चार चेंडूत ९२ धावा!
By Admin | Published: April 15, 2017 05:08 AM2017-04-15T05:08:01+5:302017-04-15T05:08:01+5:30
ब्रिटिशांनी आपल्या सत्तेसोबत वसाहतींमध्ये पसरविलेले क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा वाटत असला
ब्रिटिशांनी आपल्या सत्तेसोबत वसाहतींमध्ये पसरविलेले क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा वाटत असला तरी तो मान्य करणे हे क्रिकेटमधील सभ्यपणाचे एक लक्षण आहे. तरीही पंचांच्या निर्णयावरून वाद होतच असतात व काही वेळा तर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या संघास सामना किंवा प्रसंगी प्रतिष्ठित स्पर्धेचे अंतिम जेतेपदही गमवावे लागल्याची उदाहरणे आहेत. पंचांच्या निर्णयावरून बहुतांश वाद होतात ते झेल, पायचीत, यष्टिचीत. धावचीत, षटकार, सीमारेषेवरील झेल आणि नोबॉल या संबंधीचे असतात. परंतु पंचांनी दिलेल्या नाणेफेकीच्या कौलावरून वाद क्वचितच होतात आणि त्याचा निषेध म्हणून एखाद्या संघाने मुद्दाम सामना हरणे तर त्याहून विरळा. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात मंगळवारी नेमके असेच घडले. मंगळवारी लालमातिया क्लब आणि अॅक्झिआॅम क्रिकेटर्स या दोन संघांमध्ये सामना झाला. पंचांनी दोन्ही संघांच्या कप्तानांना सोबत घेऊन नाणेफेक केली आणि अॅक्झिआॅमच्या कप्तानाने म्हटल्याप्रमाणे ‘छापा’ पडल्याचे पंचांनी जाहीर केले. अॅक्झिआॅमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण लालमातियाच्या कप्तानास ही नाणेफेक मान्य नव्हती. पंचांनी नाणे न दाखवताच कौल जाहीर केला, असा त्याचा आक्षेप होता. पण त्याने लगेच दृश्य स्वरूपात निषेध नोंदवून आकांडतांडव केले नाही. लालमातिया संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ८८ धावा केल्या. त्यानंतर अॅक्झिआॅम संघ फलंदाजीस उतरला आणि लालमातियाने न बोलता आपले निषेधाचे अस्र बाहेर काढले. लालमातिया संघाच्या सुजोन मेहमूद या आघाडीच्या गोलंदाजाने टाकलेले पहिले षटक हाच त्या संघाचा अभूतपूर्व निषेध होता. मेहमूदने या षटकात चक्क १५ ‘नो बॉल’ व १३ ‘वाइड बॉल’ टाकले. यापैकी एकही ‘वाइड बॉल’ यष्टिरक्षकाने (मुद्दाम) न अडविल्याने त्या प्रत्येक चेंडूवर चार ‘बाय’ मिळाल्या. अशा प्रकारे, ‘नो बॉल’ आणि ‘वाइड बॉल’वर ६७ धावा झाल्या. मेहमूदने नियमाला धरून टाकलेल्या चार चेंडूंवर अॅक्झिआॅमच्या फलंदाजांनी १२ धावा केल्या आणि त्यांचा १० गडी राखून विजय झाला. या प्रकाराने अॅक्झिआॅमचे खेळाडू व सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले थोडके प्रेक्षक चक्रावून गेले. लालमातिया क्लबचे महासचिव अदनान रेहमान दिपाँ यांनी नंतर सांगितले तेव्हा हा पंचांच्या निषेधाचा प्रकार होता, हे स्पष्ट झाले. या स्पर्धेत असा निषेध नोंदविला जाण्याची ही पहिली वेळ नव्हती. आदल्याच दिवशी फिअर फायटर्स स्पोर्टिंग क्लबच्या तसनीम हसन या गोलंदाजाने अशाच प्रकारे सात ‘वैध’ चेंडूंमध्ये ६९ धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या होत्या. स्थानिक पातळीवरचे क्रिकेट जर असे खेळले जात असेल तर राष्ट्रीय पातळीवर मातब्बर संघ तयार होण्याची अपेक्षा ठेवणेही चुकीचे ठरेल.