मोर्चे आणि मोर्चेबंदी

By admin | Published: September 14, 2016 11:02 PM2016-09-14T23:02:32+5:302016-09-14T23:02:32+5:30

राज्यातील मराठा ज्ञातीसमूहाच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मूक मोर्चांनीे ‘मोर्चा’ या संकल्पनेलाच पूर्णपणे धक्का दिला असून विशेष म्हणजे हा धक्का अत्यंत सुखद आहे

Front and Frontline | मोर्चे आणि मोर्चेबंदी

मोर्चे आणि मोर्चेबंदी

Next

राज्यातील मराठा ज्ञातीसमूहाच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मूक मोर्चांनीे ‘मोर्चा’ या संकल्पनेलाच पूर्णपणे धक्का दिला असून विशेष म्हणजे हा धक्का अत्यंत सुखद आहे. प्रचंड मोठी संख्या असूनही अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघणाऱ्या या मोर्चांमागे मराठा जातीमधील आक्रोश आहे असे म्हणण्याऐवजी त्यामागे जातीच्या अंत:स्थ वेदना आहेत असे म्हणणे सयुक्तिक ठरेल कारण आक्रोशात जितका आवाज ्असतो तितकाही आवाज या मोर्चांमध्ये नसतो. आवाजापेक्षा शांतता अधिक गंभीर आणि प्रसंगी भयकारी असते असे म्हटले जाते आणि कदाचित त्यामुळेच राज्य सरकारने या मोर्चांची धास्ती घेतली आहे असे म्हटले जात असावे. मोर्चेकरांच्या भावनांशी सरकार सहमत आहे असेही सांगितले जात आहे. पण सहमत आहे म्हणजे काय आहे? शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) कथित गैरवापरास प्रतिबंध या मराठी ज्ञातीच्या केवळ मागण्याच नव्हे तर ठसठसणाऱ्या वेदना आहेत. त्यांच्याशी राज्य सरकार सहमत आहे म्हणजे नेमके काय आहे, याचा उलगडा होत नाही. मराठा जातीला आरक्षण देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, हरयाणा वा तत्सम कोणत्याही राज्य सरकारच्या कटिबद्धतेस सर्वोच्च न्यायालय जुमानायला तयार नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाईल तेव्हा जाईल पण तोवर आरक्षण देऊन टाकून मराठा मंडळींना जिंकून घेऊ असा विचार करावा तर कोणाचे तरी आरक्षण कमी करावे लागणार व तसे केले की तो वर्ग किंवा ती जात सरकारच्या अंगावर धाऊन जाणार. तोच प्रकार अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या कथित गैरवापराचा. हा गैरवापर अनुसूचित जाती-जामातींकरवी नव्हे तर सवर्णांकरवी केला जातो असे शरद पवारांचे सुधारित विधान आहे. पण ती त्यांची पश्चातबुद्धी वा सारवासारव आहे. त्यामुळे प्रस्तुत कायदा रद्द करणे तर राहोच पण त्यात सुधारणा करण्याची बाब सरकार उच्चारुदेखील शकत नाही हे वास्तव आहे. पण तरीही सरकारला संशयाचा फायदा देत, त्याच्या सहवेदना मराठा ज्ञातीच्या पाठीशी आहेत असे मान्य करायचे तर मग अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे एक खासदार मराठा मोर्चाच्या पुढ्यात प्रतिमोर्चाचे आव्हान उभे करण्याची भाषा का करीत आहेत आणि या प्रतिमोर्चावर टीका करतानाच प्रकाश आंबेडकर राजधानीत दलितांचा जो मोर्चा काढू पाहात आहेत त्याचे प्रयोजन तरी काय आहे? साऱ्यांचेच प्रयोजन सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यामागे भविष्यकालीन निवडणुका लक्षात घेऊन केली जाणारी मोर्चेबांधणी आहे.

 

Web Title: Front and Frontline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.