तो तिच्यावर सुऱ्याचे वार करतच राहिला; या ‘मुलाला’ फाशी की जन्मठेप?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:26 AM2023-02-22T10:26:14+5:302023-02-22T10:27:07+5:30

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात घडलेल्या एका घटनेनं मुलांमधील हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

Florida teen Aiden Fucci pleaded guilty to the brutal 2021 murder of 13-year-old cheerleader Tristyn Bailey | तो तिच्यावर सुऱ्याचे वार करतच राहिला; या ‘मुलाला’ फाशी की जन्मठेप?

तो तिच्यावर सुऱ्याचे वार करतच राहिला; या ‘मुलाला’ फाशी की जन्मठेप?

googlenewsNext

लहान मुलांमध्ये हिंसाचाराची प्रवृत्ती का वाढीस लागते? लहान मुलं आपण निष्पाप मानतो, तरीही एखाद्या किंवा अनेकांचा जीव घेण्याची हिंसक प्रवृत्ती त्यांच्यात कुठून निर्माण होते? आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्यावर झालेले संस्कार, हिंसाचाराला घरातून आणि समाजातून कळत-नकळत मिळत असलेलं प्रोत्साहन, हाताशी असलेल्या मोबाइलवरील हिंसक व्हिडीओ गेम्स, टीव्ही, सीरिअल्सवर दिसत असणारा हिंसाचार, चित्रपटातील त्याचं उदात्तीकरण... अशी अनेक कारणं त्यामागे दडलेली असली तरी दहा-बारा-पंधरा वर्षांची मुलं इतक्या टोकाला कशी जाऊ शकतात, याचं एक भलंमोठं कोडं समाजाला आहेच. जगातील कोणताही प्रांत आणि कोणताही कोपरा याला अपवाद नाही. अमेरिकेसारख्या देशात तर यावरून नेहमीच वादविवाद, चर्चा होत असतात. त्यावरच्या उपायांविषयीही सातत्यानं सरकार-दरबारी मागणी करण्यात येत असते; पण त्यात अजून तरी फारसा फरक पडलेला नाही.

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात घडलेल्या एका घटनेनं मुलांमधील हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरे तर ही घटना घडली दोन वर्षांपूर्वी; पण आता पुन्हा ती नव्याने चर्चेत आली आहे. फ्लोरिडा प्रांतातील जॅकसनव्हिले या छोट्याशा प्रांतात असलेली दोन शाळकरी मुलं. चौदा वर्षांचा एडन फुसी आणि त्याच्याच वर्गात असणारी त्याची मैत्रीण ट्रिस्टीन बेली. एडन फुसी हा तसा सर्वसामान्य, सर्वसाधारण मुलगा. शाळा, अभ्यास, खेळणं... शाळकरी मुलांच्या आयुष्यात जे काही असतं, जे काही चालतं, ते सारं  त्याच्याही आयुष्यात सुरू होतं. अचानक त्याच्या मनात हिंसाचाराच्या भावना उफाळून यायला लागल्या. कोणाला तरी मारण्यासाठी त्याचे हात शिवशिवायला लागले. आपल्या मित्रांमध्येही त्याविषयी तो उघडपणे बोलू लागला. मला कोणाचा तरी खून करावासा वाटतोय. काहीजणांना या जगातून कायमचं संपवावं, असा विचार कधीचा माझ्या मनात येतो आहे. माझा आतला आवाज त्यासाठी मला साद घालतो आहे.. एडन ‘काहीतरी गंमत करीत असेल, गमतीनं असं बोलत असेल,’ असं त्याच्या मित्र-मैत्रिणींना वाटलं आणि त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं; पण एडनच्या मनातील हिंसेची भावना दिवसेंदिवस वाढतच होती. इतकी की, शाळेत चित्रकलेच्या तासाला किंवा कुठलंही काही चित्र त्यानं काढलं तरी त्यात हिंसाचाराचं प्रतिबिंब उमटायला लागलं. एखाद्याचा खून, त्याचा मृतदेह, रक्त, अवयव तोडलेल्या अवस्थेतील आकृती, सुऱ्याने भोसकून छिन्नविच्छिन केलेला देह... असल्या साऱ्या गोष्टी त्याच्या चित्रांमध्ये दिसायच्या. मित्रांना आणि त्याच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी हा बदल टिपला; पण त्यांना त्यात फारसं काही वावगं वाटलं नाही. हिंसाचारयुक्त व्हिडीओ गेम्स, सिरियल्स बघतातच; त्यातून त्यानं केलेलं हे चित्रण असेल असं त्यांना वाटलं; पण ही ‘अभिव्यक्ती’ फक्त चित्रापुरतीच नव्हती. आयुष्यातून उठवण्यासाठी पहिल्यांदा कोणाला निवडायचं याचा विचार केल्यानंतर एडनच्या डोक्यात त्याच्याच वर्गातील ट्रिस्टीन बेली हिचं नाव समोर आलं. ठरलं. त्यानं  तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली आणि एके दिवशी सरळ धारदार चाकूनं तिला भाेसकलं. ट्रिस्टीनवर त्यानं किती वार केले असावेत? - तब्बल ११४! ट्रिस्टीन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, सुऱ्याच्या पहिल्या काही घावांनीच तिचा मृत्यू झाला, तरीही एडन थांबला नाही. तो तिच्यावर सुऱ्याचे वार करतच राहिला. 

ट्रिस्टीन ही शाळेतील मुला-मुलींमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर असलेली मुलगी. चिअरलीडर म्हणून ती काम करायची. एडनच्या या कृत्यानं संपूर्ण शाळाच नव्हे, तर संपूर्ण देश आणि जगही हादरलं. सोशल मीडियावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. दोन वर्षांपूर्वी, २०२१ला मदर्स डेच्या दिवशी ही घटना घडली. एडन आता १६ वर्षांचा आहे आणि आपल्या गुन्ह्याची कबुली त्यानं नुकतीच कोर्टापुढे दिली आहे. आपला गुन्हा कबूल करताना एडन म्हणतो, हो, मी ट्रिस्टीनला ठार केलं. मी जे काही केलं, त्याबद्दल ट्रिस्टीनचे कुटुंबीय आणि माझे कुटुंबीय यांच्याबद्दल मला खेद आहे... बस्स! 

एडनला आता कोणती शिक्षा द्यावी, द्यायला हवी, याबाबत तज्ज्ञांमध्ये चर्चा, वादविवाद सुरू आहेत. एडनला आत्ता ‘प्रौढ’ म्हणून वागणूक देण्यात येत असली, तरी ज्यावेळी त्यानं गुन्हा केला, त्यावेळी तो चौदा वर्षांचा असल्यानं सध्याच्या नियमाप्रमाणं त्याला मृत्युदंडाची शिक्षा देता येणार नाही. अनेकांना हे मान्य नाही.

‘लहान’ की ‘मोठा’? - जगभरात चर्चा ! 
अमेरिकेत आणि जगभरात सुरू झालेली एक चर्चा मात्र अजूनही संपलेली नाही. इतक्या निर्घृणपणे आपल्या मैत्रिणीला संपवणाऱ्या एडनला ‘लहान’ कसं मानावं? अशी मुलं वयानं लहान असली तरी त्यांना फासावरच लटकवायला हवं, याबाबत अनेकांचं एकमत आहे. अमेरिकेतही त्याच बाजूनं जनमत झुकलेलं आहे. त्यासाठी कायदा बदलावा, अशी अनेकांची मागणी आहे.

Web Title: Florida teen Aiden Fucci pleaded guilty to the brutal 2021 murder of 13-year-old cheerleader Tristyn Bailey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.