खरीखुरी ‘डंकी फ्लाइट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 08:19 AM2023-12-27T08:19:56+5:302023-12-27T08:21:08+5:30
आता या मंडळींनी देश का सोडला, याची चौकशी सुरू झाली आहे.
एखादा चित्रपट किंवा अन्य कलाकृती रसिकांसमोर यावी, ती कथा, तो विषय काल्पनिक समजून त्या विषयाची चर्चा सुरू व्हावी आणि नेमकी त्याचवेळी तशीच घटना घडावी, असा योग खूप कमी वेळा जुळून येतो. त्यातही तो विषय मानवी व्यवहार, उपजीविकेपासून प्रतिष्ठेची साधने, त्यातील शोकांतिकेशी संबंधित असेल तर हा दैवदुर्विलास गंभीर वळण घेतो.
दिग्गज अभिनेता शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘डंकी’ सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला, त्याच दिवशी मुंबईवरून मध्य अमेरिकेतील निकाराग्वाकडे जाताना दुबईवरून उड्डाण झाल्यानंतर इंधन भरण्यासाठी फ्रान्समध्ये पॅरिस वॅट्री विमानतळावर उतरलेले एक विशेष विमान थांबविण्यात आले. त्यातील ३०३ प्रवाशांपैकी बहुतेक सगळे भारतीय होते. अमेरिका किंवा अन्य देशांमध्ये छुप्या मार्गाने घुसण्यासाठी ते जात असावेत, या संशयावरून त्यांची मानवी तस्करीच्या दृष्टीने चौकशी झाली. म्हणजे त्यांना जोरजबरदस्तीने नेण्यात येत होते, असे नाही. उलट अगदी कुटुंबांसह ते स्वमर्जीने देश सोडून परदेशात स्थायिक होण्यासाठी निघाले असावेत. त्यात तथ्यही असावे. म्हणून चार दिवसांच्या चौकशीनंतर २७६ प्रवाशांसह ते विमान परत पाठवले गेले. मंगळवारी पहाटे ते मुंबईत उतरले.
आता या मंडळींनी देश का सोडला, याची चौकशी सुरू झाली आहे. एकूणच ऐषारामात जीवन जगण्याच्या त्यांच्या स्वप्नांची शोकांतिका झाली आहे. मागे उरलेल्यांमध्ये वीस प्रौढ व पाच लहान मुले आहेत. ते मायदेशी परतण्यास तयार नाहीत. उलट त्यांनी फ्रान्सकडे आश्रय मागितला आहे. कदाचित इथून निघताना मागचे सगळे पाश त्यांनी पूर्णपणे तोडून टाकले असावेत. उरलेल्या दोघांचा मानवी तस्करीशी थेट संबंध असावा. शाहरूखच्या ‘डंकी’ सिनेमाचा वर उल्लेख केला तो यासाठीच की त्याचाही विषय बेकायदेशीर परदेशी वास्तव्याचा आहे. त्यासाठी थेट प्रवास होत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, मग चौथ्या अशा टप्प्याटप्प्याने व छुप्या पद्धतीने विमान प्रवास व त्यातील हालअपेष्टा चित्रपटात आहेत. फरक इतकाच की ‘डंकी’मधील हार्डी, बल्ली, बग्गू, सुखी, मनू वगैरे मित्र-मैत्रिणींना इंग्लंडमधील सुखासीन आयुष्य खुणावते, तर मुंबई ते मुंबई व्हाया पॅरिस प्रवास केलेल्या विमानातील प्रवाशांसाठी निकाराग्वा हा अमेरिकेच्या आकर्षणामधील थांबा असावा. परदेशी नागरिकत्वाचे आकर्षण देशभर आहेच; पण पंजाब, हरयाणात ते खूप अधिक आहे.
आयुष्यात एकदाचे कॅनडा, अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी वाट्टेल तितकी रक्कम मोजण्याची, हालअपेष्टा सहन करण्याची तयारी तिथल्या तरुणांची असते. अशा स्वप्नांमागे धावण्याचे वेड अगदी खेड्यापाड्यात पोहोचले आहे. इंग्लंड किंवा अमेरिकेत गेल्यानंतर राहणीमान, भाषा, सार्वजनिक ठिकाणच्या सभ्यता कशा हव्यात, याविषयीचे शिकवणी वर्ग चालविले जातात. आणि श्रीमंत देशांच्या दिशेने तरुणाईला घेऊन जाणाऱ्या विमानाला पंजाबमध्ये ‘डंकी फ्लाइट’ म्हणतात. इंग्रजीत त्याला डाँकी फ्लाइट असा शब्द असला तरी मूळ पंजाबी शब्दच अधिक प्रचलित आहे. निकाराग्वाकडे निघालेली ही अशीच डंकी फ्लाइट होती.
मध्य अमेरिकेत उत्तरेला होंडुरास, दक्षिणेला कोस्टा रिका, पूर्वेकडे कॅरेबियन बेटे, पश्चिमेला प्रशांत महासागर अशा सीमांनी वेढलेला तो अत्यंत गरीब देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील अमेरिका, कॅनडा किंवा ब्राझीलसारखी समृद्धी निकाराग्वाच्या वाट्याला आलेली नाही; परंतु, त्या श्रीमंत देशांमध्ये लपूनछपून बेकायदेशीर प्रवेशासाठी अत्यंत योग्य ठिकाण अशी निकाराग्वाची ओळख आहे. तिथे उतरले की नंतर सीमेपर्यंत पोहोचविणारी, अमेरिकेत घुसविणारी एक चोरव्यवस्था त्या टापूमध्ये कार्यरत आहे. अमेरिकेच्या सीमेवर अशी प्रवेशाची एखादी फट शोधत असलेली कुटुंबेच्या कुटुंबे काही बातम्यांमध्ये मध्यंतरी दिसली होती. ते सर्वजण अशाच कुठल्या तरी डंकी फ्लाइटने तिथे पोहोचले असावेत. यात सगळे पंजाब किंवा हरयाणाचे असतात असे नाही.
अगदी संपन्न गुजरातमधील अनेक कुटुंबांचे डोळे अमेरिकेच्या वैभवापुढे दीपून गेल्याचे, ते वैभव आपल्या आयुष्यात यावे म्हणून ते धडपडत असल्याचे दिसून आले आहे. अशाच ४२ हजारांहून अधिक भारतीयांनी गेल्या वर्षभरात अमेरिकेत घुसखोरी केली. सध्या अमेरिकेत सव्वासात लाख भारतीयांचे बेकायदेशीर वास्तव्य आहे. याबाबत मेक्सिको व एल साल्वाडोरनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. याशिवाय अधिकृतपणे शिक्षण किंवा नोकरीसाठी विदेशी जाण्याची इच्छा असलेल्यांची संख्या याहून कितीतरी मोठी आहे. भारत जागतिक महासत्ता बनत आहे किंवा चौफेर प्रगती सुरू आहे, असे एकीकडे चित्र आणि रील ते रिअल डंकी फ्लाइट या या विसंगतीचा काय अर्थ लावायचा?