वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 03:43 AM2019-06-21T03:43:53+5:302019-06-21T03:44:31+5:30
रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्याचा तपशील त्यांच्याकडून मिळवायला हवा.
शंकरसिंह वाघेला हे देशातील एक जबाबदार नेते आहेत. काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे लढाऊ व अनुभवी नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री या नात्याने ते देशाला सुपरिचित आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याने गुजरातमधील गोधरा या ६९ हिंदूंच्या जळीत कांडाला ‘रंगा आणि बिल्ला’ हे जबाबदार आहेत. पुढे त्या दंगलींची प्रतिक्रिया संघटित करून दोन हजारांवर मुस्लिमांची हत्या घडवायलाही तेच कारणीभूत आहेत, असे एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
तेवढ्यावरच न थांबता पुलवामामधील भारतीय जवानांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याला व त्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या मृत्यूलाही तेच कारणीभूत आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी या जवानांच्या ताफ्यावर आरडीएक्सने भरलेल्या ज्या मालमोटारीने हल्ला चढविला तिचा रजिस्ट्रेशन नंबर गुजरातचा असल्याचे सांगून ही सारी हत्याकांडे निवडणुका जिंकण्यासाठी ‘रंगा व बिल्ला’ यांनीच घडविली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर पाकिस्तानच्या बालाकोटमधील हल्ल्यात २०० लोक ठार केल्याचा जो दावा सरकार करते तो साफ खोटा असून त्याचा पाठपुरावा आपल्या हवाई दलाला किंवा जगातील एकाही वृत्त वाहिनीला अद्याप करता आला नाही, असे ते म्हणतात. शिवाय बालाकोटवर हल्ला चढवायचाच होता तर त्याआधी पुलवामा घडविण्याचे कारण कोणते होते? हा सारा हिंदू विरुद्ध मुसलमान यांच्यात तणाव उभा करून निवडणूक जिंकण्याचा हव्यास आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची राजवट लोकप्रिय असतानाच्या काळात या ‘रंगा व बिल्ला’ यांना कुणी विचारत नव्हते. पटेलांना बदनाम करणे व निवडणुकीसाठी धार्मिक तणाव उभा करणे यासाठी या दोघांनी हे केले, असा दावा करून त्यांच्या पुढच्या कारवाया याच हेतूने व मुकाटपणे केल्या, असेही ते आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ म्हणतात. हा सारा तपशील दिल्यानंतरही वाघेला या ‘रंगा व बिल्ला’ची नावे उघड करीत नाहीत. या नावाचे दोन्हीही खुनी इसम पुण्याचे आहेत आणि त्यांना मृत्युदंड झाला आहे. तशीही पुण्यातील या खुनी माणसांची नावे हा देश व जग कधी विसरणारही नाही. वाघेला यांनी त्याचमुळे ही नावे वापरली असणार हे उघड आहे.
वाघेलांसारखा माणूस जेव्हा रंगा व बिल्ला यांची नावे पुढे करून असे आरोप करतो, तेव्हा त्यांना नक्कीच या हत्याकांडाची खरी माहिती ठाऊक असणार, त्याबाबतचे तपशील ठाऊक असणार. ती माहिती जगाला समजावी व ते ज्यांचा उल्लेख ‘रंगा व बिल्ला’ असा करतात ते दहशतखोर कोण, हे देशालाही कळणे आवश्यक आहे. त्यांचा आडून उल्लेख करण्यापेक्षा त्यांची नावे, तपशील वाघेला यांनी थेटपणे उघड करायला हवा. एका राज्याचा माजी मुख्यमंत्री असलेला नेता जेव्हा जाहीरपणे असे आरोप करतो तेव्हा त्याला त्याच्या गंभीर परिणामांचीही माहिती असणार. या वक्तव्यासाठी त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो व देशाची न्यायालये त्यांना ‘हे तुमचे रंगा व बिल्ला कोण?’ हे विचारू शकतात.
वाघेला तेथे ही माहिती शपथेवर सांगतीलही. तशी त्यांनी ती सांगितली पाहिजे. अन्यथा ते उगाच देशात गोंधळ माजवीत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षाही झाली पाहिजे. तशीही रंगा आणि बिल्ला ही बदनामी करणारी नावे आहेत. वाघेला यांनी ज्यांना ती लावली आहेत, ती माणसे सामान्य नसणार, ती राजकारणातील उच्च पदावरच असणार. अशी माणसे देशाचे राजकारण चालवीत असतील तर ते देशासाठीही हानिकारक आहे. सबब वाघेला यांनी पुढे होऊन ही माहिती जाहीर केली पाहिजे किंवा गुजरातच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ती वदवून घेतली पाहिजे. आपल्या पुढाऱ्यांना हवेतल्या गप्पा करायला आवडतात व त्या जनतेला खºयाही वाटतात. जनतेचा गैरसमज वा कोणत्याही नेत्याची बदनामी करणे हा तसाही अपराध आहे. सबब वाघेलांवर खटला दाखल करणे हे देशहिताचे व जनतेच्या समाधानाचे ठरणार आहे.