सत्याचा खेळ

By admin | Published: November 18, 2016 12:42 AM2016-11-18T00:42:01+5:302016-11-18T00:42:01+5:30

सत्याचा शोध हा माणसाचा एक लाडका विषय. जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी सत्याच्या मागे लागलेला असतो. आपापल्या परीने त्याला भिडण्याचा, त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो.

The game of truth | सत्याचा खेळ

सत्याचा खेळ

Next

सत्याचा शोध हा माणसाचा एक लाडका विषय. जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी सत्याच्या मागे लागलेला असतो. आपापल्या परीने त्याला भिडण्याचा, त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो.
कोणी म्हणते सत्य हे शेवटी प्रकट होते, तर कोणी म्हणते ते एकदम प्रकट न होता अंशाअंशांने प्रकट होते. कोणी म्हणते सत्य हे सापेक्ष असते तर कोणी म्हणते ते निरपेक्ष असते. कोणी म्हणते सत्य नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही तर कोणी म्हणते सत्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही.
ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्यां
हे तर वेदवाक्यच आहे.
कोर्टात सत्याची बूज राखली जाते, असा एक समज आहे. तो खराही असेल पण तेथील न्याय बऱ्याचदा युक्तिवादावर अवलंबूनअसतो. ज्याचा वकील हुशार ती पार्टी जिंकणार असे चित्र तेथे दिसते. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचा खेळ तेथे सुरू असतो. तो खेळ पाहावा लागू नये म्हणून न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे की काय न जाणे!
समोर येणारी किंवा आणली जाणारी माहिती हेच अंतिम सत्य असते का, त्या माहितीवर अवलंबून राहून पुढील निर्णय घ्यावा लागणे ही माणसाची हतबलता म्हणायची का, तसे असेल तर सत्याची संकल्पनाच मोडीत काढायची का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
मीडियामधील सत्य हा तर एक नवीनच मुद्दा! मीडिया सत्यशोधनाचे अवसान आणत अनेक प्रश्न निर्माण करतो आणि ते तसेच सोडून देतो. कुणाला ठोकायचे आणि कुणाला खांद्यावर घ्यायचे हे एकदा ठरले की त्या दिशेने त्याचे काम सुरू होते.
नवा विषय मिळाला की जुन्याचा मागमूसही राहणार नाही अशा तऱ्हेने पाटी पुसून पुन्हा नव्याने तो कामाला लागतो. क्षणभर वीज चमकावी तसा कडकडाट आणि मग पुन्हा अंधार! सोशल मीडियाने तर हा उपक्रम अधिक गतिमान केला आहे. तेथे क्षणोक्षणी सत्याचे रूप बदलताना दिसते. प्रत्येकाला आपापल्या सोयीचे सत्य हवे असते म्हणजे काय, ते सोशल मीडियामुळे लक्षात येते, असो.
सत्याचे अस्तित्व गृहीत धरले तर या सगळ्या धामधुमीत त्याचा गळा घोटला जाणे किंवा त्याचा जीव घाबराघुबरा होणे सहज शक्य आहे. लोकांना शहाणे करण्याचे आपले जीवितकार्य सोडून पळून जाण्याचा विचार देखील त्याच्या मनात येत असावा.
काय सांगावे, कदाचित माणसाची फिरकी घेत स्वत:चा टाईमपास करून घेणे असादेखील त्याचा खेळ असू शकतो.
- प्रल्हाद जाधव

Web Title: The game of truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.