विस्मरणात गेलेले प्रेम, करुणा... आणि विनोबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:13 AM2020-09-11T00:13:41+5:302020-09-11T00:13:52+5:30

- श्रीकांत नावरेकर स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर १७ आॅक्टोबर १९४० रोजी महात्मा गांधींनी विनोबांचे नाव पहिला वैयक्तिक सत्याग्रही ...

Forgotten love, compassion ... and Vinoba! | विस्मरणात गेलेले प्रेम, करुणा... आणि विनोबा!

विस्मरणात गेलेले प्रेम, करुणा... आणि विनोबा!

Next

- श्रीकांत नावरेकर

स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर १७ आॅक्टोबर १९४० रोजी महात्मा गांधींनी विनोबांचे नाव पहिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून जाहीर केले, तेव्हा ‘कोण हे विनोबा’, असा प्रश्न सर्व भारतीयांना पडला होता. शेवटी गांधींनी ‘हू इज विनोबा?’ असा मथळा असलेला लेख लिहून विनोबांची ओळख देशाला करून दिली होती. विनोबांना म. गांधींचे अनुयायी म्हटले जाते. खरे तर विनोबा म्हणत की, मी ना कोणाचा शिष्य आहे ना कोणाचा गुरु. गांधी विनोबा नात्याबद्दल हे तंतोतंत खरे होतं. विनोबा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच नव्हे, तर स्वतंत्र तत्त्वज्ञान होते; मात्र ते गांधींच्या मुशीत घडले! विनायक नरहर भावेना ‘विनोबा’ हे नावही गांधींनीच दिले होते.

विनोबांचा मूळ पिंड आध्यात्मिक. लहानपणापासून प्रखर वैराग्यशील जीवनशैली त्यांनी विचारपूर्वक अंगीकारली होती. ते बडोद्याला कॉलेजमध्ये शिकत असताना स्वातंत्र्याचे वारेही वाहातच होते. त्यांच्या मनात द्वंद्व सुरू झालं, हिमालयाची शांती की बंगालची
क्रांती? अशा द्विधावस्थेत त्यांना योगायोगाने गांधींचा लाभ झाला. विनोबा म्हणतात, ‘गांधींना भेटल्यावर माझ्या मनातले द्वंद्व संपले. बंगालची क्रांती आणि हिमालयाची शांती दोन्ही मला एकाच ठिकाणी मिळाल्या !’

इथून पुढचा विनोबांचा प्रवास हा गांधींच्या छायेत; परंतु तरीही स्वतंत्रपणे झाला. म्हणूनच गांधींचे उत्तराधिकारी हे त्यांचे वर्णन जास्त समर्पक ठरेल. आज त्यांचा एकशेपंचवीसावा जन्मदिन आहे. विनोबांचे जीवन, कार्य आणि चिंतन यांचा आवाका एका लहानशा लेखात सामावणे केवळ अशक्य, म्हणून या धावत्या नोंदी !

१९५१ साली नक्षली हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या तेलंगणा प्रांतात विनोबा प्रेमाचा संदेश घेऊन गेले. एकीकडे शेकडो एकर जमीन, तर दुसरीकडे भूमिहीनता आणि त्यातून जन्माला आलेली गरिबी हे समस्येचे मूळ आहे हे लक्षात आल्यावर त्यांना भूदानाचा विचार स्फुरला आणि तेथून भूदान गंगेचा उगम झाला. त्यानंतर हाच विचार घेऊन विनोबांनी सलग तेरा वर्षं भारतात भूदान पदयात्रा केली. ते एकूण सत्तर हजार किलोमीटर चालले. ज्या देशात ‘सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनही देणार नाही’, अशा दर्पोक्तीतून महाभारत घडले त्याच देशात विनोबांनी केवळ प्रेमाच्या बळावर ४५ लाख एकर जमिनीचे दान मिळवले. त्यातील २५ लाख एकर जमीन भूमिहीनाना वाटलीही गेली. समाजातील प्रश्न कायदा आणि कत्तल या मार्गाने नव्हे तर करुणेच्या मार्गाने सुटू शकतात हे नवे तत्त्वज्ञान विनोबांनी दिले. त्यातून पुढे विनोबांना ग्रामदान (पूर्ण गावाच्या जमिनीचे गावालाच दान) आणि ग्राम स्वराज्य (आमच्या गावात आम्हीच सरकार) या दोन क्रांतिकारी संकल्पना सुचल्या.

प्रायोगिक स्तरावर त्या अनेक गावांमध्ये राबवल्याही गेल्या. त्यातल्या काही टिकल्या तर काही काळाच्या ओघात लोप पावल्या. पण एवढे नक्की की स्वावलंबी आणि शाश्वत समाजरचनेसाठी त्या निश्चितच मार्गदर्शक आहेत. ‘विन्या तूच का करत नाहीस माझ्यासाठी भगवद्गीतेचे भाषांतर?’- ही आईची अपेक्षा आणि त्यामागचा तिचा आत्मविश्वास दोन्ही गोष्टींना न्याय देत विनोबांनी गीतेचा मराठी समश्लोकी अनुवाद केला आणि त्याला नाव दिले ‘गीताई’. गीताई ही विनोबांची एक अनुपम साहित्य रचना आहे. काही विद्वान मानतात, गीतेचा हा अनुवाद मूळ गीतेहूनही सुंदर व अर्थवाही आहे. विनोबा म्हणत, गीता हा धार्मिक नव्हे, जीवन जगण्याचा ग्रंथ आहे.

विनोबांनी जगातल्या सर्व प्रमुख ग्रंथांचा अभ्यास केला आणि प्रत्येक धर्माचे सार काढून अभ्यासकांची खूप मोठी सोय केली. त्यांना ढोबळ मानाने आध्यात्मिक महापुरुष मानले जाते. पण अध्यात्म या शब्दाला आपल्याकडे संकुचित वलय असल्याने आपल्या तथाकथित बुद्धिवादी आणि पुरोगामी विचारकांनी विनोबांवर जणू बहिष्कारच टाकला. प्रत्यक्षात निखळ विज्ञान आणि उपयोजित विज्ञान याचे योग्य
भान, आकलन असलेले विनोबा प्रत्यक्ष विज्ञान जगणारे होते. अध्यात्म आणि विज्ञान दोहोंचे अंतिम ध्येय मानवाला सुखी करणे ! विनोबा सांगतात अध्यात्म आणि विज्ञान योग्य मार्गाने गेले तर अंतिमत: एकाच बिंदूपाशी पोहोचतील.

गांधींनी सत्य - अहिंसा ही आपली जीवनमूल्ये मानली. विनोबांनी अहिंसेची आणखी उकल करत प्रेम आणि करुणा अशी तिची अधिक व्यावहारिक आणि सकारात्मक फोड केली. ‘जय हिंद’ च्या जागी ‘जय जगत’चा नारा त्यांनी रूढ केला; पण याला ‘जय ग्राम’ची जोड द्यायला ते विसरले नाहीत. केवळ नामोल्लेख तरी करायला हवा अशा विनोबांच्या काही कृती आणि संकल्पना म्हणजे ‘शांतिसेना’, कांचन मुक्ती अर्थात पैशाविना जगणे, ऋषि शेती अर्थात बैल वा मशीनमुक्त शेती, खादी आणि ग्रामोद्योग! आपली स्वत:ची जीवनमूल्ये सांगणारी काही सूत्रे विनोबांनी बनविली होती. त्या सूत्रांना त्यांनी नाव दिले होते ‘विनु-स्मृति’! त्यातील एक सूत्र आहे

वेद-वेदान्त-गीतानाम विनुना सार उद्धृता
ब्रह्म सत्यं जगत स्फूर्ति: जीवनम सत्य शोधनं
‘ब्रह्म सत्यं जगन मिथ्या’ या प्रचलित तत्त्वज्ञानाला इतके सुंदर, सार्थ आणि व्यवहार्य रूप विनोबाच देऊ जाणे. सर्वार्थाने महान असणाºया; परंतु विनाकारणच विस्मरणात गेलेल्या या विभूतिमत्वाला विनम्र प्रणाम.

Web Title: Forgotten love, compassion ... and Vinoba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.