निराकार परमेश्वराचे रुप

By admin | Published: September 10, 2016 05:49 AM2016-09-10T05:49:20+5:302016-09-10T05:49:20+5:30

विमानाने आकाशात झेप घेतली. जमिनीशी संपर्क तुटला. वितभर खिडकीतून बाहेरचे मनोहारी सरकते दृश्य नजर बांधून ठेवत होते.

Formless Lord Rupees | निराकार परमेश्वराचे रुप

निराकार परमेश्वराचे रुप

Next


विमानाने आकाशात झेप घेतली. जमिनीशी संपर्क तुटला. वितभर खिडकीतून बाहेरचे मनोहारी सरकते दृश्य नजर बांधून ठेवत होते. उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या तर शेतांचे, जंगलांचे हिरवे पट्टे वर्ल्ड अ‍ॅटलाससारखे दिसत होते. वळत जाणाऱ्या नद्या चांदीप्रमाणे चकाकत होत्या आणि लांबवर जाणारे महामार्ग पाहताना नदीचाच आभास होत होता. हळूहळू जमिनीशी नाते तुटले. नजर आत वळली. पण खिडकीबाहेरच्या मनोहारी दृश्याने मी अवाक् झाले.
अष्ट नव्हे तर खाली-वर धरून दशदिशांना निळ्या अनंत आकाशाचा नीलिमा दृष्टीला सुखवत होता. निराकार, अनाम अशा परमेश्वराचेच जणू ते रूप. जितके विशाल हे आकाश आहे तितकेच विशाल आतले आकाश आपल्या मूठभर दिसणाऱ्या हृदयात आहे.
उपनिषदातील एक संवाद मनात उमलत होता. विश्वात ‘जिकडे जावे तिकडे, पायाखाली, तृणावृता भू दिसते।’ पायाखाली गर्भरेशमी हिरव्या रंगाने सजलेली सावळी भूमाता दिसते आणि आपल्याप्रमाणेच शत्रू राष्ट्राच्या माणसांच्या ‘डोक्यावरती दिसते निलांबर ते’ केशवसुतांनी किती समर्पक वर्णन यात शब्दबद्ध केले आहे.
विश्वाचे पालन-पोषण करण्यासाठी आपले रश्मिजाल विणणारा सहस्त्ररश्मी क्षितिजाच्या किंचित वर लखलखत होता. आता खाली एक फक्त लखलखते आवरणच भासमान होत होते. सृष्टीचा हा अनावर पसारा सहज सावरत ही पृथ्वी विशिष्ट गतीने स्वत:भोवती तर फिरतेच पण हिरण्यगर्भाभोवती ठराविक मार्गाने, नेमक्या गतीने, अचूक कोन साधत प्रदक्षिणा पूर्ण करते. हे सर्व ईश्वराने वसविले आहे. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ ईश्वराने पांघरलेले आवरण सुवर्णमय आहे. सुवर्णमय म्हणजे समोर दिसते आहे तसे चकाकणारे, दृष्टीला मोहात पाडणारे, मनाला लुब्ध करून गुंतवून ठेवणारे. हे वर्णन ईशोपनिषदाच्या मंत्र १ आणि मंत्र १५ मध्ये वाचले होते. विनोबांनी त्याचा केलेला मधुर अनुवाद आणि कृ.ह. देशपांडे यांनी त्यावर केलेले सरल भाष्य वाचले होते. त्याचा अर्थ क्षणभर जाणवला. त्यानंतर अनेकदा प्रवास केला पण ते दृश्य पुन्हा कधीही गवसले नाही. कवी केशवसुतांनी क्षणात नाहीसे होणारे, हातातून, शब्दातून आणि जाणिवेतून निसटून जाणाऱ्या दिव्य भासांनाच म्हणजे अशा अवचित प्रचिती देणाऱ्या अनुभवांनाच आपल्या काव्यातून अंकुरित केले असावे का?
पाहाता पाहाता विमान उतरायला लागले. लांबवर अर्धगोल क्षितिज, कचकड्याच्या खेळण्यासारखे भासणारे आपले शहर आता घरासारखी घरे या स्वरूपात तनमनाला सुखवत होते. जमिनीवर उतरणेही खूप आपलेसे, आश्वासक वाटले.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: Formless Lord Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.