शेक्सपियरची चारशे वर्षे!

By admin | Published: April 17, 2016 01:42 AM2016-04-17T01:42:12+5:302016-04-17T01:42:12+5:30

अभिजात लेखन हे स्थल-कालाचं बंधन सोडून सर्वदूर पोहोचत असतं. त्याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे विल्यम शेक्सपियर. २३ एप्रिल २०१६ ला शेक्सपियरच्या मृत्यूस चारशे वर्षे पूर्ण होत

Four hundred years of Shakespeare! | शेक्सपियरची चारशे वर्षे!

शेक्सपियरची चारशे वर्षे!

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

अभिजात लेखन हे स्थल-कालाचं बंधन सोडून सर्वदूर पोहोचत असतं. त्याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे विल्यम शेक्सपियर. २३ एप्रिल २०१६ ला शेक्सपियरच्या मृत्यूस चारशे वर्षे पूर्ण होत आहेत़ यानिमित्ताने जगभर शेक्सपियरसंबंधात विविध कार्यक्रम ज्यानं नाट्यप्रयोग, भाषणं, पुस्तक प्रकाशनं, कविता वाचणं, चित्रपटांचे खेळ होणार आहेत.

आपल्याकडे इंग्रजी शिक्षणाबरोबर शेक्सपियर येणं अपरिहार्यच होतं़ त्याचचं प्रत्यंतर म्हणजे शेक्सपियरच्या हॅम्लेट, किंग लियर यासारख्या नाटकांची मराठीत भाषांतरं झाली़ गोपाळ गणेश आगरकरांसारख्या विचारवंतालादेखील हा मोह टाळता आलेला नाही़, हे लक्षात ठेवायला हवं़ एरवी आता शेक्सपियरची नाटकं मुळातून किती वाचली जात असतील याची शंकाच आहे़ मात्र हा शेक्सपियर वेगवेगळ्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेला असतो़

हॅम्लेट, आॅथेल्लोसारख्या लोकप्रिय नाटकांचं भाषांतर, रूपांतर पुन्हा पुन्हा होत राहिलं़ ज्यात विंदा करंदीकरांपासून ते कुसुमाग्रजांची नावं येतात़ पण संपूर्ण शेक्सपियर प्रकाशित व्हायला मात्र १९८५ साल उजाडायला लागलं़
संपूर्ण शेक्सपियर प्रकाशित व्हायला, नव्हे ही कल्पना सुचवायला कारणीभूत झाले ते विचक्षण
वाचक-लेखक श्री.बा. जोशी. ते आणि प्रकाशक हं.अ. भावे एकदा गप्पा मारताना दोघांच्यात विषय निघाला की, हिंदीत, बंगालीत लेखकाचं समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याची प्रथा आहे़ पण तसा प्रयत्न मराठीत दिसत नाही़ तेव्हा तत्काळ भावे म्हणाले, मी संपूर्ण शेक्सपियर मराठीत प्रकाशित करायला तयार आहे! ही गोष्ट १९७९ मधली. प्रत्यक्षात वा़ति़ आपटेसारख्या लेखक-संपादकाला त्यासाठी १९८५ वर्ष उजाडलं़ यावरून हा प्रकल्प किती कठीण आहे हे लक्षात यावं़ एरवी इंग्रजीमध्ये संपूर्ण शेक्सपियरच्या विविध आवृत्त्या पाहायला मिळतात़ पण मराठीत फक्त असा प्रयत्न एकदाच नव्हे तर एकमेव दिसतो़ असं का व्हावं? पण मराठीतील शेक्सपियरचा मागोवा घेताना एक नाव टाळताच येणार नाही़, ते म्हणजे परशुराम देशपांडे़ त्यांनी शेक्सपियरची नाटक, सॉलेट्स, समीक्षा अशा गोष्टी तर केल्याच, पण त्यांना शेक्सपियरनं किती झपाटून टाकावं? तर त्यांनी शेक्सपियरवर दोन खंडांत कादंबरी लिहिली! खुद्द इंग्रजीमध्ये शेक्सपियरवर कुणी कादंबरी लिहिल्याचं ऐकिवात नाही!
शेक्सपियरची नाटकं-रूपांतरं मराठीत होताच त्याचं सादरीकरण मराठी नाटक कंपन्यांतून होणं अपरिहार्यच होत़ं किंबहुना आजही नाटक मंडळींना शेक्सपियरचं कोणतं ना कोणतं नाटक खुणावत असतं. कारण शेक्सपियरची नाटकं कलावंताचा कस पाहतात़
चित्रपटात शेक्सपियर
शेक्सपियरची नाटकं मराठीत येऊनसुद्धा मराठी चित्रपट मात्र शेक्सपियरच्या वाट्याला अजिबात गेलेला दिसत नाही़ असं का व्हावं?
त्या तुलनेत हिंदी चित्रपटकर्त्यांनी शेक्सपियर जवळ केलेला दिसतो़ त्यात पहिला मान सोहराब मोदीेंना द्यावा लागेल़ त्यांनी हॅम्लेट अर्थात खून का खून चित्रपट काढला.
अर्थात त्याअगोदर सोहराब मोदींनी हिंदी रंगभूमीवर हॅम्लेट केलेला होता़
हे कारण असू शकेल. किशोर
साहूनी ‘हॅम्लेट’ चित्रपट काढला
होता़ त्यानंतर बिमल रॉय प्रॉडक्शनतर्फे ‘दो दुनी चार’ चित्रपट आला होता़ जो शेक्सपियरच्या कॉमेडी आॅफ एरर्सवर बनलेला होता आणि त्यावरूनच पुढे गुलजार यांनी अंगूर बनवला!
पण शेक्सपियरच्या कथानकाची सध्या सर्वात जास्त भुरळ कुणाला पडली असेल तर विशाल भारद्वाजला! त्याचे मकबुल (मॅकबेध), ओंकारा (आॅथेल्लो), हैदर (हॅम्लेट) हे त्याची साक्ष आहेत़ अर्थात विशाल भारद्वाजने हिंदी सिनेमाच्या परंपरेला धरून सगळा हिंदी सिनेमात असतो तो नाच-गाण्याचा मसाला त्यात ठासून भरलेला आहे, हे सांगायला नकोच़़़
आता मराठीतला पहिलाच उपक्रम!
शेक्सपियरच्या मृत्यूला चारशे वर्षे होत आहेत. यानिमित्ताने जगभरात विविध उपक्रम होत आहेत़ त्यामध्ये लक्ष वेधावा असा उपक्रम मराठीतला आहे़ तो म्हणजे विजय पाडळकर कृत शेक्सपियर आणि सिनेमा हा खंडात्मक ग्रंथ आणि तो मौज प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे़ त्यासंबंधात त्यांनी म्हटले आहे, श्रेष्ठता व लोकप्रियता यांचा अद्भुत संगम झालेला हा नाटककार आहे़ शेक्सपियरच्या नाटकांचा प्रभाव वाचकांवर किंवा प्रेक्षकांनाच पडला आहे असे नाही, तर असंख्य कलावंत (कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील) लेखक आणि तत्त्वचिंतकांवरही त्याचा तेवढाच प्रभाव आहे़ गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या नाटकांचा अर्थ लावण्याची समीक्षकांची, अभ्यासकांची धडपड चालू आहे़ त्यांना अजूनही शेक्सपियर पूर्णपणे कळला आहे असे कुणी म्हणू शकत नाही़ नाटक आणि त्यावर केलेला चित्रपट याबाबत नेहमीच उलटसुलट मत व्यक्त झालेले आहे. नाटकावर चित्रपट की नाटकाच्या कथावस्तूवर चित्रपट असेही त्याबाबत मत असू शकते़ नव्हे तसे दोन तर आहेत-राहतील़ त्या अनुषंगाने विजय पाडळकर म्हणतात, चित्रपट दिग्दर्शक शेक्सपियरची आजवर अज्ञात असलेली एखादी बाजू तिच्यावर प्रकाशझोत टाकून उजळून टाकू शकतात़ शेक्सपियरच्या अभ्यासाच्या आणखी वेगळ्या वाटा आपल्या नजरेत आणून देऊ शकतात़ आणखी अस्पर्श वाटा आपल्या नजरेस आणून देऊ शकतात़ बघू या पाडळकरांच्या विधानाकडे किती जणांचे लक्ष जाते आणि त्याचा निष्कर्ष कोण कसा काढतो!

Web Title: Four hundred years of Shakespeare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.