दोस्ती - दुश्मनी !

By सचिन जवळकोटे | Published: January 20, 2019 07:20 AM2019-01-20T07:20:44+5:302019-01-20T07:27:28+5:30

लगाव बत्ती...

Friendship - Enemy! | दोस्ती - दुश्मनी !

दोस्ती - दुश्मनी !

Next
ठळक मुद्देराजकारणातल्या मैत्रीला ना कधी कायमचा ओलावा असतोमाढ्यात सोलापूरकर की सातारकर ?

राजकारणातल्या मैत्रीला ना कधी कायमचा ओलावा असतो... दुश्मनीला ना कधी कायमची धार असते. सत्तेच्या गुर्मीत एकमेकांना शिंगावर घेण्याची भाषा करणारे ‘दुश्मन’ जेव्हा खिंडीत सापडतात, तेव्हा हीच हतबलता त्यांना ‘दोस्त’ बनवून जाते. सोलापूरचंराजकारणही सध्या याच वळणावर. आयुष्यभर एकमेकांची जिरविण्यात मश्गुल राहिलेले दिग्गज नेते जेव्हा एकत्र येऊन दिलखुलासपणे एकमेकांच्या कानात बोलत राहतात, तेव्हा दोन देशमुखांसाठीही असतो काळाचा अचूक संदेश.. ‘जमिनीवर या!’
‘जानी दुश्मनी’ बनली ‘जानेमन दोस्ती’.. 

आज दोन देशमुख भांडतात, रुसतात, सवतसुभा मांडतात; परंतु खरी गटबाजी काय असते, हे दोन-तीन दशकांपूर्वी ‘शिंदे-मोहिते-पाटील’ गटांनी दाखविली. स्टेजवर हातात हात घालून लोकांसमोर हसत येणारे हे दोन नेते एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे पत्ते परस्पर कसे कापायचे, हे भल्या-भल्यांना शेवटपर्यंत कळालं नाही. केवळ एका गटाचा शिक्का बसला म्हणून थेट राजकारणातूनच उठविली गेलेली मंडळी आजही कुठल्यातरी गावच्या पारावर निवांतपणे माशा मारत बसलेली सापडतील.


मात्र एक खरं, या दोन्ही नेत्यांना आपापल्या ताकदीचा पुरेपूर अंदाज होता. त्यामुळंच ‘डीसीसी’त शेवटपर्यंत सोलापूरच्या सुपुत्रांना पाऊल टाकता आलं नाही. सोलापूरच्या ‘इंद्रभुवन’मध्ये अखेरपर्यंत विजयदादांनाही आपली पाळंमुळं काही भरभक्कमपणे रोवता आली नाहीत.


   पंधरा-सोळा वर्षांपूर्वी सोलापूरकर सीएम, तर अकलूजकर डीसीएम होते. ख-या अर्थानं तो जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी सुवर्णकाळ होता. या काळात अनेक जण गबरगंड झाले; मात्र आज या दोघांचीही परिस्थिती अत्यंत विचित्र. अडचणीच्या वळणावर ‘मोठे दादा अकलूजकर’ यांना माढ्यात तिकीट मिळणार की नाही, हे फक्त बारामतीकरांनाच ठाऊक. इकडं ‘लाडके सुपुत्र सोलापूरकर’ यांचं तिकीट फिक्स असलं तरी गेल्या वेळचा डाग पुसून काढणार की नाही, हे काळालाच ठाऊक.


  सुशीलकुमारांना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद, असा एक रिपोर्ट; मात्र शहरातली मानसिकता अजूनही म्हणे चिंताजनक. प्रामाणिक अन् कष्टाळू कार्यकर्त्यांचा विषय ठरू शकतो गंभीर. एकेकाळी शहर हाच सुशीलकुमारांच्या यशस्वी राजकारणाचा बालेकिल्ला होता; मात्र आता जागोजागी बुरूज ढासळलेत, मनोरे गडगडलेत, चिराही हलल्यात.


 जिल्ह्यातील एकेकाळच्या या दोन बलाढ्य नेत्यांनी राजकारणात एवढी हतबलता प्रथमच अनुभवली असावी. सध्या दोघांचंही दु:ख जवळपास सेमच. एकाला पक्षाकडून दुरावा, तर दुसºयाला हक्काच्या जनतेकडून. त्यामुळंच की काय, सध्या दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. अनेक दशकांपासून चालत आलेली आपली ‘जानी दुश्मनी’ आता ‘जानेमन दोस्ती’त परावर्तित करू पाहताहेत. बघू या काय होतंय ते.. तोपर्यंत लगाव बत्ती !

‘हात’वाल्या कार्यकर्त्यांपेक्षा ‘घड्याळ’वाले नेते जास्त !
आजच्या घडीला शहरात ‘हात’वाल्यांकडे जेवढे प्रामाणिक कार्यकर्ते असतील, त्याहीपेक्षा जास्त दिखावू नेते ‘घड्याळ’वाल्यांकडे असावेत. या वाक्याचा अचूक अर्थ ज्यानं-त्यानं आपल्या अनुभवानं काढावा. असो. ही परिस्थिती ओळखूनच कदाचित सुशीलकुमारांनी केवळ आपल्या पार्टीवर विसंबून न राहता इतर मित्रपक्षांनाही जवळ करण्याची जी धडपड चालवलीय, त्याचाच परिपाक म्हणजे अकलूजच्या दादांसोबतच्या गुजगोष्टी असाव्यात.


  अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अकोल्याच्या बाळासाहेबांची मध्यंतरी ‘पार्क’वर झालेली सभा डोळ्यात भरण्याजोगी ठरली. एवढी गर्दी सा-याच विरोधकांना जणू धडकी भरविणारी. त्यातल्या त्यात ‘एमआयएम’चा माहोल ‘हात’वाल्यांसाठी पुनश्च धोक्याचा इशारा देणारा. त्यानंतरच सूत्रं हलली. सुपुत्रांनी पूर्वी कोर्टातही काम केलेलं. काही खटले बाहेरच्या बाहेरच निकाली काढायचे असतात, हे त्यांना अचूक ठाऊक. त्यामुळं बाळासाहेबांनाच आघाडीत घेऊन ‘वंचितां’ची सहानुभूती आपल्याकडं वळविण्यासाठी हुश्शाऽऽर राजनीती सोलापुरातूनच आखली गेलेली. ना हत्ती... ना घोडा... थेट वजिराची चाल... चेक अ‍ॅण्ड मेट !  आलं का लक्षात ? लगाव बत्ती !

सोलापूर में किसको लाके पटक देंगे ?
  पटक देंगेऽऽ पटक देंगेऽऽ’ असं तीन वेळा म्हणून ‘कमळ’वाल्या ‘अमित’भार्इंनी ‘धनुष्या’ला जाहीर घटस्फोटाचा इशारा दिला. त्यामुळं तिकडं ‘मातोश्री’वाले किती कामाला लागले माहीत नाही... परंतु जिल्ह्यातील बिच्चारे ‘शिवसैनिक’ मात्र दचकून इकडं-तिकडं बघू लागले... कारण लोकसभेला दोन्ही मतदारसंघात आपलाही उमेदवार असू शकतो, हे ‘भगवं उपरण’वाल्यांच्या डोक्यातच नव्हतं. कॅप्टन आनंदराव अडसुळांचे चिरंजीव अभिजित यांना सोलापुरात उभं करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. बापऽऽरे.. इतके दिवस ‘कोण हे साबळे ?’ असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यांच्या नावाची सवय झालीय म्हणेपर्यंत ‘कोण हे अडसूळ ?’ म्हणण्याची पाळी आली की रावऽऽ असो. पंढरीच्या तीरी येणारे असे लईऽऽ वारकरी बघण्याची सोलापूरकरांना सवय. लगाव बत्ती...

माढ्यात सोलापूरकर की सातारकर ?
  माढा लोकसभेला जिथं आजपावेतो ‘कमळ’वाल्यांनाच हुकुमी एक्का सापडेना, तिथं ‘धनुष्या’ची अवस्था काय वर्णावी?..  कशी सांगावी ? तरीही त्यातल्या त्यात अजून एक ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे माळशिरसच्या जानकरांनी ‘उद्धो’जींची ‘उत्तम’ भेट घेऊन तानाजीरावांसोबत नव्या समीकरणांचा वेध घेतलेला.. कारण कोल्हापूरच्या ‘चंद्रकांत दादां’नी अकलूजच्या ‘प्रतापगडा’वर जाऊन ‘धवल’ भवितव्यासाठी ‘धाकट्या सिंहा’सोबत बराच वेळ चर्चा केल्याची कुणकुण लागताच ‘मातोश्री’कार सावध झाले. त्यांनी सांगोल्याच्या ‘शहाजीबापूं’च्या नावाचाही विचार केला. मात्र ‘कलटीबहाद्दर’ नेत्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक नेहमीच अग्रक्रमावर. त्यामुळं ‘युती’चा मॅटर‘क्लोज’ झाला तर ‘बापूं’चा चॅप्टर बाजूला ठेवून शेवटच्या क्षणी म्हणे साता-याच्या बानुगडे-पाटलांचं नाव पुढं आणणार माढ्यासाठी. वॉवऽऽ ‘घड्याळ’वाले प्रभाकर हे सातारकर. ‘धनुष्य’वाले बानुगडे हेही सातारकर. मग काय करतील ‘कमळ’वाले सोलापूरकर ?.. चला बारामतीला.. लगाव बत्ती !

- सचिन जवळकोटे

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Friendship - Enemy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.