अग्रलेख - रुणू ते अर्पिता व्हाया पूजा, 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:19 PM2022-07-30T12:19:55+5:302022-07-30T12:20:50+5:30

आधीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना शिक्षकांच्या नेमणुकीत कोट्यवधींची माया कमावल्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे

Foreword - Runu to Arpita mukharjee via Pooja, recalling the scandal 25 years ago telecom scam | अग्रलेख - रुणू ते अर्पिता व्हाया पूजा, 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याची आठवण

अग्रलेख - रुणू ते अर्पिता व्हाया पूजा, 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याची आठवण

Next

स्वत:च्या नावामागे पंडित उपाधी लावणारे सुखराम नावाचे नेते गेल्या मे महिन्यात वारले. पंचवीस वर्षांपूर्वी टेलिकॉम घोटाळ्यामुळे देशातल्या प्रत्येक लहानथोरांच्या तोंडी त्यांचे नाव होते. रुणू घोष नावाची त्यांच्या जवळची एक अधिकारी होती. सुखराम यांच्यासोबत रुणूलाही सीबीआयने अटक केली. खटला चालला. दोघांनाही सोबतच शिक्षा झाली. नंतर टपाल व तार खात्याच्या नोकरीतून रुणू घोष बडतर्फ झाल्या व विस्मरणात गेल्या. आता त्यांची आठवण होण्याचे कारण बंगालशीच संबंधित आहे. रुणूसारखीच पार्थ चटर्जी नावाच्या मंत्र्यांची निकटवर्तीय मॉडेल, अभिनेत्री अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले घबाड हे ते कारण आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे म्हणत आयुष्यभर शे-दीडशे रुपयांची हातमागावर विणलेली धानेखाली साडी व तेवढ्याच स्वस्त स्लीपर घालणाऱ्या ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये हे चटर्जी  उद्योगमंत्री होते. म्हणजे कालपर्यंत होते.

आधीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना शिक्षकांच्या नेमणुकीत कोट्यवधींची माया कमावल्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. एका नियुक्तीचा दर बहुतेक पाच लाख रुपये असावा. कारण, तेवढी रक्कम भरलेले लिफाफे छाप्यात सापडले आहेत. तर या मंत्र्यांनी तो सगळा पैसा साध्या बारदान्यांमध्ये भरून कोलकात्याच्या टोलीगंज व बेलगछिया भागातल्या अर्पिता मुखर्जी यांच्या फ्लॅटमध्ये लपवला होता. घबाड असावे तरी किती, तर नोटा मोजण्याच्या मशिन्स सोबत असूनही ईडीचे अधिकारी घामाघूम झाले. घरातली कोणतीही खोली, कोणताही कोपरा, अगदी बाथरूमही असे नव्हते, जिथे नोटांची बंडले सापडली नाहीत. त्या नोटांच्या थप्प्या, ढिगारे पाहून देशाचे डोळे विस्फारले आहेत. जवळपास ५० कोटींची रोकड जप्त झालीय. सोन्याच्या विटा, दागिने व इतर चीजवस्तूंची किंमतही साडेचार कोटींच्या घरात असावी आणि अजूनही अशाच खच्चून नोटा भरलेल्या चार महागड्या गाड्यांचा शोध सुरू आहे. स्वत: अर्पिता मुखर्जींचे म्हणणे असे, की हा सगळा पैसा मंत्र्यांचाच आहे. त्यांनी तो ठेवायला आपल्याकडे पाठवला. ज्या खोल्यांमध्ये तो ठेवला होता त्यात जाण्याचीही आपल्याला परवानगी नव्हती. काहीही असो, पंचवीस वर्षांमध्ये आपण किती मजल गाठली पाहा. १९९६ मध्ये रुणू घोषच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानावर छाप्यात सीबीआयला १ लाख ६५ हजार रुपये रोकड, १ लाख रुपये मूल्याचे परकीय चलन, एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने व रोलॅक्सची वीस महागडी घड्याळे सापडली होती. रुणूचा पगार होता जेमतेम साेळा हजार व तोदेखील तिने दहा महिने उचलला नव्हता. थोडे गमतीने सांगायचे तर केवळ डॉलर्सच्या तुलनेतच रुपयाचे अवमूल्यन झाले असे नाही. सार्वजनिक आयुष्यातील नैतिकता, साधनसूचिता, पारदर्शकता वगैरे मूल्यांचा विचार केला तर विचार करून करून दिङ‌्मूढ व्हावे इतके प्रचंड हे रुपयाचे अवमूल्यन आहे. अनेकांना आठवत असेल, तीन महिन्यांपूर्वी झारखंडच्या खाणकाम विभागातल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलकडे १९ कोटींच्या नोटा जप्त झाल्या. पाच-सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव नीरा यादव यांच्याकडेही अशीच प्रचंड चल-अचल संपत्ती सापडली होती. जग गतिमान झाल्याचा परिणाम असावा की पूर्वी अशी प्रकरणे काही वर्षांच्या अंतराने उघडकीस यायची, आता ती काही महिन्यांच्या अंतराने उजेडात येतात.

रुणू, नीरा, पूजा, अर्पिता या सगळ्या महामायांनी एकंदरीत स्त्री-पुरुष समानता नावाच्या चिरंतन चर्चेला जो नवा आयाम दिला आहे तो पाहता त्यांच्याइतके घबाड जमवता न आल्याचा न्यूनगंड पुरुषांच्या मनात तयार झाला तर नवल वाटायला नको. या चौघींपैकी तीन अधिकारी व एक अभिनेत्री आहे. भ्रष्ट नेत्यांनी, मंत्र्यांनी काळा पैसा कमावण्यासाठी, साठवण्यासाठी अधिकाऱ्यांना जवळ केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. त्या अधिकारी महिला असतील तर अधिक चांगले असा विचार काहींनी केला असेल. साधारण समज असा आहे, की महिला अधिक काटकसरी, व्यवहारी असतात. सरपंचापासून ते कलेक्टर, मंत्री अशा पदांवर महिला असेल तर लोक लाच द्यायला धजावत नाहीत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. केवळ वर उल्लेख केलेल्याच नव्हे तर जयललिता, शशिकला यांच्यापासून अनेकींच्या अशा अफलातून कर्तबगारीने ते तमाम अभ्यासक तोंडावर आपटले असणार. थोडक्यात काय तर तुझ्या साडीपेक्षा माझी साडी अधिक सफेद असल्याची मिजास मिरवण्याचे दिवस संपलेत. आता तुझ्याकडे सापडलेले घबाड मोठे की माझ्याकडचे, अशा स्पर्धेचे दिवस आहेत.

Web Title: Foreword - Runu to Arpita mukharjee via Pooja, recalling the scandal 25 years ago telecom scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.