महिलाशक्तीची अग्रदूत
By admin | Published: March 9, 2017 03:55 AM2017-03-09T03:55:53+5:302017-03-09T03:55:53+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा यज्ञ एकोणिसाव्या शतकातच प्रज्वलित केला होता.
- विजय बाविस्कर
संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा यज्ञ एकोणिसाव्या शतकातच प्रज्वलित केला होता.
‘शिक्षणामुळे समाजातील तीव्र विषमतेचे प्रखर भान येऊन आपले जीवन समृद्ध होते’ या विचाराचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांची १२०वी पुण्यतिथी ही जागतिक महिला दिनाला जोडूनच येत आहे. तळागाळातील जनतेमध्ये शैक्षणिक परिवर्तन घडवून सामाजिक पातळीवर उद्धार करण्यासाठी सावित्रीबार्इंनी आपले आयुष्य खर्ची घातले. महात्मा फुले यांचे आयुष्य हा समाजाच्या सर्व प्रकारच्या निरपेक्ष सेवेकरिता केलेला आत्मयज्ञच होता. त्या यज्ञात स्वत:ला सर्वार्थाने समर्पित करू इच्छिणारी पत्नी सावित्रीबार्इंच्या रूपाने त्यांना लाभली. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारशी किंंमत नव्हती; किंबहुना हेटाळणी होती. तत्कालीन उच्च समजल्या जाणाऱ्या वर्गातही स्त्रीशिक्षणाविषयी अनास्थाच होती. फुले पती-पत्नींनी मुलींच्या शाळा चालविण्याचे व्रत घेतले. पुरोगामी भूमिकेसाठी त्यांचा अनन्वित छळ झाला; पण कोणत्याही अडचणींनी या दाम्पत्याला त्यांच्या ध्येयापासून विचलित केले नाही.
जोतिबांच्या शिक्षणकार्यात सहकार्य देण्यासाठी सावित्रीबाई स्वत: शिकल्या. अध्यापन, शाळांचे व्यवस्थापन व पडेल ती कामे आनंदाने करून स्त्रीशिक्षणाचे हे तारू धिराने व धिटाईने पुढे नेले. नंतर ते सर्वांना पटले व स्त्रियांना सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी दरवाजे खुले होत गेले. सावित्रीबार्इंचे या क्षेत्रातले हे कार्य असाधारण, अनमोल आहे. त्यांच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहातील लेखनही दर्जेदार होते. स्त्रीशिक्षणाच्या कट्टर पुरस्कर्त्या सावित्रीबाई एकोणिसाव्या शतकातील एक तेजस्वी स्त्रीरत्न होत्या. आज स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रांत स्त्रियांनी यशस्वीपणाने केवळ पदार्पणच नाही तर आपला स्वतंत्र ठसाही उमटवला आहे. कला, साहित्य, शिक्षण, संशोधन इतकेच नाही तर अंतराळातही स्त्रिया संशोधन करीत आहेत. राजकारणातही त्यांची चमकदार अशी कामगिरी आहे. इंग्लंडमधील मेरी वूल्स्टन क्राफ्टने १७९२ मध्ये स्त्रीहक्कांच्या समर्थनाचा जाहीरनामा लिहून स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक युगाला सुरुवात केली. स्त्री पुरुषाप्रमाणेच बुद्धिमान असते, हे सिद्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागले. अमेरिकेच्या सोजोर्नर ट्रूथनेही मेरीचेच विचार मांडले. भारतात ताराबाई शिंंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहून पुरुषी वर्चस्वावर सडेतोड टीका केली. १९४९च्या सुमारास सिमॉन द बोवा यांनी स्त्रीहक्कांचे विचार मांडले. यामुळे स्त्रियांच्या हक्कांची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेला घ्यावी लागली. १९७५ मध्ये ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन १९४३मध्ये साजरा झाला. १९७१ मध्ये पुण्यात महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एक मोठा मोर्चा काढला होता. युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केल्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी हे कार्य एकोणिसाव्या शतकातच भारतात केले. स्त्रियांना समाजातील एक जबाबदार घटक म्हणून समान मानवी हक्क मिळाला पाहिजे, ही काळाची गरज आहे. पण, ‘घरकाम बाईचं आणि घराबाहेरचं पैसे मिळविण्याचं काम पुरुषाचं ही वाटणी ईश्वरनिर्मित नव्हे आणि योग्यही नव्हे,’ असा खणखणीत इशारा गोपाळ गणेश आगरकरांनी मध्यमवर्गीय समाजाला शंभर वर्षांपूर्वीच दिला होता ! काळाच्या ओघात आताशा बाईचे मिळवतेपण हा समाजाने मान्य केलेला पैलू आहे; पण त्याचबरोबरीने तिला सर्व क्षेत्रांत समान अधिकार प्राप्त होण्यासाठी व जो कायद्याने ५० टक्के आरक्षण रूपात मिळाला आहे, समाजाचा निकोप दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे व म्हणूनच जागतिक महिला दिनापाठोपाठच येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक योगदानाचे आणि पुण्यस्मरणाचे महत्त्व अधिक अधोरेखित करणे हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे.