मैत्र प्राण्यांशी, पण वैर पशुजन्य आजारांशी; प्राणिजन्य आजारांचा मानवांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 06:21 AM2024-07-06T06:21:02+5:302024-07-06T06:21:25+5:30
शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक १० पैकी ६ पेक्षा जास्त संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून संक्रमित होतात. आज ‘जागतिक पशुसंक्रमित आजार’ दिवस. त्यानिमित्त...
डॉ. सुनील देशपांडे, श्वान आरोग्यतज्ज्ञ, पशुधन विकास अधिकारी, सातारा
ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानमध्ये ‘भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे’ अशी इच्छा व्यक्त केली होती. पाळीव प्राणी आणि मानवप्राणी यांचे ऋणानुबंध हजारो वर्षांचे आहेत. कुटुंबाचाच एक भाग बनून हे पाळीव प्राणी मानवाच्या घरातच नाही, तर त्यांच्या हृदयात राहतात ! देशी किंवा जातवान श्वान, मांजरी, हॅमस्टर, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे असे कोणीही. आपले प्रिय प्राणी, खूप साऱ्या आनंदाबरोबरच, अनवधानाने त्यांच्या पालकांना, मालकांना कधी-कधी त्यांच्याकडचे आजारही भेट देतात !
प्राण्यांमध्ये उद्भवणारे असे काही निवडक, मोजके आजार जे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात त्यांचे Zoonotic disease या नावाने वैश्विक भाषेत बारसं कऱण्यात आलंय. पशुसंक्रमित आजार असे आपल्या मायबोलीतलं त्यांचं नाव ! हे आजार व्हायरस, बॅक्टेरिया, परजिवी, कीटक आणि बुरशी यांसारख्या जंतूंमुळे होतात. हे विविध प्रकारचे आजार सौम्य ते गंभीर असतात आणि त्यांतून कधीकधी मृत्यूदेखील होतो.
शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की प्रत्येक १० पैकी ६ पेक्षा जास्त संसर्गजन्य रोग हे प्राण्यांपासून संक्रमित होतात. रेबीज, ब्रुसेलोसिस, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, निपाह, लेप्टोस्पायरोसिस, हुकवर्म, ग्लँडर्स, एव्हियन इन्फ्लूएंझा, वेस्ट नाईल व्हायरस अशी किती पशुसंक्रमित आजारांची नावे घ्यावीत! तज्ज्ञांच्या मते, सध्या जगात २०० हून अधिक अशा आजारांचे तगडे सैन्य माणूस व प्राण्यांच्या निःस्पृह नात्यांमध्ये आव्हान देऊन उभे आहे ! याविषयाची सुरुवातच श्वानापासून मानवाला होणाऱ्या रेबीज आजाराच्या चर्चेने झाली.
पशुसंक्रमित आजारांचं महत्त्व जगासमोर आणलं लुई पाश्चर यांनी. ६ जुलै १८८५ रोजी, लुई पाश्चर यांनी जोसेफ मेस्टर नावाच्या व्यक्तीला रेबीज अर्थात पिसाळणे या उपचार नसलेल्या जीवघेण्या पशुसंक्रमित रोगापासून बचाव करण्यासाठी पहिली लस दिली. हे लसीकरण यशस्वी झाल्यामुळे विशेषत: वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला गेला. रेबीजसारख्या रोगांवर उपचार अशक्य होते, रुग्णांचा भयावह मृत्यू ठरलेला होता. त्यामुळे मानवी इतिहासातील ही एक अतिशय महत्त्वाची कामगिरी होती; म्हणूनच या कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो !
लुई पाश्चर हा हाडाचा शास्त्रज्ञ. त्याने कॉलरा, अँथ्रॅक्स आणि रेबीज लस निर्माणकार्यात मोठं काम केलं. पाश्चर स्वतः पूर्णपणे निर्भय होता. लाळेचा नमुना मिळवण्यासाठी टेबलावर ठेवलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून पाश्चर स्वतःच्या ओठांमध्ये काचेच्या नळीला धरून प्राणघातक लाळेचे थेंब न घाबरता नळीत ओढून घ्यायचा!! असे हे झोकून देऊन काम करणारे शास्त्रज्ञ. यांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. संक्रमित प्राण्याची लाळ, रक्त, मूत्र, विष्ठा किंवा शरीरातील इतर द्रव यांच्या संपर्कात येणे; प्राण्यांना जास्त स्पर्श करणे आणि खाजवणे; गोठ्यात, केनेल, तबेल्यात सारखे जाणे; प्राण्यांतील जंत आणि बाह्य परजिवी यांचा चावा किंवा संपर्क येणे; प्राण्यांमुळे मानवी अन्न-पाणी दूषित होणे, या सर्वांमुळे प्राणिजन्य आजारांचा मानवांना संसर्ग होऊ शकतो.
प्राण्यांच्या आणि आपल्या सहजीवनाला काडीमोड घेता येत नाही ! मग करायचं काय? जर तुम्हाला कोणत्याही प्राण्याने चावा घेतला असेल तर त्वरित उपचार करावेत. प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. प्राण्यांपासून योग्य अंतर ठेवावे आणि त्यांच्याशी सारखा थेट संपर्क टाळावा. डास, माश्या, कीटकांपासून स्वतःचे आणि प्राण्यांचे रक्षण करा. खाद्यपदार्थांची काळजी घ्या. पशुसंक्रमित रोगांबद्दलदेखील जागरूक राहा. असे सगळे केल्याने माउलींची प्रार्थना खरी ठरेल आणि प्राणी मनुष्यप्राण्याचे ‘मैत्र जिवांचे’ठरतील हे निश्चित !
drsunildeshpande@gmail.com