अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:12 PM2019-03-15T20:12:00+5:302019-03-15T20:12:32+5:30
शेतक-यांच्या खात्यावर हजारांमध्ये सन्माननिधी पोहोचविण्याचा आटापिटा सुरू असला तरी सतत शेतकरी आत्महत्येच्या बातम्या कानावर धडकत आहेत.
- धर्मराज हल्लाळे
शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली. तो दिवस होता १९ मार्च. साधारणपणे ३३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला आजही थांबत नाही. शेतक-यांच्या खात्यावर हजारांमध्ये सन्माननिधी पोहोचविण्याचा आटापिटा सुरू असला तरी सतत शेतकरी आत्महत्येच्या बातम्या कानावर धडकत आहेत. देश आणि राज्यातील हा चिंतेचा विषय सोडविण्याचा दावा सर्व सरकारे करत आली आहेत. त्याचवेळी कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या, याचेही राजकारण होत आहे. मात्र समस्येच्या मुळाशी जाऊन शेतक-यांच्या कष्टाला योग्य दाद मिळत नाही आणि त्याच्या तक्रारीचीही कोणी फिर्याद घेत नाही. भाव, हमीभाव हवेत असतात. कायदे विरोधात असतात. धोरणे बदलत असतात. अशी विचित्र अवस्था आहे. अशावेळी निमूटपणे पाहणारा समाज हा बळीराजाचे आत्मबळच नाहिसे करीत आहे. तिथेही एखादा आशेचा किरण दिसतो, तो अन्नत्यागासारख्या व्यापक आंदोलन आणि चळवळीतून. किसानपुत्र आंदोलन उभारणारे अमर हबिब यांनी गेल्या तीन वर्षांपासून राज्यभर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. दरवर्षी १९ मार्च रोजी प्रत्येकाने एक दिवस उपवास करावा, हा एक सत्याग्रही विचार अमर हबिब यांनी मांडला.
पहिल्या वर्षी म्हणजेच १९ मार्च २०१७ रोजी अमर हबिब यांनी साहेबराव करपे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावी उपवास केला. दुसºया वर्षी जिथे आत्महत्या झाली, त्या दत्तपूरला भेट देऊन पवनारला उपोषण केले. शेतक-यांच्या आत्महत्यांकडे मी निमूटपणे पाहणार नाही, मी माझी भूमिका मांडेन. मी अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीन, त्याच्या कष्टाला सलाम करीन ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन टप्प्या-टप्प्याने व्यापक होत गेले. यंदा १९ मार्च रोजी दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर राजघाटावर उपवास केला जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमर हबिब ज्यावेळी दिल्लीत उपवास करतील, त्याचवेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संवेदनशील नागरिक आणि किसानपुत्र एक दिवसाचा उपवास धरतील. यंदाची ही संख्या लाखोंच्या घरात असणार आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर किसानपुत्र आंदोलनाशी जोडलेले अनेक तरुण आपापल्या नोकरीच्या ठिकाणी राहून देशाच्या कानाकोप-यातील मोठ्या शहरांमध्येही उपवास करणार आहेत. गेल्यावर्षी परदेशात नोकरी करणा-या किसानपुत्रांनीही उपवास धरला होता.
सशस्त्र जुलमी राजवट करणा-या इंग्रजांना अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी सळोकीपळो करून सोडले होते. सामान्य माणसांना सहज साधता येईल, असे सत्याग्रही आयुध महात्मा गांधींनी देशाला दिले. उपवास, परदेशी कपड्यांची होळी, मिठाचा सत्याग्रह अर्थातच ‘उचललेस तू मीठ मूठभर, खचला साम्राज्याचा पाया’ हे जे घडले ते सामान्य माणसांच्या ताकदीतूनच. ते सामर्थ्य गांधी विचारात होते आणि त्याच विचारांना पाईक मानून किसानपुत्र आंदोलन पुढे येत आहे. नक्कीच हे राजनैतिक आंदोलन नाही, तर नैतिक अधिष्ठान दाखविणारे, कृतज्ञता आणि संवेदनशीलता दर्शविणारे अन्नत्याग आंदोलन आहे. त्यात काही ठिकाणी मागण्या मांडल्या जातील. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, ही भूमिका सांगितली जाईल. त्याहीपेक्षा अन्नदाता जो जीवनाचा त्याग करीत आहे, त्याला धैर्य देणारे हे आंदोलन असणार आहे.
जो आपणा सर्वांचा अन्नदाता आहे, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवस उपवास करावा ही भूमिका आहे. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी समविचारी कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक एकत्र येऊन, एकत्र बसून अन्नत्याग आंदोलन करतील. शिवाय, ज्यांना एकत्र बसणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या कामावर हजर राहून एकदिवस उपवास केला पाहिजे. जे शेतक-यांच्या घरात घडते आहे, ते आपल्याच कुटुंबात घडले तर आपणासाठी तो दिवस अन्नत्यागाचा असतो. हीच संवेदना ध्यानी ठेवून प्रत्येकाने एकदिवस उपवास केला तर आत्महत्या करणा-या हजारो शेतक-यांचे स्मरण होईल. स्मरणातूनच विचार प्रकट होतील. याच विचारांचे तयार झालेले वायूमंडळ समाजात बदल घडवील, अशी अपेक्षा आहे.