जी सॅट - ११ च्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून भारताची अवकाशझेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:50 AM2018-12-07T04:50:16+5:302018-12-07T04:50:47+5:30
जी सॅट - ११ च्या प्रक्षेपणामुळे येत्या काही वर्षांत ग्रामीण भारताचे चित्र नक्कीच बदलणार आहे.
जी सॅट - ११ च्या प्रक्षेपणामुळे येत्या काही वर्षांत ग्रामीण भारताचे चित्र नक्कीच बदलणार आहे. अगदी आदिवासी पाड्यांतही इंटरनेट सेवेची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचे, डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट साध्य होईल, यात शंकाच नाही.
भारताने अवकाश जगतात स्वत:चा जो दरारा निर्माण केला आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अवकाश पादाक्रांत करण्याचा इस्रोेने अक्षरश: विडा उचलला आहे. एकापेक्षा एक विक्रम आता इस्रोच्या नावावर नोंदले जात आहेत. इस्रोच्या नवनव्या पराक्रमांमुळे येत्या २०-२५ वर्षांत देशाचे सारे चित्र पालटून जाणार यात शंका राहिलेली नाही. गेल्या वर्षी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटा येथून एकाच वेळी १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जगाला चकित करून सोडले होते. याआधी २०१४ मध्ये रशियाने ३७ उपग्रह सोडून विश्वविक्रम नोंदविला होता, भारतीय संस्थेने तब्बल तिप्पट उपग्रह सोडून हा विक्रम मोडून काढला. ज्या वेगाने भारतीय शास्त्रज्ञ मेहनत घेत आहेत त्यामुळे जगभरातील अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थाही अचंबित झाल्या आहेत. एकीकडे अवकाश संशोधनात गरुडझेप घेत असताना दुसरीकडे आपल्या देशात मूलभूत प्रश्नांची तड लागताना दिसत नाही. आजही गरिबी, कुपोषण, मूलभूत शिक्षण, पुरेसे आरोग्य अशा अनेक प्रश्नांची वारंवार चर्चा होताना आढळते. अर्थात याचा थेट अर्थाअर्थी संबंध नसला तरी तंत्रज्ञान विकासाचा थेट जीवनावर किंवा विकासावर परिणाम होणार नसेल तर ते तंत्रज्ञान काय कामाचे, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश संशोधनाची विकासाशी सांगड घातली नाही, तर ते कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करावयाचे असेल, तर अशा मूलभूत विचारांशी नाळ जुळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता मानवी मूलभूत गरजांच्या व्याख्याही बदलल्या आहेत. आजच्या टेक्नोसॅव्ही काळात नवीन मूलभूत गरजांची व्याख्या अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट अशी होईल. शहरी भागात मानवाची नवीन मूलभूत गरज काही प्रमाणात पूर्ण होताना दिसत आहे. इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार इंडियामध्ये बºयापैकी झालेला दिसतो. मात्र, भारतात अर्थात ग्रामीण भागात अजूनही इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. जोपर्यंत संपूर्ण भारत इंटरनेटच्या कक्षेत येत नाही, तोपर्यंत आपले डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होणार नाही. भारताला खºया अर्थाने तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारतातील जवळपास अडीच लाख ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेटने जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘भारतनेट’ सुरू केला आहे. मात्र, त्यासाठी ग्रामीण भारतात हायस्पीड इंटरनेट देण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, नुकतेच देशातील सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट-११ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ५,८५४ किलो वजनाच्या या उपग्रहाचे युरोपियन अवकाश केंद्र गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट-११ चा कार्यकाळ हा १५ वर्षांचा असेल. दूरसंचारमध्ये क्रांती घडवून आणणाºया या उपग्रहामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे. एका मोठ्या खोलीच्या आकाराचा हा उपग्रह आहे. जीसॅट-११ या उपग्रहामुळे संपूर्ण भारताचे भौगोलिक क्षेत्र आवाक्यात येऊ शकणार आहे, त्यामुळे ग्रामीण भारतातसुद्धा १६ जीबीपीएस एवढा प्रचंड इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्यानंतर खºया अर्थाने डिजिटल इंडियाचे स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात होणार आहे. इंडिया आणि भारतातील ही टेक्निकल दरी कमी होऊन ग्रामीण भारतातसुद्धा तंत्रज्ञानाचे फायदे मिळून शिक्षण, आरोग्य तसेच गतिमान प्रशासन असे अनेक फायदे या जीसॅट-११ उपग्रहामुळे होणार आहेत. देशातील सर्व अडीच लाख ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेटने जोडल्या जाणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन गतिमान होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एका क्लिकवर ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहे. जीसॅट-११ चा खरा फायदा ग्रामीण भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी होणार असून, डिजिटल शाळा गावोगावी दिसायला लागतील. या साºयाचा विचार करता जीसॅट-११ मुळे भारताच्या सर्वांगीण विकासाला प्रचंड पाठबळ मिळणार आहे. जीसॅट-११ ची सर्व उद्दिष्टे यथासांग पार पडली तर येत्या १५ वर्षांत ‘डिजिटल इंडिया’ हे स्वप्न नक्की साकार होणार यात शंका नाही.