पुन्हा एकदा गांधीजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:39 AM2018-01-09T03:39:20+5:302018-01-09T03:39:27+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला या महिन्याच्या अखेरीस ७0 वर्षे पूर्ण होतील. त्यांची हत्या हिंदुत्ववादी विचारांच्या नथुराम गोडसेने केली, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्याला अटक झाली, न्यायालयात खटला चालला आणि नथुरामला शिक्षाही झाली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला या महिन्याच्या अखेरीस ७0 वर्षे पूर्ण होतील. त्यांची हत्या हिंदुत्ववादी विचारांच्या नथुराम गोडसेने केली, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्याला अटक झाली, न्यायालयात खटला चालला आणि नथुरामला शिक्षाही झाली. पण गांधीजींचे विचार मात्र कुणी विसरू शकत नाही. जगभरात गांधीजींचे स्मरण केले जाते आणि भारतात तर गांधींजींचे विचार न मानणाºयांनाही निवडणुकीच्या राजकारणासाठी का होईना, त्यांचे नामस्मरण करावे लागते. पण अलीकडील काळात त्यांचे नाव घेत, त्यांची अप्रत्यक्षपणे बदनामी करणाºयांचे प्रमाण वाढत चालले आहे. एकीकडे राष्ट्रपित्याचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चुकांमुळेच भारताची शकले झाली, त्यांनी पाकिस्तानला स्वत:हून ५५ कोटी रुपये दिले असे सांगायचे, त्यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाला पूर्णपणे फाटा द्यायचा आणि केवळ स्वच्छतेपुरते महात्म्याला लक्षात ठेवायचे, हे वारंवार दिसत आहे. अनेक जण तर गांधीजींच्या हत्येचे उघडपणे समर्थन करतात, नथुराम गोडसेने जे केले, ते योग्यच होते, असे म्हणतात आणि नथुरामच्या नावाने कार्यक्रमही घेताना दिसतात. अभिनव भारत या संघटनेने तर नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केलीच नव्हती, असा प्रचार गेल्या काही काळापासून चालवला होता. एवढेच नव्हे, तर नथुरामने नव्हे, तर कुणी तरी अज्ञात इसमाने महात्मा गांधींची हत्या केली, असा दावा करीत, हत्येचा पुन्हा नव्याने तपास करण्यात यावा, अशी याचिका या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. खरे तर आधी नीट खटला चालून, त्यात नथुरामनेच हत्या केल्याचे सिद्ध झाले असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेचा विचार न करता तिथल्या तिथे ती फेटाळायला हवी होती. पण न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायालयमित्र (अॅमायकस क्युरी) नियुक्त करून त्यांना याचिकेतील दाव्यांची सत्यासत्यता तपासण्यास सांगितले. त्यांनी त्यात गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनेच केली होती, असे नमूद करून, या याचिकेतील दाव्यांचा पुन्हा तपास करण्याची गरज नाही, असा अहवाल सादर केला असून, त्यामुळे याचिकाकर्त्याला व त्याच्या संघटनेला चपराकच बसली आहे. या निर्णयानंतर तरी नथुरामचे गुणगान करण्याचे संबंधितांनी थांबवायला हवे. पण तशी शक्यता नाही. गांधीजींना न मानणारे अनेक जण सत्तेतच असल्याने, नथुरामच्या समर्थकांचा जोर वाढताना दिसत आहे. पण अशा स्वरूपाच्या याचिका न स्वीकारण्याचा निर्णय न्यायालयांनीच घ्यायला हवा. त्यात निष्कारण वेळ जातो आणि साध्य मात्र काही होत नाही. त्या वेळेत इतर खटले तरी निकाली निघू शकतील. नेताजी सुभाषचंद्र बोस हे अद्याप जिवंत आहेत यापासून, त्यांच्या मृत्यूची चौकशी पुन्हा व्हावी, अशा याचिकाही अधूनमधून कोणत्या ना कोणत्या न्यायालयात दाखल होत असतात. सुभाषचंद्र बोस विमान अपघातात मरण पावले, असा अधिकृत अहवाल असतानाही त्यावर काही जण विश्वास ठेवत नाहीत. त्यांचे निधन झाले तेव्हा ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनालाही ७३ वर्षे होत आली आहेत. त्यांच्याविषयीच्या बºयाचशा फाईल्स खुल्याही झाल्या आहेत. त्यामुळे ते अपघातातच मरण पावले, यावर विश्वास ठेवून, पुन्हा तपासाच्या मागण्याही थांबायला हव्यात. किती काळ इतिहासातच वावरायचे, हे आपणच ठरवायलाच हवे. आपला इतिहास गौरवशाली असला तरी त्यात गुंतून पडण्यापेक्षा, त्याआधारे भविष्यकाळही अधिक गौरवशाली बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इतिहास हा ओझे बनणार नाही, याची दक्षता घ्यायलाच हवी.