शैक्षणिक सत्राचे भवितव्य अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 12:20 AM2020-04-29T00:20:11+5:302020-04-29T00:20:53+5:30

‘कोरोना’ च्या संकटाने वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम झालेला आहे

The future of the academic session is uncertain! | शैक्षणिक सत्राचे भवितव्य अधांतरी!

शैक्षणिक सत्राचे भवितव्य अधांतरी!

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
‘कोरोना’ च्या संकटाने वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. एप्रिल-मे हे दोन महिने शैक्षणिक दृष्टया परीक्षांचा काळ म्हणून ओळखला जातो. २४ मार्चपासून लॉक डाऊन जाहीर झाल्याने दहावी व बारावी परीक्षांचे काही विषयाचे पेपर झाले नाही. राज्य मंडळाच्या दहावी वर्गाचा भूगोलाचा पेपर राहिला. सी.बी.एस.ई.च्या परीक्षा स्थगित आहेत. इयत्ता १ ते ९ च्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागातील मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. किमान त्यांच्या पुढील शैक्षणिक सत्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरा प्रश्न आहे, तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा. कारण या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अपुरे आहे. काही अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे. तो पूर्ण झाला, तर परीक्षांबाबत निर्णय होईल. त्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने यासंदर्भात चाचपणी सुरु केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक गेल्या आठवड्यात झाली. या बैठकीत आॅनलाईन अभ्यासक्रम व परीक्षा याबाबत चर्चा झाली. कुलगुरुंनी प्राचार्यांशी संवाद साधला. आॅनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात, याकडे काही प्राचार्यांनी लक्ष वेधले.
राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सर्व कुलगुरुंची बैठक घेऊन शैक्षणिक सत्र आणि परीक्षांविषयी चर्चा केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात दोन समिती नेमल्या होत्या. हरियाणाच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आर. सी. कुहाड यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या समितीने परीक्षा आणि शैक्षणिक सत्राविषयी अहवाल सादर केला आहे तर इंदिरा गांधी राष्टÑीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.नागेश्वर राव यांनी ‘आॅनलाऊन शिक्षणा’च्या शक्यतेविषयी अहवाल सादर केला आहे. या अहवालावर आयोगाच्या बैठकीत चर्चा होणार असून याच आठवड्यात विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्याच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करुन त्याची सरासरी करुन यंदाच्या सत्रासाठी गुण द्यावे, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे. या मागणीत तथ्य आहे, त्याचा विचार करायला हवा.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी परीक्षा होणारच अशी निसंदिग्ध ग्वाही दिली आहे. परीक्षा न देताच उत्तीर्ण करा, ही मागणी त्यांनी धुडकावून लावली आहे. जेइइ व नीट या परीक्षांची तयारी विद्यार्थी करीत आहेत. व्हॉटस् अ‍ॅप, व्हीडिओ लेक्चर या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. या काळात दोन हजार लेक्चर तर सहा हजार व्हीडिओ उपलब्ध आहेत. दूरदर्शन वाहिनीवर अभ्यासक्रम शिकविला जात आहे. एनसीईआरटीने ई पाठशाला नावाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोठी संधी उपलब्ध करुन दिल्याचे पोखरीयाल यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळातही शिक्षण बंद नाही, शाळा बंद असल्या तरी डिजिटल माध्यमातून शिक्षण सुरु आहे. याचा अर्थ शासन परीक्षांबाबत आग्रही आहे, असे दिसते.
केंद्र सरकार, राज्य सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक सत्राविषयी निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा. ४० दिवसांचे लॉकडाऊन आहे. जिथे जिवाची भीती आहे, सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे, त्याठिकाणी मुले मन लावून अभ्यास करीत असतील, ही अपेक्षा तरी कशी ठेवावी. काही मुले अजूनही शहरात, भाड्याच्या खोल्यांमध्ये, नातेवाईकांकडे अडकून पडलेली आहेत, त्यांच्या जिवाची घालमेल समजून घ्यायला हवी. रावेर तालुक्यातील विद्यार्थ्याने घरी जाता येत नाही, म्हणून नाशिकला वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. परीक्षा घेऊ नका, सरसकट गुण देऊन टाका असे कुणीही म्हणणार नाही, परंतु परिस्थिती पाहून मार्ग काढायला हवा, हे मात्र निश्चित.


 

Web Title: The future of the academic session is uncertain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.