‘जी २०’ अध्यक्षपद : ५५ भारतीय शहरांत २०० बैठका होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:32 AM2022-11-30T09:32:24+5:302022-11-30T09:33:47+5:30
‘जी २० शेरपा’ची नवी जबाबदारी घेतलेले अमिताभ कांत यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद
अभिजीत कांत ( विशेष मुलाखत)
मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग
भारत पुढच्या वर्षी ‘जी 20’ चे अध्यक्षपद भूषवत आहे, याचे महत्त्व काय?
‘जी २०’ या संघटनेच्या माध्यमातून भारत सामूहिक कृतीला चालना देऊ इच्छितो. डिजिटल क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचे धडे, टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर आणि क्षमता उभारणीच्या संदर्भातल्या चांगल्या प्रथा सदस्य राष्ट्रांसमोर ठेवू इच्छितो. विकास कार्यक्रमांची गाडी रुळावर आणण्यासाठी भारताला ही उत्तम संधी आहे. त्यात पर्यावरण आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकास यावर भर असेल.
आर्थिक आणि राजकीय आघाड्यांवर या संधीतून काय साध्य होऊ शकेल?
सर्वसमावेशक विकास, सशक्त जागतिक पुरवठा साखळ्यांची उभारणी, लघुउद्योगांचे सशक्तीकरण या मुद्द्यांवर एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारताचा भर असेल. जागतिक स्तरावरील महत्त्वाची व्यासपीठे आणि चर्चांचा नवा प्राधान्यक्रम हा विकसनशील देशांच्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा ध्यानी घेऊन ठरवण्याची संधी यानिमित्ताने भारताला मिळाली आहे.
‘जी २०’ देशांपुढे पुढच्या वर्षात कोणती आव्हाने येऊ शकतात?
सध्याचे राजकीय संघर्ष सोडविण्याच्या दृष्टीने संवाद आणि राजनीतीचा मार्ग सामूहिकरीत्या अनुसरणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम साधण्याची मोठी क्षमता ‘जी २०’ च्या सदस्य राष्ट्रांमध्ये आहे. अन्न आणि ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या पेचप्रसंगामुळे अनेक देशात चलनवाढ झाली आहे. ‘जी २०’ च्या १९ पैकी तीन देशात चलनवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सात सदस्य देशांत हा दर ७.५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे. जास्तीचा वापर, वाढते व्याजदर तसेच पुरवठा साखळीतील अडचणींमुळे हा पेच आणखी चिघळला आहे. समताधिष्ठित वाढीच्या प्रारूपावर सदस्य राष्ट्रांनी मतैक्य दाखवावे, यासाठी ‘जी २०’ गटाने राजकीय नेतृत्व प्रयत्न करण्याची गरज आहे. या जागतिक आव्हानांचे रूपांतर संधीत करण्याची भारताची इच्छा आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही आपली घोषणा या बांधिलकीचेच प्रतीक आहे.
‘जी २०’ देशांच्या शिखर बैठकीसाठी भारतात काय तयारी सुरू आहे?
या आयोजनात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवून एक संस्मरणीय शिखर बैठक आयोजित करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रवासी भारतीय दिवस, टाटा मुंबई मॅरेथॉन, विद्यापीठीय पातळीवर पंचाहत्तर विद्यापीठांचा सहभाग असलेला युवकांसाठीचा कार्यक्रम अशा काही उपक्रमांतून जनभागीदारीमधून विविध कार्यक्रमांची आखणी आम्ही करतो आहोत. ‘जी २०’ च्या सदस्य राष्ट्रातील प्रतिनिधींसाठी देशभरातल्या विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. अनन्यसाधारण असा ‘भारतीय अनुभव’ त्यांना त्यातून मिळेल. देशाच्या संपन्न वस्त्र संस्कृतीचे प्रतीक असलेली हातमागाची वस्त्रे पाहुण्यांना भेट दिली जातील.
कोणत्या शहरात किती बैठकांचे आयोजन असेल? ठरावीक शहरे निवडण्यामागे काही विशिष्ट कारण?
अध्यक्षपदाच्या काळात भारत ३२ विविध क्षेत्रांमधल्या ५५ शहरात मिळून एकूण २०० बैठका आयोजित करण्यात करणार आहेत. यातून बैठकीला येणाऱ्या प्रतिनिधींना भारतीय अनुभव दिला जाईल. देशाची संघटित शक्ती त्यातून दिसेल.
आंतरराष्ट्रीय संघर्षात - विशेषत: सदस्य राष्ट्रात- भारत स्वतःहून अधिक परिणामकारक भूमिका बजावू शकतो का?
जागतिक आव्हानांच्या बाबतीत ‘जी २०’ च्या सदस्य राष्ट्रांनी सामूहिक इच्छा, प्रतिसाद दाखवावा, यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. अध्यक्षपदासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आपले सूत्र वाक्य असेल आणि त्या तत्त्वज्ञानानुसार विकसनशील देशांचा दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आम्ही मांडू. कोणताही पूर्वग्रह न ठेवणारा संघटक आणि शांतीकर्ता म्हणूनच भारताच्या नेतृत्वपदाची वाटचाल होईल.
‘जी २०’ देशांसमोर अभिमानाने ठेवता येतील, अशा आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी कोणत्या?
डिजिटल सबलीकरण आणि आर्थिक समावेशकता यासंदर्भात भारत जगाला पुष्कळच काही देऊ शकतो.
‘आधार’ ही जगातली सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली आहे. कोविनच्या माध्यमातून आपण कोट्यवधी लोकांचे लसीकरण केले. पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून लक्षावधी बँक खाती उघडली गेली. जीएसटी ही संपूर्णपणे कागदविरहित करप्रणाली आहे. याशिवाय जीईएम, डीबीटी, डीजी लॉकर, ई संजीवनी अशाही काही योजना सांगता येतील. भारतीय नागरिकांच्या आयुष्यात डिजिटायझेशनने कायापालट कसा घडवला हे आपण अभिमानाने जगाला दाखवू शकतो!