अंगाशी येणारा खेळ
By admin | Published: July 29, 2016 03:28 AM2016-07-29T03:28:02+5:302016-07-29T03:28:02+5:30
मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत.
मुंबई शहरात म्हणे रिक्षा चालक संघटनेचे सुमारे एक लाख आणि टॅक्सी चालक संघटनेचे तीस हजार सभासद आहेत. या दोन्ही घटकांमध्ये मिळून म्हणे अंदाजे पाच लाख मतदार आहेत. हे मतदार मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान करणार आहेत असे गृहीत धरुन त्यांची मते युती झाली तर युतीला आणि न झाली तर भाजपाला मिळावीत या एकमात्र उद्देशाने राज्य सरकारने त्यांच्यापुढे मान तुकवून इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी सेवेचा गळा घोटण्याचा वा आवळण्याचा विचार म्हणे सुरु केला आहे. राजकारणातही अनेकदा कसा आंधळेपणाने विचार केला जातो याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या पाच लाख मतांच्या आशेपोटी त्याहून कितीतरी पटींनी अधिक संख्येत असलेल्या मतांवर मग सरकारी पक्षाला पाणी सोडावे लागणार आहे याची कल्पना त्यास नसावी असे दिसते. इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झालेली रिक्षा-टॅक्सी सेवा केवळ मुंबई शहरातच लोकानी स्वीकारली असे नाही. तर अन्य अनेक शहरांनीही या सेवेला आपलेसे केले आहे. त्यामुळेच परंपरागतरीत्या या व्यवसायात असलेल्या आणि संघटना करुन बसलेल्या लोकांच्या पोटावर पाय (?) येत असल्याचा त्यांचा कांगावा आहे आणि म्हणूनच सरकार त्यांच्यासमोर वाकायला सिद्ध झाले आहे. मुळात इंटरनेटद्वारे अशी प्रवासी सेवा उपलब्ध करुन देणारे म्हणजे रस्त्यावर वाहतूक करणारे लोक कोणी परग्रहावरुन आलेले नाहीत. जे अगोदरपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात होते त्यांनाच हाताशी धरुन या सेवा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वीतेचे सर्वात मोठे गमक म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता. मीटरप्रमाणे जे भाडे होईल ते भरले जाते म्हणजे त्यात वादावादीचा वा भांडणाचा प्रश्न येत नाही. परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे प्रवास संपल्यावर संबंधित प्रवाशाला आलेल्या अनुभवाची विचारणा केली जाते. त्याला काही विपरीत अनुभव आला तर संबंधित चालकाच्या विरोधात कारवाईदेखील केली जाते. महत्वाचे म्हणजे जेथून मागेल तेथे सेवा उपलब्ध केली जाते आणि जिथे कुठे जायचे असेल तिथपर्यंत ती पुरविली जाते. हा सारा अनुभव वेगळा आणि प्रवाशांच्या दृष्टीने सुखकर आहे. एरवी संघटित रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांची मग्रुरी, उद्दामपणा, मवालेगिरी आणि हुज्जत घालण्याची वृत्ती यांचा अनुभव न घेतलेला प्रवासी शोधूनही सापडणार नाही. रिक्षा-टॅक्सी संघटनांकडे तक्रार केली तर संघटनेतही त्यांचेच भाऊबंद असतात. अधूनमधून राज्याच्या परिवहन विभागालाही एक झटका येत असतो. हा विभागही लोकाना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंबंधी तक्रारी करायचे आवाहन करीत असतो पण अत्यंत अचूक तपशीलाह केलेल्या तक्रारींचीदेखील दखल घेतली जात नाही. घेणारही कशी? मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक अंगावर वर्दी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसालाच भर चौकात फोडून काढतात पण कोणीच काही करु शकत नाही. विशेष म्हणजे मुक्ततेच्या धोरणाची पंचविशी साजरी करताना मुक्ततेच्या व्यवहाराचा गळा घोटणे हा निश्चितच अंगाशी येणारा खेळ ठरु शकतो.