छोट्याशा क्रोएशियाकडून जिगर नक्कीच शिकण्यासारखी

By विजय दर्डा | Published: July 16, 2018 12:04 AM2018-07-16T00:04:30+5:302018-07-16T07:15:32+5:30

मध्य आणि दक्षिण युरोपच्यामध्ये एड्रियाटिक समुद्राच्या काठी असलेल्या क्रोएशिया नावाच्या एका छोट्याशा देशाने संपूर्ण जगास अचंबित केले.

France beats Croatia 4-2 to be FIFA World Cup 2018 champions | छोट्याशा क्रोएशियाकडून जिगर नक्कीच शिकण्यासारखी

छोट्याशा क्रोएशियाकडून जिगर नक्कीच शिकण्यासारखी

Next

- विजय दर्डा
मध्य आणि दक्षिण युरोपच्यामध्ये एड्रियाटिक समुद्राच्या काठी असलेल्या क्रोएशिया नावाच्या एका छोट्याशा देशाने संपूर्ण जगास अचंबित केले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला तरी मातब्बर संघांना धूळ चारत केवळ ४० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने अंतिम फेरीत धडक मारून संपूर्ण जगाला चकित करून टाकले. विशेष म्हणजे क्रोएशिया स्वतंत्र देश म्हणून स्थापन होऊन फक्त २७ वर्षे झाली आहेत. पूर्वी तो युगोस्लाव्हियाचा एक भाग होता. त्याचे क्षेत्रफळ आहे फक्त ५६ हजार चौ. किमी. भारताचे तर सोडाच, पण ३,०७,७१३ चौ. किमी क्षेत्रफळ असलेले आपले महाराष्ट्र राज्यही आकाराने क्रोएशियाहून साडेपाचपट मोठे आहे. लोकसंख्येचा विचार केला तर या देशाची लोकसंख्या नागपूर व कामठीेएवढी आहे. अशा या एवढ्याशा देशाने ही कमाल केली तरी कशी? भारताची लोकसंख्या क्रोएशियाहून ३१२ पट अधिक असल्याने या टिकलीएवढ्या देशाच्या यशाचे कोडे भारतीयांना पडणे गैर नाही.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद््घाटनाच्या दिवशी योगायोगाने मी मॉस्कोमध्ये होतो. अर्जेंटिना, ब्राझिल, स्पेन, रशिया, क्रोएशिया, फ्रान्स, इटली, मेक्सिको, सौदी अरबस्तानसह अनेक देशांतून आलेले लाखो फुटबॉलप्रेमी आपापल्या देशांचा राष्ट्रध्वज हातात घेऊन मिरवणुकीने स्टेडियमकडे जात होते. आपल्या देशाचा जयजयकार करत होते. भारतातूनही सुमारे ३० हजार लोक आले होते. मी भारताचा राष्ट्रध्वज नेहमी जवळ बाळगतो. मीही तिरंगा बाहेर काढला व एका मित्रासोबत तो हातात घेऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिलो. एकाने मला विचारले, तुमच्या देशाचा संघही स्पर्धेत खेळतो आहे का? मी हसून उत्तर दिले की, आमच्या देशाचा संघ स्पर्धेत नाही. पण हे स्टेडियम आम्ही खेळण्याच्या लायकीचे आहे की नाही हे पाहण्यासाठी मी आलो आहे! मी मोठ्या रुबाबात उत्तर दिले खरे पण, भारतही येथे असता तर किती बरे झाले असते, या विचाराने माझे मन उदास झाले!
रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यासारख्या मातब्बरांवर मात करून क्रोएशिया एवढी मुसंडी मारेल हे त्या दिवशी कुणाच्या मनातही आले नसेल. खरे तर खेळांविषयीची ही मनस्वी आवड क्रोएशियाला पूर्वीच्या युगोस्लाव्हियातील शिक्षण पद्धतीतूनच मिळाली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी यात आणखी भर घातली. तेथे शाळांमध्ये फुटबॉल असा शिकविला जातो की विद्यार्थी अगदी त्या खेळाला वाहून घेतात. तेथील सरकारचे धोरण केवळ खेळांच्याच नव्हे तर समग्र विकासाला प्रोत्साहन देणारे आहे. म्हणून तर एवढासा क्रोएशिया जगाच्या पर्यटन नकाशावर पहिल्या २० ठिकाणांमध्ये मोडतो. याच्या नेमके उलटे, आपल्याकडे क्रीडाधोरणे आहेत, पण ती प्रत्यक्ष राबविताना नैतिकता दिसत नाही. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्याहून लहान देश पदकांची लयलूट करतात. आपल्या वाट्याला कधी एखादे पदक आले तर आपल्याला आभाळ ठेंगणे वाटू लागते. याचे साधे कारण म्हणजे आपल्याकडे ठोस असे क्रीडाधोरणच नाही. आमिर खानने त्याच्या ‘दंगल’ चित्रपटात या दुखऱ्या नसेवर नेमके बोट ठेवले आहे.
देशाला क्रीडाक्षेत्रात पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी समग्र धोरण तयार करावे लागेल, हे इंदिरा गांधींना बºयाच पूर्वी जाणवले. त्यांनी त्यासाठी बरेच कामही केले.
सन १९८४ मध्ये इंदिराजींनी राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केले. सन १९९२ मध्ये हेच धोरण अधिक व्यापक स्वरूपात सुधारित करण्यात आले. चीनचे थोर नेते माओ त्से तुंग म्हणायचे, आधी निरोगी शरीर कमवा व नंतर अभ्यास करा! आपल्या क्रीडाधोेरणाच्या आराखड्यात माओंच्या या वचनाचाही दाखला दिला गेला होता. लोकमान्य टिळकसुद्धा निरोगी, बलसंपन्न शरीराला सर्वोच्च महत्त्व देत असत. तब्येत दणकट करून स्वातंत्र्यासाठी लढता यावे यासाठी टिळकांनी शिक्षणातून एक वर्षाची सुटी घेतली होती. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये आई-वडिलांना याची जाणीव होती व म्हणून ते मुलांना खास करून संध्याकाळच्या वेळी मैदानावर खेळण्यासाठी पिटाळत असत. आता शहरांमध्ये मैदानेच राहिली नाहीत, तर मुलांनी खेळावे तरी कुठे? आता आई-वडिलांचे अग्रक्रमही बदलले आहेत. खेळांची जागा ट्यूशन क्लासने घेतली आहे.
डिसेंबर २०११ मध्ये भारत सरकारने नवे राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केले. त्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी खासगी कंपन्यांनाही सामील करून घेण्याची तरतूद केली गेली. त्याचप्रमाणे आदिवासी भाग आणि ग्रामीण भागांतही खेळांना प्रोत्साहन देण्यावर त्यात भर देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात यात फारसे यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. क्रीडा क्षेत्रही राजकारणाच्या दलदलीत अडकले आहे. कोणत्याही प्रमुख क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी कुणीतरी मोठा राजकीय नेता दिसतो. प्रत्येक क्रीडा संघटना व महासंघ नेत्यांनी काबीज करून टाकला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण फुटबॉलची जागतिक स्पर्धा रशियात सुरू असूनही त्यांच्या पुतिनसारख्या शक्तिशाली नेत्याचे छायाचित्र, होर्डिंग किंवा बॅनर मॉस्कोच्या रस्त्यांवर अथवा स्टेडियममध्येही दिसले नाहीत. याचे कारण त्यांच्यालेखी खेळ महत्त्वाचा आहे, नेते नाहीत! आपल्याकडे खेळांना दुय्यम लेखले जाते. याचा परिणाम असा की, १२५ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या देशात मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीलाही घरघर लागली आहे.
क्रीडा क्षेत्रातील आपल्या वाईट कामगिरीचा विषय मी संसदेत अनेक वेळा मांडला. मी असे सांगितले की, कोणताही देश त्याचे आर्थिक यश, तंत्रज्ञानातील प्रगती किंवा खेळाडूंच्या देदिप्यमान कामगिरीने ओळखला जातो. पण दुर्दैवाने आपण खेळांना महत्त्व देत नाही. खेळाची सुरुवात शाळा आणि गावापासून व्हायला हवी. क्रीडा खाते स्वत: पंतप्रधानांकडे असावे, अशीही मी मागणी केली. क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. आताच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मर्कोन, बेल्जियमचे राजे फिलिप व महाराणी मॅथिल्डे आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जातीने हजर राहिले. क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रेबर कित्रोविक या तर इकॉनॉमी क्लासने विमानाचा प्रवास करून आल्या व ड्रेसिंग रूममध्ये जाऊन आपल्या प्रत्येक खेळाडूची गळाभेट घेऊन प्रोत्साहित केले. आपली नेतेमंडळी इतक्या सहजपणे भेटतात?
मी पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत चीनला गेलो होतो. चीनमध्ये मुलांना वयाच्या सहाव्या वर्षांपासून प्रशिक्षणासाठी क्रीडा अकादमीमध्ये दाखल केले जाते. मुलांची आवड व शारीरिक योग्यता यानुसार त्यांना विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे औपचारिक शिक्षणही तेथेच होते. त्यामुळे अशा क्रीडा अकादमी पाहायला जायला हवे, असा मी नरसिंहराव यांच्याकडे आग्रह धरला. काही कारणांमुळे आम्हाला ते शक्य झाले नाही. परंतु आपल्याकडेही मुलांना लहान वयापासून क्रीडानिपुण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे मला मनापासून वाटते. मर्यादित साधनसंपन्नता असूनही शिखर कसे गाठावे हे आपण क्रोएशियासारख्या देशाकडून शिकायला हवे. यासाठी गरज आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची, स्पष्ट धोरणांची, समर्पित भावनेची आणि काहीही झाले तरी जिंकण्याच्या जिगरबाज जिद्दीची. खेळांचा कारभार खेळाडूंच्या हाती सोपवा, यश नक्कीच मिळेल. आपली तरुण पिढी माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विज्ञान व कला यासारख्या क्षेत्रांत भारताचे नाव जगभर उज्ज्वल करते तर क्रीडाक्षेत्रातही ती नक्कीच यशोशिखर गाठेल, यात शंका नाही!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
आसामच्या एका छोट्याशा गावातील हिमा दास या जिद्दी मुलीने भारताचे फार वर्षांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले. २० वर्षांखालील खेळाडूंच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने सुवर्णपदक पटकविले. हिमा अगदी सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तरीही तिने परिस्थितीवर मात करून हे यश संपादित केले. हिमा ही खरोखरच भारताची लखलखती चांदणी आहे. तिचे यश सध्याच्या व भावी पिढ्यांनाही नक्कीच प्रेरण देईल. हिमा तुझे मनापासून अभिनंदन!
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: France beats Croatia 4-2 to be FIFA World Cup 2018 champions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.