अहंगंडाचा खेळ ! सामूहिक प्रगती रोखणारा हा ‘अ‍ॅटिट्यूड’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 03:54 AM2019-12-28T03:54:35+5:302019-12-28T03:57:12+5:30

इंडोनेशियाचे फ्लँडी लिंपेले हे ‘डबल्स’मधले आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त प्रशिक्षक

The game of ego! The 'Attitude', which stops collective progress. | अहंगंडाचा खेळ ! सामूहिक प्रगती रोखणारा हा ‘अ‍ॅटिट्यूड’

अहंगंडाचा खेळ ! सामूहिक प्रगती रोखणारा हा ‘अ‍ॅटिट्यूड’

googlenewsNext

‘गाव करील ते राव काय करील’ अशी म्हण आहे. सामूहिक किंवा सांघिक ताकदीपुढे व्यक्तिगत थोरवी फिकी असते असा त्याचा आशय. एकाच उद्देशाने प्रेरित झालेली अनेक मने आणि अनेक मनगटे अशक्य ते शक्य करून दाखवत असल्याच्या अनेक घटना सांगता येतात. विशेषत: सांघिक क्रीडा प्रकारात तर संघभावना हीच सर्वात महत्त्वाची असते. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट यासारख्या अनेक खेळांमध्ये कोणा एखादा महानातला महान खेळाडू संघाची कामगिरी उंचावू शकतो. व्यक्तिगत कामगिरीच्या भोवती संघाच्या विजयाची मजबूत इमारत उभी करू शकतो. परंतु, विजयाचे अंतिम सोपान गाठण्यासाठी त्या एका महान खेळाडूला संघातल्या प्रत्येक खेळाडूची समर्थ जोड मिळावी लागते. अन्यथा पराभव निश्चित असतो. ‘टीम वर्क’ म्हणतात ते हेच. सांघिक खेळात अत्यावश्यक असलेल्या नेमक्या याच गुणाचा प्रचंड अभाव भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये असल्याचा आरोप नुकताच बॅडमिंटन ‘डबल्स’च्या परदेशी प्रशिक्षकांनी केला.

इंडोनेशियाचे फ्लँडी लिंपेले हे ‘डबल्स’मधले आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त प्रशिक्षक. लिंपेले यांनी बॅडमिंटन डबल्सच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळण्याआधी पूर्वीचे दोन्ही प्रशिक्षकदेखील परदेशीच होते. मात्र संघभावनेचा अभाव, अहंकार आणि केवळ व्यक्तिगत कामगिरी उंचावण्याची ईर्षा या दुर्गुणांनी भारतीय खेळाडूंना पछाडलेले आहे. त्यामुळे एकेरी स्पर्धा गाजवणारे हेच खेळाडू सांघिक स्पर्धांमध्ये देशाला शिखरावर घेऊन जाण्यात यशस्वी ठरत नाहीत, असा लिंपेलेंचा आरोप आहे. हा आरोप अगदीच निराधार नाही. त्याचे दाखले क्रीडा क्षेत्रात वारंवार दिसतात. लिएंडर पेससारख्या टेनिसपटूचा एखादाच अपवाद. पेसने त्याच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक खेळाडूंसोबत विजयाचा यशस्वी पाठलाग केला. ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही जेव्हा क्रिकेटच्या मैदानात तळपत होते, तेव्हा तळाच्या फलंदाजांना जोडीला घेऊन अशक्य विजय संघाला मिळवून देणारा लाराच क्रिकेटतज्ज्ञांना मोठा वाटायचा. बॅडमिंटन एकेरीमध्ये प्रकाश पदुकोण, पी. गोपीचंद ते आताच्या सायना नेहवाल, पी. सिंधू अशा दमदार खेळाडूंची भारताला परंपरा आहे. खरे तर बॅडमिंटन हा खेळच मूळचा भारतीय, त्यातही नेमकेपणाने सांगायचे तर अगदी मराठमोळा म्हणजे पुण्याजवळच्या खडकीत बॅडमिंटनचा शोध लागलेला. पण या खेळावर आता इंडोनेशिया, कोरिया, चीन, थायलंड, स्पेन या देशांचे खेळाडू मक्तेदारी गाजवू लागले आहेत. कबड्डी, हॉकी या कधीकाळी भारताचे वर्चस्व असणाऱ्या खेळातसुद्धा आता परदेशी संघ सहज बाजी मारू लागले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटूंवर ज्या दुर्गुणांचा आरोप झाला आहे, तो केवळ खेळाडूंपुरताच मर्यादित आहे की हा ‘अ‍ॅटिट्यूड’ सार्वत्रिक आहे, याचीच खरी तर चर्चा यानिमित्ताने व्हावी. पानिपतच्या युद्धापूर्वी अब्दाली आणि मराठ्यांच्या फौजा एकमेकांना भिडण्याच्या आदल्या रात्री म्हणे अब्दालीने मराठ्यांच्या बाजूला वेगवेगळ्या पेटलेल्या चुली पाहिल्या आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. विरोधकांमधील दुही ही जेत्यासाठी अनुकूल बाब ठरते.

संघभावनेला तडा गेला की पराभव निश्चित. इतिहास काय आणि वर्तमान काय? देशाच्या आताच्या नेतृत्वावर एकाधिकारशाहीचा आरोप नेहमी होतो. नोटाबंदीपासून ते आताच्या नागरिकत्व सुधार कायद्यापर्यंतचे बहुतेक निर्णय एकट्याने घेतले म्हणे. ‘कलेक्टिव्ह विजडम’च्या अभावामुळे देशापुढील संकटांमध्ये वाढ झाली. अहंगंड हा केवळ व्यक्तिनाशालाच नव्हे तर सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. व्यक्तिकेंद्रित व्यवस्था पत्त्याप्रमाणे कोलमडते. अनेक उद्योजक घराणी संस्थापक निवर्तल्यानंतर एक-दोन पिढ्यांतच संपली. त्याचे नेमके कारण समजून घेतले पाहिजे. बास्केटबॉलमधला सार्वकालिक महान खेळाडू मायकेल जॉर्डन म्हणाला होता, व्यक्तिगत ’टॅलेंट’च्या बळावर एखादा सामना जिंकता येतो, पण ‘चॅम्पियनशिप’ जिंकायची तर संघभावनाच हवी. सार्वजनिक जीवनातल्या प्रत्येकाने हा धडा घेतलेला बरा नव्हे काय?

भारतीय बॅडमिंटनपटूंच्या ‘बॅड अ‍ॅटिट्यूड’मुळे ‘डबल्स’चे यापूर्वीचे दोन परदेशी प्रशिक्षक त्यांचा करार अर्धवट सोडून परतले. त्यानंतरचे तिसरे प्रशिक्षकदेखील त्याच कारणामुळे त्याच मार्गावर आहेत. सामूहिक प्रगती रोखणारा हा ‘अ‍ॅटिट्यूड’ सार्वत्रिक आहे का?

Web Title: The game of ego! The 'Attitude', which stops collective progress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.