फुटबॉलच्या मैदानात एका चुंबनाने वादळ उठवले, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 08:38 AM2023-08-30T08:38:58+5:302023-08-30T08:39:14+5:30

स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष लुईस रुबियालीस यांनी जगज्जेत्या संघातील जेनिफर हर्मोसचे चुंबन घेतले, त्यावरून स्पेनमध्ये निषेधाचे रान उठले आहे!

Football: Spain soccer chief Luis Rubiales amid row over kiss with Women's World Cup winner | फुटबॉलच्या मैदानात एका चुंबनाने वादळ उठवले, त्याची गोष्ट!

फुटबॉलच्या मैदानात एका चुंबनाने वादळ उठवले, त्याची गोष्ट!

googlenewsNext

- भक्ती चपळगांवकर, मुक्त पत्रकार

या वादळाची सुरुवात एका चुंबनाने झाली. स्पॅनिश महिला फुटबॉलर्स इंग्लंडच्या टीमला हरवून विश्वविजेत्या बनल्या. त्यांना सुवर्ण पदक बहाल करण्याच्या कार्यक्रमात स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांनी, लुईस रुबियालीस यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर हस्तांदोलन करायला आलेल्या जेनी हर्मोस या खेळाडूचे डोके दोन्ही हातांनी जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकविले. या कार्यक्रमानंतर झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये जेनीने ‘हा प्रकार मला आवडला नाही,’ असे सांगितल्यानंतर रुबियालीस यांच्यावर टीकेची राळ उडाली आणि आता त्याचे रूपांतर एका देशव्यापी आंदोलनात झाले आहे.

खेळ महिलांचे असले तरी त्यावर नियंत्रण रुबियालीस यांच्यासारख्यांचे असते, हे दृश्य जगभरात आहे. रुबियालीससारखे मस्तवाल एका वेगळ्या जगात राहतात, जिथे अनिर्बंध सत्ता आणि आजूबाजूला हुजरे असतात. या चुंबन प्रकरणानंतर रुबियालीस यांची मस्ती कायम तर राहिलीच; पण, स्त्रियांनी आपल्या होकाराशिवाय झालेल्या लैंगिक कृतींबद्दल तक्रार केली; तर जो मार्ग पुरुष सत्ताधिकारी अवलंबतात, तोच त्यांनीही स्वीकारला. सगळ्यांत आधी एक भली मोठी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले, ‘जे झाले ते संमतीने झाले. त्या चुंबनाला जेनीचा होकार होता आणि हे सगळे भावनेच्या भरात झाले. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!’ 

या पत्रकार परिषदेत पहिल्या रांगेत फुटबॉल असोसिएशनच्या महिला कर्मचारी पडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या दिसतात. रुबियालीस यांच्या आदेशामुळेच आपल्याला तिथे बसावे लागले, असे त्यांनी नंतर सांगितले; तर जेनीने रुबियालीसचा दावा थेटपणे फेटाळला. 
लैंगिक छळाचे आरोप परतवताना बहुसंख्य पुरुष जे करतात, तेच रुबियालीस यांनीही केलं. जेनीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न आणि या सगळ्यांत मीच कसा बळी पडलो आहे, हे ओरडून ओरडून सांगणं! पण, जेनी एकटी नाही. स्पॅनिश फुटबॉल संघातील महिला खेळाडूंबरोबरच काही पुरुष खेळाडू, संघाचे मॅनेजर्स, कर्मचारी, आता तर आख्खा स्पेनच जेनीच्या बाजूने रस्त्यांवर उतरला आहे. तिथली समाजमाध्यमे तिच्या मागे उभी आहेत. 

जेनीला पाठिंबा म्हणून स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनच्या कोचिंग स्टाफने राजीनामे दिले; पण, मॅनेजर होर्गे विल्डा यांनी रुबियालीसच्या बाजूने किल्ला लढवला. या विल्डाच्या छळाला कंटाळून सप्टेंबर २०२२ मध्ये १५ महिला खेळाडूंनी संघ सोडला. त्याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे आपण टीम सोडत असल्याचे त्यांनी सांगितले, या प्रकरणात रुबियालीस यांनी विल्डा यांची पाठराखण केली होती! 
रुबियालीस यांचा दरारा मोठा आहे. ते फक्त स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षच नव्हे, तर युरोपियन फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. आधीच फुटबॉल अतिशय लोकप्रिय आणि पैसा खेचणारा श्रीमंत खेळ, त्यात इतकी सत्ता हातात; त्यामुळे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, असा माज रुबियालीस यांच्यात असणं स्वाभाविकच!  स्पेनचे क्रीडामंत्री म्हणत होते की, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे; पण नियमांनुसार कोर्टाने रुबियालीस यांना दोषी ठरविणे गरजेचे आहे. दुसरीकडे जेनी हर्मोसचीच चौकशी करण्याची घोषणा स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनने केली. 
चार-एक दिवस हा गोंधळ सुरू राहिल्यावर ‘फिफा’ने जागतिक फुटबॉल संघटनेने पुढे येत रुबियालीस यांना निलंबित केले आणि जेनीने माघार घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जाऊ नये म्हणून तिच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याला रुबियालीस किंवा स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनवर बंदी घातली.

भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषणवर लैंगिक छळाचे आरोप केले तेव्हा त्यात ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडूही होते. पण, दुर्दैवाने त्या आरोपांची चौकशी होण्यापूर्वीच त्याचे राजकारण झाले. आपली पदके गंगेत विसर्जित करायला निघालेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय घेताना लोकांनी त्यात पक्षीय राजकारण शोधले, हा इतिहास ताजाच! 
महिलांसाठी खेळांचे सगळे प्रकार खुले आहेत. त्या हवा तो क्रीडा प्रकार निवडू शकतात हे सत्य आहे; पण, त्या जगज्जेत्या ठरल्या तरी आदर आणि समानता या दोन गोष्टी मिळविण्यासाठी त्यांना आणखी झगडावे लागणार हे निश्चित.

Web Title: Football: Spain soccer chief Luis Rubiales amid row over kiss with Women's World Cup winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.