'त्या' कर्मांनी पूजा केली तर गणेश प्रसन्न होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:43 AM2020-08-22T00:43:31+5:302020-08-22T07:01:59+5:30
मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतात, वडीलधाऱ्यांचा सहवास लाभतो.
गणेशावरील भक्तिपोटी गर्दी केली, तर पुन्हा लॉकडाऊन माथी बसणार यात शंका नाही. ल़ॉकडाऊन आला की, त्यापाठोपाठ आर्थिक चणचणीची महामारी कोसळणार हे स्पष्ट आहे. म्हणजे गर्दी करण्याच्या मोहातून रोगाबरोबर दारिद्र्याला आपण आमंत्रण देऊ. गणरायाला हे आवडणार नाही.
विघ्नहर्ता गणेशाचे आज घरोघरी आगमन झाले असेल. गणेश हा कौतुकाचा देव आहे. तो सार्वजनिक जीवनात आला असला, तरी त्याचे खरे कौतुक चालते ते घराघरांत. गणेशाचे वास्तव्य हा प्रत्येकाच्या घरात चैतन्याचा काळ असतो. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतात, वडीलधाऱ्यांचा सहवास लाभतो. धार्मिक श्रद्धेच्या कोंदणात, गणेशाच्या साक्षीने कौटुंबिक आनंदाला वेगळा बहर येतो. दीड, पाच, सात वा दहा दिवसांनंतर गणराय निघतात तेव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. पुढील वर्षी नक्की येण्याची आण या देवाला घातली जाते. हा एकदंत, वक्रतुंड आणि तुंदील तनूचा, पण तरीही आपलासा वाटणारा. सुग्रास भोजनापासून अन्य अनेक कलाआनंदात रमणारा. पंढरीचा विठ्ठल आणि गणपती हे मराठी माणसाला आपल्या घरचेच वाटतात. त्यांचा धाक वाटत नाही.
गणेश हा विद्येचा दाता, पण तो मास्तरकी करणारा वाटत नाही, तर चौसष्ट कलांचा आनंद घेणारा व देणारा असा रसिक, स्वस्थ-शांत मित्र वाटतो. पुण्याच्या मंडईतील गणेशमूर्ती ज्यांनी पाहिली असेल त्यांना गणपतीच्या अशा रुपाची कल्पना येईल. लोडाला टेकून उजव्या कुशीवर किंचित रेलून सरस्वतीसह प्रसन्न मुद्रेने जगण्याचा आनंद घेणारा मंडईतील गणपती आपल्यालाही प्रसन्नता देऊन जातो. गणेश ओळखला जातो तो विद्येचा दाता म्हणून. तो विघ्नहर्ता आहे कारण तो बुद्धिमान आहे. विघ्ने दूर करायची असतील तर बुद्धी उत्तम, स्वच्छ, सरळ आणि गीतेचा आधार घ्यायचा तर सम असावी
लागते. अशी बुद्धी असेल तर कोणत्याही विघ्नाची बाधा त्या माणसाला होत नाही. जग असेपर्यंत विघ्ने येतच राहणार; मात्र त्या विघ्नांना कसे तोंड द्यावे हे माणसाची बुद्धी सांगते. गणपती हा अशा सम-चित्त बुद्धीला प्रेरणा देणारा देव आहे. आज गरज आहे ती गणेशाचे हे रुप मनात ठसविण्याची. जगावर पसरलेले कोविडचे विघ्न दूर करावे म्हणून गणेशाला आळविणे सोपे असले, तरी केवळ भजन-पूजन करण्याने तो प्रसन्न होणार नाही. गणेशावर श्रद्धा ठेवून, आपली बुद्धी चालवून, कोविडचा मुकाबला करावा लागेल. हा मुकाबला धर्मशास्त्राने होणारा नाही. हा मुकाबला वैद्यकशास्त्राने करावा लागेल. साधना करून यश मिळवायचे असेल, तर बंधने पाळावी लागतात हे हिंदू धर्मशास्त्र सांगते. कोविडचा नाश करण्यासाठीही अशी बंधने पाळण्याची अतोनात गरज आहे. वैद्यकशास्त्राने लस निर्माण केली म्हणून कोविड थांबणार नाही. तो सर्वत्र पसरलेला आहे व आपल्या शरीरात शिरण्यासाठी योग्य संधीची वाट पाहात आहे. त्याला रोखणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी फक्त संयम आणि बुद्धीची गरज आहे. गणेश उत्सवासाठी आणि नंतर घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी गर्दी केली, तर कोविडला आपल्या घरात शिरण्याची संधी आपणच देऊ याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. धर्माज्ञेच्या नावाखाली काही राजकीय पक्ष आणि त्यांचे पंथ-उपपंथ हे बुद्धीभेद करून घरी विसर्जन करणे अयोग्य आहे, असे सांगत सुटले आहेत. हे त्यांचे सांगणे शास्त्रसंमत नाही. धर्मश्रद्धेचा आदर ठेवला, तरी कोविड घशात रुतला की व्हेंटिलेटरवर जाणे चुकत नाही. सुदैवाने अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोविडचा प्रसार बराच आटोक्यात आहे. संसर्गावर किंचित नियंत्रण आल्याचे अलीकडील आकडेवारी सांगते.
अशावेळी गर्दी टाळून कोविड संसर्गावर पूर्ण नियंत्रण आणण्याची संधी आपल्याला आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा आस्वाद लॉकडाऊनमध्ये घेता येत नाही. गणेशावरील भक्तिपोटी गर्दी केली, तर पुन्हा लॉकडाऊन माथी बसणार यात शंका नाही. ल़ॉकडाऊन आला की, त्यापाठोपाठ आर्थिक चणचणीची महामारी कोसळणार हे स्पष्ट आहे. म्हणजे गर्दी करण्याच्या मोहातून रोगाबरोबर दारिद्र्याला आपण आमंत्रण देऊ. गणरायाला हे आवडणार नाही. कोविडला घराबाहेर ठेवण्याचा संकल्प करणे हेच आज धर्मशास्त्र संमत आहे. कर्म-कुसुमांनी पूजा केली, तरी ईश्वर प्रसन्न होतो असे ज्ञानदेवांनी सांगितले आहे. मास्क घालणे, स्वस्छता राखणे आणि गर्दी टाळणे ही सध्या अत्यावश्यक कर्मे आहेत आणि त्या कर्मांनी पूजा केली तर गणेश प्रसन्न होईल यात शंका नाही.