विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

By मनोज गडनीस | Published: June 16, 2024 07:44 AM2024-06-16T07:44:59+5:302024-06-16T07:45:51+5:30

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

Flying landing of the plane the distance of one breath | विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी:  गेल्या शनिवारी मुंबईविमानतळावर एकीकडे एअर इंडिया कंपनीचे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आले आणि ते उड्डाण घेत असताना मागील बाजूने इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरले. दोन विमानांमध्ये जेमतेम पाचशे मीटरचे अंतर होते. यापैकी एका जरी विमानाचे नियंत्रण सुटले असते किंवा अचानक विमानात तांत्रिक दोष निर्माण झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, असे का झाले? दोन विमाने एकाचवेळी धावपट्टीवर आली याला केवळ एक घटना म्हणून पाहता येणार नाही. तर याच्या मुळाशी गेल्यास मुंबई विमानतळाची रचना, रोज होणारी महाकाय विमान वाहतूक या मुद्द्यांनाही विचारात घेणे गरजेचे आहे. तरच, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणे शक्य होईल.

१८५० एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलेल्या मुंबई विमानतळावरील सर्वांत मोठी समस्या आहे ती धावपट्टीची. देशात किंवा जगात बहुतांश विमानतळांवर दोन, तीन किंवा त्यापेक्षा अधिक धावपट्ट्या या समांतर रेषेत असतात. मात्र, मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या या काटकोनात आहेत. त्यामुळे एकावेळी एकच उड्डाण किंवा एका विमानाचे लैंडिंग होते.

 

२००० सालच्या सुरुवातीला जेव्हा मुंबई विमानतळाचा पुनर्विकास झाला त्यावेळी मुंबई विमानतळाला साधारणपणे अर्धगोलाकार स्थितीत वेढा घालून असलेल्या झोपड्या हटवून विमानतळ परिसर वाढवून या धावपट्ट्या समांतर करण्याचा विचार झाला होता. त्या दृष्टीने नियोजनही झाले होते. मात्र, या झोपडपट्ट्यांवर ज्यांच्या मतांची मदार आहे त्या स्थानिक राजकारण्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणाला आणि झोपड्या हटविण्याला प्रचंड विरोध केला. राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून विमानतळाची पुनर्रचना झाली तर किमान दुर्घटनेचे भूत मानगुटीवर बसणार नाही.

मुंबईत ताशी ३० विमाने

■ सद्यःस्थितीत मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यग्र विमानतळ आहे. या विमानतळावरून दिवसाकाठी ९५० पेक्षा जास्त विमानांची ताशी ३० विमाने ये-जा होते.

■ या नियमित विमानांखेरीज मुंबई विमानतळावरून खासगी विमाने तसेच मालवाहू विमानांचा प्रवासही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे विमान वाहतूक कक्षातील अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून प्रत्येक मिनिटाकाठी होणाऱ्या उड्डाणाचे नियोजन करावे लागते.

■ हे नियोजन केवळ कागदोपत्री होत नाही. एटीसीकडून उडाणासाठी अनुमती दिली जाते त्यावेळी विमानाने निर्धारित वेळेत उड्डाण करणे अपेक्षित असते. त्यात एका सेकंदाचाही विलंब झाला तरी धावपट्टीवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडू शकते. काटकोनी धावपट्ट्यांवर जी विमाने उतरण्याच्या तयारीत असतात, अशा विमानांना अनुमती देताना संबंधित विमानाचे आकारमान, त्याचा वेग आणि विमानतळ परिसरात असलेल्या वाऱ्याचा वेग याचे गणित मांडून अनुमती दिली जाते.

काटकोनात असलेल्या धावपट्ट्यांवर जेव्हा एकावेळी एकाच विमानाचे उड्डाण किंवा लैंडिंग होत असते आणि त्यात या तांत्रिक गणितांचा विचार "करायचा असतो तेव्हा ते काम निश्चितच आव्हानात्मक असते, हे खरे.

Web Title: Flying landing of the plane the distance of one breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.