मिहानचे उड्डाण

By admin | Published: August 30, 2015 09:46 PM2015-08-30T21:46:22+5:302015-08-30T21:48:30+5:30

गेली १५ वर्षे नुसत्याच रखडलेल्या नागपूरच्या मिहान प्रकल्पाने रिलायन्स कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधून थेट आकाशात झेप घेतली आहे. अनिल अंबानी यांच्या

Flight of mihan | मिहानचे उड्डाण

मिहानचे उड्डाण

Next

गेली १५ वर्षे नुसत्याच रखडलेल्या नागपूरच्या मिहान प्रकल्पाने रिलायन्स कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधून थेट आकाशात झेप घेतली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडचा सहा हजार ५०० कोटींचा २८९ एकर जागेवर उभारला जाणारा हवाई प्रकल्प त्यात आल्यामुळे मिहानचा नवी उड्डाणे घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. विमानांची जुळणी व निर्मिती, हवाई क्षेत्रातील सुट्या भागांची घडण, हेलिकॉप्टर्सचे सुटे भाग बनविणे आणि हवाई सामग्रीसाठी सर्वसमावेशक हबची निर्मिती करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप असून, त्यामुळे तीन हजार प्रत्यक्ष व २० हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या या एअरोस्पेसपार्कला येथे आणण्याची कामगिरी यशस्वी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे साऱ्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. हा प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून देशातील पाच राज्यांची सरकारे रिलायन्सच्या अनिलभाई अंबानी यांच्या मागे लागली होती. त्या साऱ्यांना बाजूला सारून हा प्रकल्प नागपूर व विदर्भात (आणि महाराष्ट्रात) आणणे ही कामगिरी मोठी आहे आणि या दोघांनी ती पूर्ण केली आहे. मिहानच्या उभारणीला आरंभ झाला तेव्हा त्यात ६५ हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होईल अशी अपेक्षा होती; परंतु प्रशासकीय व राजकीय अडचणींमुळे ती पूर्ण झाली नाही. रिलायन्सच्या या प्रकल्पामुळे ही अपेक्षा थेट दहा टक्क्यांएवढी पूर्ण होणार असून, मिहानचा चेहराही त्यामुळे बदलणार आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक विकसित व उद्योगप्रधान राज्य असले, तरी विदर्भ व कोकण हे त्याचे विभाग त्यात फार मागे राहिले आहेत. औद्योगिक संरचना आहेत, रेल्वेची दक्षिणोत्तर सोय आहे, पाणी आणि वीज आहे शिवाय तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्याही मोठी आहे. मात्र एवढे असूनही बड्या राष्ट्रीय कंपन्या या प्रदेशांमध्ये आपले उद्योग आणायला आजवर तयार होत नव्हते. परिणामी सरकारची व नेतृत्वाची आश्वासनेही वाऱ्यामोलाची ठरत होती. गेले दीड दशक चाललेल्या विकासाच्या या मंदगती प्रवासाला आता चालना मिळेल आणि नव्या उद्योगाचे उत्पादनही रिलायन्सच्या वेगवान गतीने सुरू होईल. रिलायन्स ही उद्योगांना दिशा दर्शविणारी कंपनी असल्यामुळे तिच्यामागून देशातील इतर कंपन्या व औद्योगिक घराणी मिहान आणि विदर्भ यांच्याकडे अधिक विधायक दृष्टीने पाहू लागतील हे अपेक्षित आहे. राज्याचे प्रशासन कमालीच्या मंदगतीने कारभार करते हा आजवरचा समजही यानिमित्ताने चुकीचा ठरला आहे. रिलायन्सला हवी असलेली जमीन अवघ्या ६९ दिवसांत हस्तांतरित करण्याचा प्रशासनाचा यातील विक्रम आता सुटा व एकटा मात्र राहू नये. याच गतीने हे प्रशासन पुढेही चालू लागले तर विदर्भाएवढीच महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील घोडदौड सुरू राहील आणि राज्याचा विकसनशीलतेतला पहिला क्रमांकही कायम राहील. मुळात संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात खासगी उद्योगांना प्रवेश द्यावा की देऊ नये या प्रश्नाचाच घोळ दिल्लीत अनेक वर्षे चालू राहिला. परिणामी ते क्षेत्र शासकीय उद्योगांसाठीच राखीव झाले. परिणाम हा की लष्करी विमाने, रणगाडे आणि साध्या प्रगत बंदुकांना लागणारे सुटे भागही देशाला विदेशातून आयात करावे लागले. अनिल अंबानी यांच्याशी बोलताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘साधी अश्रुधुराची कांडीसुद्धा आपण विदेशातून आणतो’ असे सांगितले होते. असे आरक्षित राहिल्यामुळे मागे राहिलेले संरक्षणाचे क्षेत्र आता खासगी उद्योगांसाठी खुले झाले आहे. रिलायन्सचा हवाई प्रकल्प मिहानमध्ये येणे हा त्याचाच स्वागतार्ह पुरावा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केलेल्या अमेरिका दौऱ्यात तेथील गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे जे प्रयत्न केले त्यांनाही यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. रिलायन्सचा उद्योग ज्या वेगाने प्रत्यक्षात यायला मदत झाली तो वेगच अशा विदेशी उद्योगांना येथे यायला उद्युक्त करील. मिहानच्या उभारणीला आवश्यक असलेली दुसरी धावपट्टी बांधण्याच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले असल्याने त्या उभारणीतील तो अडसरही आता गेला आहे. ही धावपट्टी होणार नाही अशाच तऱ्हेचा आपल्या जमिनीच्या मोबदला मागणारे स्थानिक पुढाऱ्यांचे आंदोलन हेही आतापर्यंतच्या विलंबाला कारणीभूत झाले हेही येथे नोंदविणे आवश्यक आहे. धावपट्टी होत नाही तोवर मिहान उड्डाणच घेणार नाही असे वाटून अनेकांनी त्याच्या पूर्तीची आशा सोडली होती. अनिल अंबानी यांच्या आताच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तत्परतेने ती आशा पुन्हा जागी केली आहे. हा प्रकल्प त्याच्या अपेक्षित गतीने पूर्ण व्हावा आणि त्याच्या जोडीने इतरही मोठे प्रकल्प मिहानमध्ये व पर्यायाने विदर्भात यावे आणि या प्रदेशाचा विकासविषयक अनुशेष भरून निघावा अशी शुभेच्छाच अशावेळी व्यक्त करणे आवश्यक आहे. रिलायन्स ही देशातील अग्रगण्य औद्योगिक कंपनी आहे. तिचा प्रवास केवळ वेगवानच नव्हे तर प्रेरणादायी ठरला आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स यांच्या या प्रेरणेने इतरांनाही त्यांचे प्रकल्प येथे आणायला उद्युक्त करावे ही अपेक्षा आहे.

Web Title: Flight of mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.