सत्तेसाठी पोरवडा
By Admin | Published: January 19, 2015 10:38 PM2015-01-19T22:38:34+5:302015-01-19T22:38:34+5:30
संघ परिवाराच्या पोर-प्रेमाला अंत नाही. त्याच्या या वेडाचा आरंभ माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी केला. प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान चार मुले जन्माला आली पाहिजे
संघ परिवाराच्या पोर-प्रेमाला अंत नाही. त्याच्या या वेडाचा आरंभ माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी केला. प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान चार मुले जन्माला आली पाहिजे असा आदेशच त्यांनी नागपुरात भरलेल्या संघाच्या एका मेळाव्यात दिला. वर ‘आपल्या आवाहनाला देशात प्रचंड प्रतिसाद मिळत असून केरळातील एका महिलेने माझे वय झाले नसते तर मी तुमचे आवाहन स्वीकारले असते असे आपल्याला पत्राने कळविल्याचे’ त्यांनीच या मेळाव्याला सांगितले. नागपुरातील एका खाजगी कार्यक्रमातही काही प्रमुख संपादकांशी बोलताना त्यांनी आपल्या या पोरवेडाचा तेव्हा पुनरुच्चार केला. संघाच्या इतर नेत्यांनी त्याला आपली मूक संमती तेव्हा दर्शविली. भाजपच्या साक्षी या खासदाराने नंतर त्याच ‘चारांचा’ पुरस्कार आपल्या भाषणात केला. ख्रिश्चन आणि मुसलमानांचे हिंदू धर्मात पुनर्वसन (घरवापसी) करण्याच्या मोहिमेदरम्यान त्यांनाही सुदर्शनांचा तो संदेश आठवला. प्राची नावाच्या संघ परिवारातील दुसऱ्या एका साध्वीने साक्षीला पाठिंबा देत चार मुलांच्या आवश्यकतेवर दिलेला भर त्यानंतरचा आहे. पुढे प. बंगालातले भाजपाचे एक पुढारी शामल गोस्वामी यांनी एक पाऊल पुढे जाऊन हिंदू स्त्रीने चारऐवजी पाच पोरांना जन्म दिला पाहिजे असा नवा फतवा जारी केला. प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे बोलभांड कार्यकारी अध्यक्ष आहेत. तेही या गोस्वामीच्या बाजूने तातडीने उभे राहिले. लोकसंख्येवर नियंत्रण घालण्याची जबाबदारी हिंदूंची नाही असेही त्यांनी सोळभोगपणे सांगून टाकले. पण या साऱ्यांवर मात केली ती बद्रिकाश्रमाच्या शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी. त्यांना चार किंवा पाच अशा फुटकळ संख्येवर थांबणे आवडले नाही. त्यांनी प्रत्येक हिंदू कुटुंबात दहा पोरे जन्माला आली पाहिजेत असे आपल्या ताज्या उपदेशात हिंदूंना फर्मावले आहे. वासुदेवानंद सरस्वती हे प्रामाणिक असले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी आपल्या दहा पोरांच्या आदेशाचे समर्थन सरळ राजकीय पातळीवर नेले आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंची संख्या वाढणे त्यांना गरजेचे वाटते. त्यासाठी ही दहा पोरे हवीत असे त्यांनी म्हटले आहे. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला ३० टक्के मते मिळाली आणि तरीही ते पंतप्रधान झाले. त्याआधी झालेल्या अनेक निवडणुकांत २७ ते ३० टक्के मते मिळविलेले पक्ष आपल्या नेत्याला पंतप्रधानपदी आणू शकले. त्यांच्या विरोधात वा त्यांच्या ऐवजीच्या इतरांना देशाने तेव्हा ७० टक्के मते दिली तरीही ती किमया घडली होती. वासुदेवानंदांचा किमयेवर विश्वास नाही. त्यांना मोदीविजयाचा विश्वास हवा आहे आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक हिंदू घरात दहा पोरे जन्माला आलेली हवी आहेत. जन्माला आलेल्या वा येणाऱ्या पोरांना, तुम्हाला इतके बहीण वा भाऊ हवे होते काय हे विचारावेसे या वासुदेवानंदांना वाटणार नाही आणि तेवढ्यांना जन्म द्यायला ते ज्यांना सांगत आहेत त्या दांपत्यांचेही मत त्यांना विचारावेसे वाटत नाही. एवढी पोरे जन्माला घालणाऱ्या स्त्रीच्या देहाची होणारी विदारक अवस्थाही त्यांना अस्वस्थ करीत नाही आणि आजच्या जगात दहा पोरांचा संसार आपली हिंदू माणसे कसा ओढतील याचीही चिंता त्यांना वाटत नाही. राजकारणासाठी धर्मकारण, त्याचसाठी अर्थकारण, आणि त्याचसाठी कुटुंबकारण करण्याची ही वृत्ती आहे... वास्तव हे की शंकराचार्यांची परंपरा अतिशय नीतिशुद्ध, पवित्र व कर्मठ आहे. ती ज्ञानसंपन्न आणि बुद्धीवैभवाने झळाळणारी आहे. ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील तिचा अधिकार अनन्यसाधारण आहे. या परंपरेत पुढे आलेली माणसे नंतरच्या काळात हातात बेड्या अडकवून तुरुंगात जाताना तामिळनाडूत प्रथम दिसली तेव्हाच या परंपरेला या दिवट्या वारसांनी अधोगती आणल्याचे स्पष्ट झाले. त्याही आधी दलितांविषयी अपशब्द काढणाऱ्या पुरीच्या शंकराचार्याने आपल्या ज्ञानाधिकाराची माती केली. वासुदेवानंद सरस्वती हा शंकराचार्यांच्या गादीवर बसलेला इसम या रांगेत साऱ्यांच्या पुढे आहे. त्याला हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदू स्त्रिया राजकारणासाठी वापरायच्या आहेत. या साधू-बैराग्यांचा, आचार्य-संताळ्यांचा आणि साध्व्या-बिध्व्यांचा सारा जोर नेहमी स्त्रियांवरच का चालतो हेही कधीतरी समजून घेतले पाहिजे. एखाद्या महान धर्माचा एवढा मोठा अपमान दुसरा असणार नाही. शिवाय धर्माचे म्हणविणारे आचार्य धर्माचा असा दुरुपयोग करणार असतील तर त्यांच्या स्थानाचा, अधिकाराचा व त्यांची गादी आपल्या पैशावर चालविणाऱ्या हिंदू समाजासमोरचाच तो मोठा प्रश्न ठरणार आहे. अखेर ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी व्यापक धारणा सांगणारा हिंदू धर्म कुठे आणि ‘मोदींसाठी दहा पोरे जन्माला घाला’ असे सांगणारा वासुदेवानंदाचा राजकारणी धर्म कुठे याचा विचार आपण करायचा की नाही? धर्माचा अतिरेक केवळ राजकारणच ग्रासत नाही, तो समाजकारणाएवढाच व्यक्ती जीवनालाही ग्रासून टाकत असतो. आपल्या दुर्दैवाने असे ग्रासले जाणे स्त्रियांच्या वाट्याला फार येते. त्यामुळे चार पोरे जन्माला घाला इथपासून दहा पोरांना जन्म द्या असे म्हणणारे लोक आपल्या या अतिरेकाचा स्त्रीजीवनावर कोणता व कसा परिणाम होईल याचा फारसा विचार करीत नाहीत. तो स्त्रियांएवढाच साऱ्या समाजानेही करावा असा आहे.