स्टार्टअप विश्वाचा पाया असाही

By admin | Published: May 8, 2016 01:59 AM2016-05-08T01:59:31+5:302016-05-08T01:59:31+5:30

नव्वदचं दशक संपताना जगभरात डॉट कॉमचा फुगा फुटणार अशी चर्चा होती. त्या वेळी पीटर थील आणि मॅट लेव्चीन यांनी सुरू केलेली कॉन्फिनीटी आणि इलॉन मस्कने सुरू केलेली एक्स डॉट

The foundation of the startup universe | स्टार्टअप विश्वाचा पाया असाही

स्टार्टअप विश्वाचा पाया असाही

Next

 - कुणाल गडहिरे

नव्वदचं दशक संपताना जगभरात डॉट कॉमचा फुगा फुटणार अशी चर्चा होती. त्या वेळी पीटर थील आणि मॅट लेव्चीन यांनी सुरू केलेली कॉन्फिनीटी आणि इलॉन मस्कने सुरू केलेली एक्स डॉट कॉम या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेली ‘पे पल’ कंपनी जगभरातील उद्योगजगताचा आर्थिक पाया उभारण्याचं काम करत होती. आज ई- कॉमर्स क्षेत्रात पे पलचा मोठा वाटा आहे.

पेपल ही कंपनी २१व्या शतकातील जग बदलणाऱ्या निवडक कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी आहे. गेल्या १८ वर्षांतील कंपनीच्या प्रवासातील प्रत्येक घटना, त्यांना आलेली प्रत्येक समस्या आणि त्यावर केलेली मात या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. पण स्टार्टअप विश्वाशी संबंधित प्रत्येकाने त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
१९९८च्या डिसेंबर महिन्यात कॉन्फिनिटीची सुरुवात झाली. पाल्म पायलट या आताच्या स्मार्ट फोनसारख्या दिसणाऱ्या डिव्हाईसच्या माध्यमातून लोकांना आर्थिक व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणे ही त्यांची मूळ संकल्पना होती. पे पल हे त्यांच्या सेवेचं नाव होतं. मात्र त्यांच्या या अफलातून बिझनेस संकल्पनेला १९९९ साली अतिशय सुमार दर्जाच्या पहिल्या १० संकल्पनांत स्थान मिळालं होतं. तर दुसरीकडं १९९९ साली इलॉन मस्क याची एक्स डॉट कॉम ई-मेलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याची सोय देत होती. २००० साली या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं. रोख रक्कम, क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्यापेक्षा पे पल देत असलेली सुविधा आणखी सोपी आणि जलद होती. आणि त्यामुळे ई - बे या वेबसाईटवर अनेक ग्राहक पे पलच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्राधान्य देत होते.
मात्र पे पलसमोर सातत्याने अडचणी येत होत्या. कंपनीमध्ये तज्ज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने पे पलने, प्रथम मित्रांनाच नोकरी दिली. पण, ग्राहकांची पसंती असताना ई-बे आपल्या वेबसाईटवर पे पलला अधिकृत दर्जा देत नव्हती. ई - बेने तेव्हा बिल पॉइंट ही आॅनलाइन पेमेंटची सुविधा देणारी एक कंपनी विकत घेऊन पे पलला थेट आव्हान दिलं. त्यामुळे पे पलला कमी वेळात जास्त ग्राहक मिळविणे आवश्यक होते. सुरुवातीला जास्तीतजास्त लोकांनी आपला आर्थिक व्यवहारांसाठी वापर करावा यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या जाहिरात माध्यमांचा वापर केला. त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. जाहिरातींचा खर्च भरपूर होता. त्यामुळे कमी खर्चात नवीन ग्राहक मिळविण्यासाठी कंपनीने ‘ग्रोथ हॅचिग’ तंत्राचा अफलातून वापर केला. त्यांनी विद्यमान ग्राहकांना, त्यांच्या मित्रांना पे पलचा वापर करण्यास सुचविण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी बक्षिसं देणं सुरू केलं. या माध्यमातून प्रत्येक नवीन ग्राहक आणि विद्यमान ग्राहक अशा दोघांना प्रत्येकी १० डॉलरचं बक्षीस कंपनी देत असे. लोकांना हे पैसे प्रत्यक्षात आणि लगेच वापरता येत होते. त्यामुळे ही अफलातून योजना झपाट्याने पसरली.
दरदिवशी १५ हजार नवीन लोक पे पलवर रजिस्टर होत होते. या भन्नाट प्रतिसादाची दखल ई - बेलासुद्धा घ्यावी लागली आणि अखेर ई - बेने २००२ साली पे पल विकत घेतली. यानंतर पे पलने खऱ्या अर्थाने जागतिक बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. मात्र या टप्प्यात त्यांना अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. अमेरिकेत काही ठिकाणी त्यांच्यावर फसवणुकीचे आणि गैरव्यवहारासंदर्भात खटले दाखल करण्यात आले. त्यातून काही ठिकाणी तर वापरावर बंदी आणण्यात आली. या सगळ्यातून कंपनीने अनेक धडे घेतले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या कामकाजात अनेक महत्त्वाचे बदल केले. संभाव्य आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी अनेक तांत्रिक उपाययोजना केल्या आणि नव्याने पे पलच्या वापराविषयी नियमावली बनवली. आज १९०हून अधिक देशांमध्ये आणि २५हून अधिक वेगवेगळ्या परकीय चलनांमध्ये साडेअठरा करोड नागरिक पे पलचा आर्थिक व्यवहारासाठी वापर करतात. पे पल ही कंपनी आज स्टार्टअप विश्वातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. फक्त आॅनलाइन आर्थिक व्यवहारांचा नव्हे, तर जागतिक स्टार्टअप्स विश्वाचा पाया या कंपनीने रचला आहे.

पे पलच्या यशामध्ये सहभागी असलेल्या त्यांच्या अनेक कमर्चाऱ्यांनी आणि सर्व संस्थापकांनी त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर जग अक्षरक्ष: बदलणारे अनेक स्टार्टअप्स एकतर स्वत: सुरू केलेत किंवा अशा स्टार्टअप्समध्ये सुरुवातीच्या काळात थेट आर्थिक गुंतवणूक करून त्यांना मार्गदर्शन देऊन घडवलं आहे. या सर्वांना आज एकत्रितपणे पे पलमाफिया असे म्हणतात ते यामुळेच. पीटर थील हा फेसबूकचा पहिला गुंतवणूकदार होता. त्याने आत्तापर्यंत ६४ स्टार्टअप्समध्ये गुंतावणूक केली आहे. रेडिट, क्योरा, आसना, स्ट्राइप, ज्यांगा ही त्यातली प्रमुख नावं. इलॉन मस्कनेही अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासोबत स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स, सोलर सिटी या कंपन्याची सुरुवात केली आहे. स्टीव चेन, जावेद करीम, केथ राबोईस या तीन कर्मचाऱ्यांनी यू-ट्युबची तर रीड हॉफमन याने लिंक्ड इनची निर्मिती केली. डेव मकक्लर याने फाइव हंड्रेड स्टार्टअप्स या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून आत्तापर्यंत ५०पेक्षा जास्त देशांत १४००हून जास्त स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

Web Title: The foundation of the startup universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.