गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:07 PM2022-07-25T16:07:05+5:302022-07-25T16:07:46+5:30

मातीच्या छोट्या गणेशमूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके न उडविणे.. हा सुखद बदल आहे. अशा बदलांना सरकारने अधिक वेग दिला पाहिजे.

Ganaraya, will your enthusiasm be met with responsibility? for ganesh Ghaturthi | गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

googlenewsNext

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करण्याची घोषणा एकनाथ शिंदे सरकारने केल्यामुळे यंदा सगळेच सण दणक्यात साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातही गणेशोत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण गणेशोत्सवाला अलीकडच्या काळात लाभलेली राजकीय परिमाणे! सार्वजनिक लोकमताला बांध घालून आपल्या राजकीय हितसंबंधांना बाधा आणणे राज्यकर्त्यांना परवडत नाही. आजच्या आधुनिक ‘इव्हेंन्टी उत्सवा’बाबत कोणी काही आक्षेप नोंदवला की रूढी, परंपरा, धार्मिक अस्मितांचे मुद्दे अकारण  प्रतिष्ठेचे करून तोंडे बंद केली जातात. त्यामुळे परंपरांमधील वैविध्य हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असले तरी तेच आता दुखणे बनले असल्याचे अलीकडच्या अनेक धार्मिक उत्सवांतून दिसून येत आहे. हे सारे बघितले की प्रश्न पडतो की, आपण परंपरा, संस्कृती, धार्मिक अस्मितांचे वारसदार आहोत की भारवाहक? न्यायालयाने उत्सवा दरम्यानच्या आवाजाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वांची संहिता जारी केली असली, तरी न्यायालयाच्या आदेशाची वासलात लावण्याचे काम कथित उत्सवप्रेमी सतत करत असतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांत समाजप्रबोधनाची व सांस्कृतिक संवर्धनाची  रूळलेली वाट सोडून इव्हेंन्टीकरणाची वाट धरलेली दिसते. काही सन्मान्य अपवाद वगळता सार्वजनिक उत्सवांना मनुष्य शक्तीच्या सार्वजनिक अपव्ययाचे व निरूद्देश शक्तिप्रदर्शनाचे रूप प्राप्त झाले आहे.  

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हाच टिळकांच्या या कृतीवर आगरकरांनी ‘गणपतीला रस्त्यांवर आणू नका’, अशा कडक शब्दांत टीका केली होती. ही भीती आता सर्वच सण, उत्सवांबाबत खरी ठरू लागली आहे. गेल्या काही वर्षांत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेपासून विसर्जनापर्यंत, वीकेंडपासून पिकनिकपर्यंत, घरगुती कार्यक्रमांपासून ते सार्वजनिक उपक्रमांपर्यंत आणि वाढदिवसापासून ते अंत्ययात्रांपर्यंत उन्मादाची कमान चढत चालली आहे आणि विवेकाचा आवाज क्षीण होत चालला आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे लक्षण बनू लागले आहे. उत्सव म्हणजे बेमुर्वत उन्माद दाखविण्याची संधी वाटू लागली आहे.  या सर्वधर्मीय उन्मादी सण-उत्सवांना लगाम घालण्याचे काम मागील दोन वर्षात निसर्गानेच हाती घेतले होते. कोरोनाच्या महामारीमुळे रस्त्यावरच्या उत्सवाचे आणि उत्साहाचे प्रदर्शन  अपरिहार्यपणे रोखावे लागले. त्याही आधीपासून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या जाणत्या नागरिकांनी लोकप्रिय उत्सवांमध्ये शिरलेल्या अनिष्ट वृत्ती आणि प्रथांबाबत लोकजागराचे काम सुरू केले; त्याला चांगले यश येताना दिसते आहे. मातीच्या छोट्या मूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके उडवणार नाही, अशा शपथा घेऊन त्या पाळणारी मुले हे एका सुखद बदलाचे चित्र आहे. समाजात स्वयंस्फूर्तीने होत असलेल्या अशा  बदलांना अधिक वेग देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अशा बदलांच्या मागे सरकारनेही आपले पाठबळ उभे केले पाहिजे. लोकानुनयाच्या मागे जाणे सरकारने निदान काही बाबतीत तरी टाळायला हवे. 
उत्सव - मग ते कोणत्याही धर्माचे असोत, उत्साहानेच साजरे व्हावेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्या उत्साहाच्या लाटेत विवेक हरवणार नाही, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी! आनंद आणि उत्साहाला जबाबदारीचे कोंदण देण्याची ‘सुवर्णसंधी’ आपणास प्राप्त झाली आहे, ती दवडता कामा नये. 

- बाळकृष्ण शिंदे, पुणे

Web Title: Ganaraya, will your enthusiasm be met with responsibility? for ganesh Ghaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.