मुंबईकरांसाठी फुकटची करमणूक
By admin | Published: June 30, 2016 05:42 AM2016-06-30T05:42:37+5:302016-06-30T05:42:37+5:30
मुंबईत सुरू असलेली शिवसेना आणि भाजपा यांची झुंज त्या शहराएवढीच महाराष्ट्राचीही करमणूक करीत आहे.
मुंबईत सुरू असलेली शिवसेना आणि भाजपा यांची झुंज त्या शहराएवढीच महाराष्ट्राचीही करमणूक करीत आहे. मंत्रिपदाच्या वाटपात झालेली सेनेच्या नेतृत्वाची उपेक्षा तिला स्वस्थ बसू देत नाही आणि तिच्या हातून मुंबई हिसकावून घेण्याचे मनसुबे भाजपाला शांत होऊ देत नाहीत. मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या वेळी भाजपाने सेनेला प्रथम चार हात दूर ठेवले आणि पुढे तिला जवळ केले तरी ज्या खात्यांकडे पैसा नाही, नाव नाही, वजन नाही अशी चार खाती देऊन औदार्याचा आव आणला. दिल्लीतही सेनेला, तिचे १८ खासदार असताना एका बिनकामाच्या मंत्रिपदावर भाजपाने समाधान मानायला भाग पाडले. नाराजी दाखवली तर मैत्रीचे खोबरे होते आणि न दाखवली तर आतल्या आतले जळणे थांबत नाही. या स्थितीत सेनेने आपल्या कार्यक्रमातून आणि मुखपत्रातून भाजपावर टीकेचे अस्त्र चालवायचा, मात्र ते तुटण्याआधी म्यान करायचा सावध कार्यक्रम हाती घेतला. त्याचमुळे शरद पवारांनी सेनेला गुळाला चिकटलेला मुंगळा म्हटले. सत्ता सोडवत नाही आणि तिच्यात मिळालेल्या वाट्यावर समाधान मानता येत नाही अशी सेनेची स्थिती आहे. त्यातून पूर्वीच्या युती सरकारच्या काळात मुख्यमंत्रिपदासह सगळी महत्त्वाची मंत्रिपदे सेनेकडे होती. आताच्या सरकारात सेनेची मंत्रिपदे सांगावी लागतात. त्यामुळे कधी अणुइंधन करारात पत्कराव्या लागलेल्या नामुष्कीसाठी, कधी भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाच्या कामात आलेल्या अपयशासाठी तर कधी निवडणुकीत प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपयांचे खोटे आमिष दाखविण्यासाठी सेनेचे मुखपत्र मोदींसह भाजपामधील इतरांना नुसते झोडून काढत आहे. हा मार असह्य झाला तेव्हा तुमच्या पत्राची कार्यालये जाळू असा प्रेमळ इशारा भाजपाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी सेनेला दिला. त्यावर भाजपाच्या पुढाऱ्यांची डोकी तपासून घ्यायला देशभर मानसोपचार तज्ज्ञांची व्यवस्था करावी, अशी आरोग्यदायी सूचना सेनेने त्या पक्षाला केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत आणि मुंबई हा सेनेचा मुलाधार आहे. भाजपावाल्यांची मुंबईवर नजर आहे. ती देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती आपल्या हाती असावी असे सगळ््याच पक्षांना आजवर वाटत आले आहे. त्याचमुळे युती न करता सारी मुंबई आम्हीच लढवू अशी भाजपाची भाषा आहे तर मुंबईसाठी युती तोडू असे सेनेचे म्हणणे आहे. वास्तव हे की दोन्ही पक्षांना युती हवी आहे. त्याखेरीज त्यांना ते महानगर जिंकता येणे अशक्यही आहे. तरीही हा वाद चालू ठेवणे ही त्यांची गरज आहे. त्यातून त्यांचे नाव मुंबईचे काळजीकर्ते म्हणून लोकांसमोर सातत्याने येते हे एक कारण आणि दुसरे, या वादंगातून उद्याच्या जागा वाटपात आपल्या जागा वाढवून घेण्याची तयारी करता येते हे. मात्र भाजपाचा आताचा पवित्रा पाहाता तो पक्ष सेनेला यावेळी हव्या तेवढ्या जागा मिळू देणार नाही हे नक्की. देशात आणि महाराष्ट्रात जो पक्ष राज्य करतो तो मुंबईत कमी जागांवर समाधान मानेल याची शक्यताही नाही. त्यातून मातोश्रीवर जाणारे प्रमोद आणि गोपीनाथ हे नेते आता राहिले नाहीत. आताचे भाजपाचे नेतृत्व सत्तेच्या उंच पदावर आहे आणि सेनेची अवस्था सत्तेत असून सत्तेबाहेर राहावे लागत असलेल्या पक्षासारखी आहे. भाजपाची राज्यातील स्थितीही आज तेवढीशी चांगली नाही. त्या पक्षाची पुढारी माणसेही आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. काँग्रेसच्या घोटाळ््यांची चर्चा करून भाजपालाही आता फार काळ आपले समर्थन करता येईल अशी स्थिती नाही. कोणत्या मंत्र्याने पाऊणशे कोटीचे फार्म हाऊस आपल्या मतदार संघात बांधले आणि कोणी नागपूरशेजारी प्रचंड जमिनी खरेदी केल्या याची चर्चा लोकांत आहे. बड्यांविरुद्ध उघड बोलणे लोक टाळत असले तरी त्यांची तशी करणी सर्वसामान्यांच्या मनात डाचत असतेच. त्यामुळे शिवसेनेलाही भाजपाला धारेवर धरायला मिळणारे विषय बरेच आहेत आणि सेनेवर सत्ताखोरीचा आरोप करणे भाजपाच्या मर्यादेत बसणारे आहे. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचे युती सरकार महाराष्ट्रात असतानाही त्यांच्यात भांडणे होती. मुंड्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि मनोहर जोशींच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे भाजपाच्या वाट्याला मोठे यश जाणार नाही याची काळजी घेत होते. जोशी जाऊन नारायण राणे आले तेव्हाही या स्थितीत फारसा फरक पडला नाही. मात्र त्या सबंध काळात दोन्ही पक्षांच्या कुरबुरींवर पांघरूण घालायला प्रमोद महाजन हा धुरंधर नेता भाजपासोबत होता. आता उद्धव ठाकरे फडणवीसांना जुमानत नाहीत आणि त्यांचे मुखपत्र भाजपाखेरीज दुसऱ्या कोणावर निशाणा साधत नाही. दुसऱ्याला खाली दाखविल्याखेरीज आपली उंची वाढवून दाखविता येत नाही आणि उंची वाढवायची सबळ आणि समर्थ कारणे नसतील तर सडकछाप होण्याखेरीज व प्रतिस्पर्ध्यावर दगडफेक करण्याखेरीज दुसरा मार्ग नसतो. सध्या तरी या भांडणाने मुंबईकरांना रंजविले आहे. त्याची परिणती पाहाणे हा महाराष्ट्राच्याही रुचीचा विषय आहे.