काँग्रेसमुक्त राजकारणाचा नारा देऊन संघ आणि भाजपा राष्ट्रीय राजकारणात ते स्थान मिळवू पाहतो, जिथे काँग्रेस आधीपासून बसली आहे. संघाचा विभाजनवादी अजेंडा राबविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींसारख्या संघवाल्यांना मोकळे सोडण्यात आले आहे. जातीय दंगलींतील आरोपींना सन्मानित करण्यात येत आहे. संघ परिवारातील नेत्यांना भडकावणारी भाषणे देण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. प्रत्येक घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. स्वातंत्र्यसंग्राम आणि नव्या भारताच्या निर्मितीमध्ये नेहरू-गांधी परिवाराच्या योगदानाला कमी लेखण्याचा संघ परिवाराचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय राजकारणाचे अधिकाधिक ध्रुवीकरण हाच त्यांचा अजेंडा आहे.
प्रश्न हा आहे, की समाजातील जबाबदार लोक असे होऊ देतील का? चुकीचा इतिहास लिहू देतील का? राष्ट्रीय नेता बनण्याच्या धडपडीत सुब्रमण्यम स्वामी, महंत आदित्यनाथ यांसारख्या लोकांना मोदी कसे रोखतात, ते आता पाहायचे. त्यांना रोखले जाईल, की संघाच्या फुटीर अजेंड्यावर काम करण्यासाठी मोकळे सोडले जाईल, ते पाहायचे. दुटप्पीपणाची भाषा करण्यात संघाचा हात कुणी धरू शकत नाही, हे सर्वांना ठाऊक आहे.

Web Title: Fleet politics of the Sangh and legacy of Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.