राजकारणातील खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 04:14 PM2019-02-14T16:14:31+5:302019-02-14T16:16:04+5:30
कुस्ती या क्रीडा प्रकाराविषयी सध्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना, भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
मिलिंद कुलकर्णी
एखाद्या खेळात, उपक्रमात विघ्न आले की, आपण खेळखंडोबा झाला असे म्हणतो. क्रीडा क्षेत्राला राजकारणाची लागण होऊन अनेक वर्षे लोटली. त्याची अनुभूती आपण वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांवरुन घेत असतोच. एखाद्या खेळाडूच्या चरित्र, आत्मचरित्रातून किंवा त्याच्यावरील चरित्रपटातून खेळातील राजकारण आपल्यासमोर ठळकपणे येते. चांगल्या खेळाडूवर होणाऱ्या अन्यायाने आपण व्यथित होतो, क्रीडा क्षेत्रात असे होऊ नये, असेही आपल्याला प्रामाणिकपणे वाटते.
राजकारणात खेळाडू आणि खेळांचा शिरकाव होऊनही अनेक वर्षे लोटली.अलिकडे राज्यवर्धन सिंग राठोड हे तर केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. चेतन चौहान, कीर्ती आझाद, मोहमंद अझरुद्दीन यांची राजकारणातील ‘इनिंग’ सफल ठरली आहे. सचिन तेंडुलकर राज्यसभेत पोहोचले. अर्थात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी हे क्रीडा प्रकाराच्या संघटनांचे अध्यक्ष वा पदाधिकारी आहेत. याचा अर्थ ते खेळाडू आहेत किंवा होते, असे नसतो. राजकारणातील त्यांचे वजन आणि स्थान लक्षात घेऊन त्यांना अशा संस्थांचे पदाधिकारीपद दिले जाते. हे अखिल भारतीय पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत चित्र सारखे आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे खेळाडू होते, त्यामुळे क्रीडा महासंघाचे अध्यक्षपद त्यांना शोभून दिसते. असे मूळ खेळाडू असलेले लोकप्रतिनिधी मोजके आहेत. उर्वरित लोकप्रतिनिधी मात्र एक पद, स्पर्धांमधील उपस्थितीने होणारा जनसंपर्क आणि प्रसिध्दी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही पदे स्विकारतात. लोकप्रतिनिधीने पद स्विकारल्यास उद्योगपती-व्यावसायिकांकडून स्पर्धा आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि प्रशासकीय पातळीवरील अडचणी अशा दोन बाबी सहाय्यभूत ठरत असल्याने क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा हा फंडा झालेला आहे.
आता लोकसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वत्र राजकीय चर्चा वेगात सुरु आहेत. चित्रपट कलावंतांचे राजकीय प्रवेश सुरु झाले आहेत. ‘अंगुरी भाभी’ शिल्पा शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी जंतरमंतरवर भाजपा आणि मोदींवर तोफ डागून पक्षाकडे तिकीट मागतो कोण असा टोला लगावला आहे. आता खेळाडूंपैकी कोण राजकारणात येतो, याची उत्सुकता आहे.
राजकारणी मंडळी मात्र खेळाचा पुरेपूर प्रत्यय आणून देत आहेत. कुस्ती या क्रीडा प्रकाराविषयी सध्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना, भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला हाणताना, गुलाबराव नेहमी लंगोट लावून कुस्तीसाठी सज्ज असतात असे म्हटले. गुलाबराव कट्टर शिवसैनिक आहेत. ‘अरे’ला ‘कारे’ करणे ही त्यांची संस्कृती आहे. त्यांनी लगेच प्रतिटोला हाणला. गिरीश महाजन हे गादी ( म्हणजे मॅट) वरील कुस्तीपटू आहेत आणि आम्ही मातीतील कुस्तीपटू आहोत. मॅटचा मराठी अनुवाद गादी असा केल्याने अर्थाचा अनर्थ होणे स्वाभाविक आहे. पण गुलाबरावांनी तो मॅट या अथाने तो वापरला, असे आपण समजूया. त्यापुढे जाऊन राष्टÑवादीचे आमदार व माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी गादी, मातीपेक्षा आम्ही रस्त्यावरील कुस्तीपटू असल्याचे म्हटले. एरवी कुस्तीपटू, आखाडे आणि कुस्त्यांच्या दंगलीला उतरती कळा लागली राजकारणाच्यानिमित्ताने का होईना कुस्ती आणि कुस्तीपटू ऐरणीवर आले आहेत, हेही काही कमी नाही.
राजकीय नेते आणि पत्रकारांच्या भाषण आणि लिखाणातून आता क्रीडा क्षेत्राशी संबंधित शब्दांचा अमाप वापर होणार आहे. सामना, झुंज, लढत, खिलाडूवृत्ती, विकेट काढणार, हॅटट्रीक करणार, शतक ठोकणार, अचूक मारा, फिल्डींग असे शब्द आता तीन महिने वाचण्यात आणि ऐकण्यात येतील. क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन आले नसले तरी त्याची चर्चा तरी किमान होईल. याचा लाभ मतदानाची टक्केवारी वाढण्यात किती होतो, हे मतदानानंतरच कळेल. अन्यथा राजकारणाचा खेळखंडोबा ठरलेला म्हणायचा.