गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:42 AM2017-09-05T00:42:18+5:302017-09-05T00:45:10+5:30
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणपतीच्या विसर्जनाने आज होत आहे. सार्वजनिक रीतीने साज-या होणा-या धार्मिक उत्सवात महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात प्राचीन उत्सव समजला जातो.
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणपतीच्या विसर्जनाने आज होत आहे. सार्वजनिक रीतीने साज-या होणा-या धार्मिक उत्सवात महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात प्राचीन उत्सव समजला जातो. बंगालमध्ये नवरात्रात जो सार्वजनिक दुर्गापूजा उत्सव होतो, त्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवापासून घेण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी केवळ मंदिरापुरता किंवा राजा महाराजांपुरता मर्यादित असलेला हा उत्सव सामान्यांपर्यंत पोचवला, बंगालच्या दुर्गापूजा उत्सवापेक्षा २६ वर्षांनी जुना असा हा गणेशोत्सव आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आरंभाविषयी मतभिन्नता असली तरी पुण्यात १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्याचे पुरावे आहेत. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली पुण्यापुरता मर्यादित असलेला हा उत्सव साºया महाराष्ट्रभर पसरविला. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक दुर्गापूजा या दोन्ही उत्सवांचे महत्त्वाचे स्थान आहे.
गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात महाराष्ट्रात जशी साजरी होते तशीच ती आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यातही साजरी होते. तामिळनाडूत ती पिल्यायर तर केरळात लंबोधर पिरनालु या नावाने ओळखली जाते. १६०० पर्यंत सत्ता गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील गणेशोत्सव भव्य प्रमाणावर साजरा करायचे. त्यानंतरच्या तीन शतकातील कागदपत्रात गणेश पूजा होत असल्याचे अनेक उल्लेख सापडतात.
इंग्रजी लेखकांनी भारतीय सण व उत्सवाविषयी स्वत:चे विचार अनेक ठिकाणी नोंदवलेले आढळतात. एकोणिसाव्या शतकातील जॉन मुर्डोक यांनी लिहिले आहे, ‘‘गणेशाला शिव-पार्वतीचा पुत्र मानले आहे. त्यांचे पूजन गणेश, विनायक, गणपती, पिल्लायर इ. नावांनी केले जाते. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात गणेशाची पूजा होत असते. शाळेत जाणारी मुलं ‘श्रीगणेशाय नम:’ असे म्हणून आपल्या अभ्यासाची सुरुवात करीत असतात. प्रत्येक व्यावसायिक व्यवसायाचा आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा करीत असतो. विवाह समारंभात किंवा कोणत्याही धार्मिक समारंभात गणेश पूजनानेच आरंभ करीत असतात.’’
गणेश हा संकटमोचक म्हणूनही ओळखला जातो. गणेशाचे ‘विघ्नहर्ता’ हे वर्णन शिवपुराणात तसेच महाभारताच्या शांतीपर्वातही आढळते. त्याची उत्पत्ती आदिवासी गणात झालेली आहे. त्यामुळे तो गण-ईश= गणेश किंवा गणपती म्हणून ओळखला जातो. तो आदिवासींचा स्वामी किंवा गणाधीशच आहे. कुबेर हा देवतांचा खजांची आहे तर हनुमान हा श्रीरामांचा दूत आहे. पण त्यांना देवतांच्या पंक्तीत जसे स्थान मिळाले आहे, त्याचप्रमाणे गणेशाला देखील देवतांमध्ये स्थान मिळाले आहे. पार्वतीच्या या मुलाचे मस्तक लढाईत कापले गेले तेव्हा त्या जागी हत्तीच्या मस्तकाचे आरोपण करण्यात आले अशी आख्यायिका प्रचलित आहे. तात्पर्य हे की भारतातील साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेला हत्ती, श्रीगणेशाच्या रूपाने मंदिरात विराजमान झाला आहे.
भारतीय संस्कृतीचा जसजसा विस्तार होत गेला तसतसे वनक्षेत्रावर मानवाने आक्रमण करून ते क्षेत्र स्वत:कडे घेतले. तेव्हा जंगल आणि शहरी वस्त्या यांचा दुवा साधण्याचे काम हत्तीनेच केले आहे. शांततेच्या तसेच युद्धाच्याही काळात हत्तीनी फार मोठी कामगिरी केल्याचे आढळून येते. देवाधिदेव इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावत या हत्तीमुळे हत्ती हा वैभवाचा, साम्राज्याचा आणि पावित्र्याचाही प्रतीक मानला गेला. मायाच्या स्वप्नातही स्वर्गातून हत्तीच आला होता आणि भगवान बुद्धाच्या दैवी संकल्पनेत हत्तीच आढळतो. तो महान शक्तिशाली असल्याने दुर्लक्षिल्या जाऊ शकत नाही. शतकापूर्वी चार्लस् एच. बक या लेखकानेही गणेशपूजेचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आढळते - ‘‘सुवर्णाचा मुलामा चढवलेल्या मूषक वाहनावर स्वार झालेल्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करून त्यांच्यात देवत्व निर्माण केले जायचे. त्यानंतर त्यांचे घरात पूजन करून त्या मूर्ती मिरवणुकीने नदीवर, तलावावर किंवा समुद्रावर नेऊन तेथील पाण्यात विसर्जित केल्या जायच्या.’’ हे वर्णन आजच्या काळाशीही किती जुळणारे आहे. फरक एवढाच की आजच्या काळातील गणेशमूर्ती या आजच्या काळाशी सुसंगत अशा केल्या जातात. पण कोलकात्त्यात दुर्गादेवीच्या मूर्ती जशा विविध वस्तूंच्या - जसे काचेचे तुकडे किंवा सुपाºया यांचा वापर करून केल्या जातात, तशा गणेशाच्या मूर्ती महाराष्टÑात केल्या जात नाहीत. पण तो काळ फार दूर नाही, जेव्हा परंपरा सोडून मूर्ती केल्या जातील.
गणपतीची लोकप्रियता वाढविण्याचे काम चित्रपट जगताने मोठ्या प्रमाणात केले आहे. ‘‘गणपती बाप्पा मोरया’’ ही घोषणा त्यांनीच जनमानसात रुजविली आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा जगभर उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. चित्रपटातील गणेशाची स्तुती करणारी गीते ड्रमच्या तालावर म्हणण्यात येतात. तसेच समर्थ रामदासांनी रचलेली गणेशाची आरती ३०० वर्षानंतर आजही म्हटली जाते.
श्रीगणेशाची सोंड उजवीकडे किंवा डावीकडे का, याविषयी, तसेच त्याचा एक दात भंगलेला का, याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. गणेशाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आग्नेय आशियाकडे वळायला हवे. थायलंड येथे गणेशाचे पूजन केले जाते. वर विघ्नेश्वर किंवा वर विघ्नेगपासून ‘फ्रा फिकानेट’ हा शब्द तेथे वापरला जातो. ब्रह्मदेशात त्याची ओळख ‘महापेन्ने’ अशी आहे. हा शब्द ‘‘पाली महाविनायक’’पासून तयार झालाय. श्रीलंकेतील बौद्ध लोक गण देवीयो या नावाने त्याला ओळखतात. जपानमध्ये ‘शोटेन’ या नावाने त्याची पूजा केली जाते. टोकियोतील ‘मात्सुच्यामा शोटेन’ हे मंदिर सर्वात प्राचीन गणेश मंदिर आहे. तेथे हजारो वर्षांपासून गणेश पूजला जातो. जपानी लोक ‘ओम फ्री ग्याकु उन स्वाका’ या मंत्राने गणेशाचे स्तवन करतात.
श्रीगणेशाच्या बाललीला मुग्ध करणा-या आहे. आपला भाऊ कार्तिकेय यांच्याबरोबर त्याने त्रिजगताला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत लावली होती. आपल्या माता-पित्यांना प्रदक्षिणा घालून गणेशाने ही शर्यत जिंकली होती. कारण सारे विश्व माता-पित्यात सामावले आहे, असे त्याने सांगितले. प्राचीन काळात शैव आणि वैष्णव संप्रदायात संघर्ष व्हायचे. कृष्णाची मूर्ती वैष्णवांना प्रिय होती तर गणेश मूर्ती शैवांना आवडायची. गणेशाचे लंबोदरही सर्वांना प्रिय वाटायचे. लंबोदर हे समृद्धीचे प्रतीक आहे अशी भावना त्यामागे होती. आज गणेशाचे विसर्जन होत असताना श्रीगणेशांनी विभिन्न काळात, विभिन्न देशात बजावलेल्या कामगिरीचे स्मरण करण्याची गरज आहे.
-जवाहर सरकार
आयएएस (सेवानिवृत्त), माजी सीईओ, प्रसार भारती.