‘मोहे भूल गये सांवरिया’
By admin | Published: May 30, 2016 02:58 AM2016-05-30T02:58:46+5:302016-05-30T02:58:46+5:30
आर्थर रोड कारागृहात मुक्कामी असलेल्या छगन चन्द्रकांत भुजबळ यांना त्यांच्या साऱ्या सग्यासोयऱ्यांची सय आली आहे असे दिसते.
धर्मादाय आयुक्तांची तोफ डागून झाल्यानंतर आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नव्याने काही तोफा रोखल्यानंतर हल्ली आर्थर रोड कारागृहात मुक्कामी असलेल्या छगन चन्द्रकांत भुजबळ यांना त्यांच्या साऱ्या सग्यासोयऱ्यांची सय आली आहे असे दिसते. त्या साऱ्यांचा हवाला देऊन आपल्यावर ‘या वयात’ जाणीवपूर्वक जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्यांना आम्ही आणि आमचे सारे सगेसोयरे अंतिम क्षणापर्यंत लढा देत राहू असे त्यांनी थेट कारागृहातून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. परंतु केवळ तितकेच नव्हे तर या समस्त सग्यासोयऱ्यांकडे त्यांनी आशीर्वादाची याचनादेखील केली आहे. चांगले आहे. चढत्या काळात ज्यांच्या प्रत्यही ठेचा लागत होत्या त्यांची पडत्या काळात का होईना आठवण होणे किमान माणूसपणाचे लक्षण म्हणून ओळखले जाण्यास हरकत नाही. पण आहेत कुठे ते सारे सगेसोयरे? अनुभवाने माणूस शहाणा बनत जातो असे म्हणतात. पण काही असामान्यांची गणना अशा सामान्य जीवांमध्ये होत नसते. ‘अत्यंत जाज्वल्य अशी तात्त्विक भूमिका’ घेऊन शिवसेनेचा त्याग केला तेव्हांही भुजबळांना हा आणि असाच अनुभव आला होता असे म्हणतात. सुगी संपली, पाखरे उडाली! अर्थात ही सुगीदेखील कष्टाने घाम गाळून पिकविलेल्या मोत्यांची नव्हती. होते मोतीच पण त्यांना भ्रष्टाचाराची दुर्गन्ध होती. पण शिताभोवती जमणाऱ्या भुतांना अशा गोष्टींची कधी क्षिती वाटत असते? पण तीच भुते शिते संपल्यानंतर अस्तंगत होत असतात. आज नेमके तेच झाले आहे आणि ते तसे होणारही होते. लोकशाहीची जी काही मर्मे सांगितली जातात त्यातील एक मर्म असे सांगते की संबंधितांच्या मनात सतत किमान एक भावना जागृत असली पाहिजे की कोणी तरी माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. या भावनेचा जेव्हां लोप होतो तेव्हां तिचा भुजबळ होत असतो. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) या संस्थेची ज्यांनी उभारणी केली, तिला नावारूपास आणले त्यांनाच आपण घराबाहेर काढीत आहोत याचे जे भान राहिले नाही ते याचेच लक्षण. नाशकातील भुजबळ नॉलेज सिटीचे (बीकेसी) खेळणे पुतणसूनेच्या हातात दिल्यानंतर सख्खी सून जेव्हां फुरंगटून बसली तेव्हां तिच्या हाती एमईटीचे खेळणे दिले गेले आणि एकप्रकारे या संस्थेच्या पालनकर्त्याला घराबाहेर काढले. पण ते खपून गेले. कारण सुगीचा हंगाम सुरू होता. तो सरला आणि धर्मादाय आयुक्तालयालादेखील संबंधित नस्तीवरील धूळ झटकण्याची उपरती झाली. त्याचाच परिणाम म्हणून मग पुतण्या आणि मुलगा यांची एमईटीवरील वर्णी खारीज केली गेली. भुजबळांना जेव्हां अटक झाली तेव्हां शरद पवारांनी म्हणे ‘हे सुडाचे राजकारण आहे’ असे म्हटले होते. विविध सरकारी यंत्रणांचा आज भुजबळांना जो वेढा पडला आहे ते सुडाचे राजकारण असेल तर भुजबळ सत्ताकाळात कोणते आणि कशाचे राजकारण करीत होते आणि ते जे काही करीत होते ते पवारांच्या नजरेस पडत होते की नव्हते, की त्यांचा तेव्हां धृतराष्ट्र झाला होता? विविध राज्यांमध्ये जाऊन आपल्यातील अन्य मागासवर्गीयांचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी हजारोंच्या संख्येतील मेळावे आयोजित करण्याचे जे उद्योग भुजबळ सत्ताकाळात करीत होते त्यासाठी लागणारे लक्षावधी रुपयांचे द्रव्य कोठून येत होते, याची पवारांना का कल्पना नव्हती? पण अशा मेळाव्यांमधून हाती पडणारी जनसमर्थनाची लूट भुजबळ राष्ट्रवादीच्या खजिन्यात जमा करीत होते त्यामुळे पवारांनीही आपले ओठ शिवून घेतले होते. त्यानंतर त्यांनी एकदा वा फार फार तर दोनदा भुजबळांची वरकरणी कड घेऊन त्यांच्याविरुद्ध षडयंत्र चालविणे सरकारला महागात पडेल वगैरेसारखा शाप देऊन पाहिला पण आता तेही शांत आहेत आणि ते शांत आहेत म्हणून राष्ट्रवादीतले व एकूणच सारे सगेसंबंधीदेखील शांत आहेत. पायाखाली साऱ्यांच्या जाळ असल्याने आपण भुजबळांच्या पाठीशी उभे राहिलो तर न जाणो आपल्याकडेही नजरा वळतील म्हणूनच ते शांत आहेत. तेव्हां अशा स्थितीत भुजबळ कोणाला आवाहन करीत आहेत, कोणाची आळवणी करीत आहेत आणि कोणाच्या भरवशावर आपल्यातील उसन्या लढवय्येपणाचे दाखले देत आहेत? अखेर आपला क्रूस आपणच आपल्या डोक्यावर वाहून न्यायचा असतो असे म्हटले जाते. जेव्हां सद्दी होती तेव्हां काही हितचिंतक जागे करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होते. पण प्रत्येकवेळी लोक बाभळीच्या नव्हे कैऱ्यांनी लदलदलेल्या झाडावरच दगड मारतात हे भुजबळांचे परवलीचे वाक्य होते. पण या कैऱ्याच मुळात थेट कोयीपासून भ्रष्टाचाराच्या भुंग्यांनी पोखरून ठेवलेल्या होत्या. कैऱ्यांनी लदलदलेल्या तसल्या झाडापेक्षा बाभळीचे झाड बरेच म्हणायचे. घुसखोर जनावरांना अटकाव करण्यासाठी शेताच्या बांधावर टाकायला बाभळीचे काटे आणि शेळ्या-बकऱ्यांना त्यांच्या क्षुधाशांतीसाठी बाभळीच्या शेंगा तरी कामाला येत असतात. पण जेव्हां झाड पूर्णपणे वठून जाते तेव्हां त्याच्याकडे माणसे काय जित्राबंदेखील जात नसतात. त्यांना कितीही आळवण्या करून आवतनं दिली तरी. परिणामस्वरूप आर्थर रोडातील साऱ्या सुखसोयींचा लाभ घेत भुजबळ एकच ओळ गुणगणू शकतात,
मोहे भूल गये सांवरिया!