केजरीवालांचे माफीसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:56 AM2018-03-24T03:56:57+5:302018-03-24T03:56:57+5:30
केजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या भैयालाही तोच अनुभव आला.
- दिलीप तिखिले
केजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या भैयालाही तोच अनुभव आला.
भैय्या: साहेब मी तुमचा दूधवाला... अशी माफी का मागतायं?
केजरीवाल : माहीत आहे मित्रा...पण मी कधीतरी तुझ्यावर नक्कीच आरोप केले असतील. दुधात पाणी घालतोय म्हणून, किंवा यूपीतून आला तेव्हा तुझ्याकडे एकच म्हैस होती, आता १५ कशा झाल्या? वगैरे, वगैरे. ते काही नाही... मला आता माफी देऊनच टाक.
पेपरवाल्याचाही तोच अनुभव. मोलकरीण शांताबाई आली, तिच्यापुढे चक्क लोटांगण घालून स्वारी जेव्हा माफी मागू लागली तेव्हा मात्र सौ. केजरीवालांना राहवले नाही. त्यांनी रागातच विचारले...हे काय चालवलं, काय होतेयं तुम्हाला...? आणि हे कसले वागणे...? कानाचे मफलर कंबरेला कशाला हो बांधले?
केजरीवाल : काही नाही गं, गेले काही दिवसांपासून वाकून, वाकून कंबरडे मोडले.. म्हणून बांधले बघ. ...ते काही नाही, मी आता डॉक्टरांनाच बोलावते. केजरीवाल नाही, नाही म्हणत असतानाच सौ.नी फोन लावला. डॉक्टरही हजर झाले.
काय होतंय...! डॉक्टरांचा पहिला प्रश्न.
केजरीवाल : पहाटे-पहाटे फार भीतीदायक स्वप्नं पडतात. मी कुठल्यातरी तुरुंगात आहे. आतल्या बगिच्यात लालूजी विळा, कुदळ घेऊन माळीकाम करीत आहेत. मी झाडू घेऊन तुरुंगाचा परिसर साफ करीत आहे. दारावरचा चौकीदार अंगावर शाई फेकतो आहे. उठल्यावर ते सर्व आठवलं की काटा येतो अंगावर. ...पण नेमका तुरुंगच कसा दिसतो स्वप्नात? - डॉक्टरांचा सवाल.
त्याचे काय डॉक्टरसाहेब...मग सौ.नीच खुलासा केला... हे झाडू घेऊन निघाले संपूर्ण देश साफ करायला. वाटेत येईल त्याला झोडपत बसले. झाले, आले अंगलट. लोकांनी यांच्यावरच खटले भरले. मग स्वप्नात झाडू अन् तुरुंग येणार नाही तर काय!
आता कुठे डॉक्टरांना नाडी कळली. म्हणाले, वहिनी.. यांची व्याधी शारीरिक नाही. ती किंचित सायकिक अन् बहुतांशी पोलिटिकल आहे. असं करा, यांना नितीनभाऊंकडे घेऊन जा! ते देतील यांना गुरूमंत्र. नितीनभाऊंचे नाव येताच केजरीवाल केव्हढ्यांदा तरी दचकले...! काय म्हणता...? अहो, त्यांच्यावरच तर मी पहिला झाडू मारला. ऐकतील ते माझं? शेवटी हो नाही करत स्वारी गडकरी वाड्यात दाखल झाली. (दिल्लीतल्या नितीनभाऊंच्या शासकीय निवासालाही आम्ही गडकरी वाडाच म्हणतो.) भाऊ मोठे दिलदार. केजरीवाल काही बोलण्याआधीच ते म्हणाले, ‘जाव..! माफ कर दिया.’
केजरीवाल : भाऊ थँक्स...पण कुठे जाऊ , देशभरातल्या सर्व भ्रष्ट नेत्यांची यादी तयार केली होती मी. दोन कपाटे भरली आहेत. २०-२५ हजार तरी असतील. कुणाकुणाकडे जाऊ सांगा?
भाऊ : तो मार्क झुकेरबर्ग माहीत आहे ना! २० कोटी भारतीय सदस्य आहेत त्याच्या फेसबुकचे. एका झटक्यात सर्वांची माफी मागून मोकळा झाला पठ्ठा! तू पण, चल.. सुरू हो..जा... केजरीवालांना ते पटले. कंबरेचे मफलर पुन्हा कानावर आले आणि मग सुरू झाले एक अभूतपूर्व माफीपर्व.
(तिरकस)