गाडगेबाबांचे कीर्तन

By Admin | Published: April 13, 2017 02:29 AM2017-04-13T02:29:58+5:302017-04-13T02:29:58+5:30

गाडगेबाबांचे कीर्तन हा कीर्तन परंपरेचा एक नवा आविष्कार होता आणि कीर्तन प्रबोधनाचा एक नवा अवतार होता. भगवंताचे निरूपण करीत या कीर्तनाने प्रत्येकाच्या अंत:करणातील

Gadgebaba keertan | गाडगेबाबांचे कीर्तन

गाडगेबाबांचे कीर्तन

googlenewsNext

- डॉ. रामचंद्र देखणे

गाडगेबाबांचे कीर्तन हा कीर्तन परंपरेचा एक नवा आविष्कार होता आणि कीर्तन प्रबोधनाचा एक नवा अवतार होता. भगवंताचे निरूपण करीत या कीर्तनाने प्रत्येकाच्या अंत:करणातील भगवद्भाव जागा केला आहे. कीर्तन हे एकीकडे विश्वातील देव पहायला शिकवते तर दुसरीकडे माणसातील देवपण. वऱ्हाडालाही कीर्तन निरूपण नवीन नव्हते. अनेक कीर्तनकार, कथेकरी, हरिदासी यांची कीर्तने वऱ्हाडाने ऐकली होती. पण ऋणमोचनांतल्या गाडगेबाबांच्या कीर्तनाची वार्ता वऱ्हाडात गावोगावी जाऊन पोचली आणि वऱ्हाडकरांनी एक अलौकिक कीर्तन ऐकले. वऱ्हाडी बोलीभाषेत लोकांशी संवाद साधीत साधीत ते लोकांच्या अंतरंगापर्यंत पोचत होते. दिवसभर भ्रमंती करावी. एखाद्या गावी जावे. प्रथम हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करावा. कुणी विचारायचे हा माणूस का गाव झाडतोय? ‘रात्री कुणा बुवांचे इथे कीर्तन होणार हाये...’ भजनकरी, टाळकरी, श्रोते कीर्तनाला जमायचे आणि एक विलक्षण व्यक्तित्व दोन हात वर करून ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला...’ असे भजन म्हणत कीर्तनात उभे राही. एका हातात गाडगे, एका हातात काठी, अंगावर चिंध्या लावलेला सदरा, पट्ट्यापट्ट्यांची विजार आणि त्यावर भगवी लुंगी बांधलेली, अर्धवट दाढी वाढलेली अशा वेशात हा कीर्तनकार पुढे उभा राहिला की मघाशी गाव झाडणारा हा वेडा माणूस, काय कीर्तन सांगणार म्हणून लोक टिंगलटवाळी करायचे आणि गोपाला गोपाला भजन म्हणत बाबा श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद करू लागत. ‘‘बापहो गावात देव किती? लोक म्हणायचे एक ... ‘पाह्यना बरं... नाही तर मंग भुलाल... देऊळ खंडोबाचं आहे का नाही. आता देव किती झाले... ‘दोन’ असे करत करत देवांची संख्या वाढत जायची. ‘मंग मारको, म्हेसको, जागाई, जोरवाई, क्षेत्रपाल, तरीमाय, माता माय... एवढ्या देवांचे करायचे काय? असा कसा हा तुमचा देव - घेतो बकऱ्याचा जीव.., गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला...’’ बाबा श्रोत्यांनाच प्रश्न विचारायचे. श्रोत्यांकडून उत्तरे काढून घ्यायचे. त्यांनाच भजन म्हणायला लावायचे. मग श्रोत्यांच्या जीवनातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, विषमता, सावकारी पाश, पशुहत्त्या यावर प्रहार करीत कीर्तनातूनच प्रबोधनाचे प्रभावी संवादपीठ उभे राहायचे. सम्राट आचार्य अत्रे म्हणतात, बाबांचे कीर्तन श्रवण हा एक महान अनुभव आहे. बाबांचे कीर्तन गरिबांसाठी, दलितांसाठी, दु:खितांसाठी आहे. त्यात योग नाही, अध्यात्म नाही, पोथी नाही, पुराण नाही. देवांची वर्णने नाहीत. धार्मिक रूढीखाली आणि आर्थिक सत्तेखाली भरडून निघालेल्या समाजाच्या उद्धाराचा झगझगीत प्रकाशझोत म्हणजे हे कीर्तन. प्रेमाधिष्ठित समता प्रस्थापित व्हावी असे ज्यांना वाटते त्यांनी आपले विचारांचे घट गाडगेबाबांच्या कीर्तनातून भरून घ्यावे लागतील. सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात तसे, गाडगेबाबांना पहावे कीर्तनात... हेच खरे.

Web Title: Gadgebaba keertan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.