गडकरीजी, बोडक्या रस्त्यांवरून गायब झाडांचा आक्रोश ऐका..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:15 AM2023-03-02T08:15:07+5:302023-03-02T08:15:32+5:30

महामार्गाचा विस्तार करायचा म्हणजे आधी कडेची सगळी जुनी झाडे तोडायची, हा प्रकार थांबला तर रस्ताही होईल आणि झाडेही वाचतील !

Gadkariji, listen to the wailing of the trees disappearing from the roads.. | गडकरीजी, बोडक्या रस्त्यांवरून गायब झाडांचा आक्रोश ऐका..

गडकरीजी, बोडक्या रस्त्यांवरून गायब झाडांचा आक्रोश ऐका..

googlenewsNext

-शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, 
आपलं पर्यावरण, नाशिक

देशातील महामार्गाचा विस्तार करताना आपण काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्यास विसरलो :  वृक्षांविषयी दूरदृष्टीचा अभाव ही त्यातली सर्वात मोठी चूक ! 
पूर्वी महामार्ग तयार करताना कडेच्या वृक्षांना तेवढेच महत्त्व दिले गेले. ती तोडली गेली नाहीत. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत असला, तरी तो आल्हाददायी होता. आजच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महामार्गाच्या विस्तारामुळे त्या त्या भागातील स्थानिक लोकजीवनावर आपण खूप मोठ्या प्रमाणावर संकटे लादली आहेत. काही महामार्गांमुळे त्या त्या गावाची ओळख पूर्णतः संपलेली आहे. रस्त्यांच्या कडेने उभ्या राहिलेल्या छोट्या मोठ्या रोजगारांचे (चहा टपरी, रसवंती, छोटे मोठे गॅरेज, इत्यादी) गणित विस्कटले आहे. 

महामार्ग उभारणीसाठी  निसर्गाच्या संपत्तीची दैना तर हताश करणारी आहे.  डोंगर प्रचंड प्रमाणामध्ये पोखरले जात आहेत. दगड मातीसाठी मोठा उपसा केल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.  नैसर्गिक नाले कोंडले गेले आहेत. डोंगर कापल्यामुळे त्या ठिकाणच्या पर्जन्यमानावर परिणाम येत्या काळात जाणवेलच. डोंगर उताराची झाडे झुडपे कापली गेल्याने मातीचा आधार संपला आहे. उरलेले डोंगर कापणीच्या वेळी, ब्रेकरच्या हादऱ्यामुळे खिळखिळे झाले आहेत, ते कधी ढासळतील यांचा नेम नाही. बऱ्याच ठिकाणी चांगल्या विस्तारलेल्या वन जमिनीमधून महामार्ग गेले आहेत. अशा ठिकाणच्या प्रदेशनिष्ठ वृक्षांच्या तोडीमुळे तेथील जैवविविधता पूर्णतः संपलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या शेतीवर दुष्परिणाम दिसून येतील.
जुन्या महामार्गाचा विस्तार  चार आळी (फोर लेन) ते आठ आळी (एट लेन) पर्यंत वाढवण्यात येतो आहे.  जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे, शेकडो वर्ष जुने वृक्ष सर्रास कुठलाही दूरदृष्टिकोन न ठेवता तोडले गेले आहेत व तोडले जात आहेत. हे वृक्ष तसेच 
ठेवून  रस्ता रुंदीकरण होऊ शकले असते. वृक्ष न तोडता, त्यांच्या दोन्ही बाजूने जमीन संपादन करणे शक्य होते व शक्य आहे.

आज  फुटपट्टीच्या रेषेत बांधण्यात येणारे समृद्धी महामार्ग असो, सुरत ते चेन्नई महामार्ग असो किंवा अहमदाबाद ते हैदराबाद; या महामार्गांसाठी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे.  त्याच पद्धतीने जुन्या महामार्गांच्या बाबतीत कडेच्या वृक्षांच्या बाजूने जमीन संपादन करून मधला जुना मार्ग हा दुचाकी किंवा तीन चाकी वाहनांसाठी, वृक्षांच्या बाजूचे मार्ग हे चार चाकी आणि अवजड वाहनांसाठी ठेवता आले असते. जुन्या आणि परिपूर्ण वाढलेल्या वृक्षांच्या सावलीमुळे छोट्या वाहनाने प्रवास करताना आरामदायी झाले असते. मात्र महामार्ग तयार करताना बऱ्याचदा हा विचारच केला जात नाही. हा प्रयोग एखाद्या तरी महामार्गाचा विस्तार करताना होणे गरजेचे आहे.
महामार्गाचा विस्तार करायचा म्हणजे आधी कुठलीही दूरदृष्टी न ठेवता झाडे कापायची हा हा प्रकार आपण त्वरित थांबवला पाहिजे.  वृक्ष म्हणजे अडथळा, वृक्ष म्हणजे उपद्रवी घटक, वृक्ष म्हणजे विकासाला बाधा... हे काय आहे?

अहो, तुम्ही साधारण आठशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, आधुनिक साधनसामग्री असल्याकारणाने चार वर्षात बांधू शकता, पण चार वर्षात एखादे वडाचे, पिंपळाचे, चिंचेचे झाड किती उंच वाढवू शकता, याचा थोडासा जरी विचार केला, तरी नक्कीच  लक्षात येईल की आपण आयता मिळालेला हा निसर्गाचा ठेवा सहज नष्ट करून महाभयंकर परिस्थिती ओढवून घेत आहोत. 

एकीकडे  महाकाय  वृक्षांची तोड करायची आणि दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून हरित रस्ते तयार करण्याच्या गोष्टी करायच्या, हे काय आहे?  ज्या तातडीने रस्ता बांधणीचे काम सुरू होते त्याच आत्मीयतेने रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड व  संवर्धन होणे गरजेचे आहे. खरे तर अशा ठिकाणी झाडांची वाढ झाल्यानंतरच टोल वसुली झाली पाहिजे !
गडकरी साहेब, या बोडक्या रस्त्यांवरून गायब झालेल्या हजारो, लाखो झाडांचा आक्रोश तुम्ही कधीतरी ऐकाल काय?

Web Title: Gadkariji, listen to the wailing of the trees disappearing from the roads..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.