धक्कादायक! कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:36 AM2020-04-16T00:36:35+5:302020-04-16T00:36:48+5:30
इंडोनेशिया हा एक मोठा द्वीपसमूह. कोरोनाचं संकट वाढायला लागलं तसं त्यांचा शेजारी देश मलेशियानंही आपल्याकडे लॉकडाऊन केलं. हजारो कामगार बेकार झाले
सध्याच्या काळात प्रत्येकाला आपलं घर प्यारं झालं आहे. स्वत:ची प्रगती व्हावी, विकास व्हावा म्हणून अनेकांनी आपापला प्रदेश सोडून कामधंद्यासाठी दुसरीकडे सहारा शोधला होता; पण कोरोनाच्या महामारीनं सर्वांनाच देशोधडीला लावलं आणि आपलं किडुकमिडुक आवरून त्यांना पुन्हा स्वत:च्या घरी जाण्यास भाग पाडलं. स्थलांतरितांसाठी तर हा अक्षरश: जीवनमरणाचा प्रश्न. त्यामुळे ठिकठिकाणच्या स्थलांतरितांनी आपल्या देशाचा, गावाचा रस्ता धरला.
इंडोनेशिया हा एक मोठा द्वीपसमूह. कोरोनाचं संकट वाढायला लागलं तसं त्यांचा शेजारी देश मलेशियानंही आपल्याकडे लॉकडाऊन केलं. हजारो कामगार बेकार झाले. त्यामुळे मलेशियात असलेल्या इंडोनेशियन नागरिकांनीही आपल्या मायदेशी जाण्याचं ठरविलं. फेरी बोटींनी काहीजण आपल्या देशात पोहोचलेही. पण, हा प्रकार इंडोनेशिया प्रशासनाला कळल्यावर तेही सज्ज झाले. त्यात एका बोटीतील तीन क्रू मेंबर्सना कोरोना झाला असल्याची माहिती त्यांना मिळाली. या बोटीत अडीचशेवर प्रवासी होते. तोपर्यंत प्रवाशांनाही ही माहिती नव्हती. इंडोनेशियन प्रशासनानं किनाऱ्याच्या अलीकडेच ही बोट थोपविली. आपल्याला आता परत फिरावं लागेल, किनाºयावर उतरू देणार नाहीत आणि बोटीतील कर्मचाऱ्यांमुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं शेवटी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या घेतल्या. काहींनी बोटीत होती तेवढी लाइफ जॅकेट्स उचलली, तर काहींनी तशाच उड्या मारल्या. त्यातले काहीजण किनाºयाला लागले, तर काहींचा अद्याप पत्ता नाही. कोरोना तर अनेकांचा जीव घेतोच आहे, पण त्याची भीतीही अनेकांचं आयुष्य संपवितं आहे!..